नाशिकमध्ये डेंग्यू आणि चिकुन गुन्याचे थैमान

नाशिकमध्ये डेंग्यू आणि चिकुन गुन्याचे अक्षरशः थैमान सुरू आहे. त्यात जानेवारीपासून ऑक्टोबरपर्यंत डेंग्यू रुग्णांची आकडेवारी 888 वर गेली आहे, तर चिकुन गुन्याचे रुग्ण 633 वर गेले आहेत. विशेष म्हणजे रुग्णांचा हा पाच वर्षांतील उच्चांक ठरला आहे.

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या डेंग्यू आणि चिकुन गुन्याच्या साथीचे थैमान काही केला कमी व्हायला तयार नाही. जानेवारी ते ऑक्टोबरच्या दरम्यान डेंग्यूचे एकूण 2295 नमुने घेण्यात आले. त्यात 888 रुग्ण सापडले आहेत. तर याच काळात चिकुन गुन्याचे 2295 नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्यात 633 रुग्ण आढळले आहेत. आता परतीच्या पावसाने थैमान घातल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यात या रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. सध्याच्या आठवड्यात महापालिकेने 258 रुग्णांचे नमुने तपासले. त्यातही 55 डेंग्यूचे रुग्ण आढळल्याचे समोर येत आहे. महापालिकेने चिकुन गुन्याचे 94 नमुने तपासले आहेत. त्यात 23 रुग्ण सापडले आहेत. रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. महापालिकेने आम्ही साऱ्या उपायोजना करत असल्याचा दावा केला आहे. पेस्ट कंट्रोल, धूर फवारणी, पाण्यात गप्पी मासे सोडणे सुरू असल्याचे म्हटले आहे.

नाशिकमध्ये 2017 मध्ये डेंग्यूचे 151 रुग्ण होते, तर चिकुन गुन्याचे 4 रुग्ण होते. 2018 मध्ये डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा 368 वर गेला होता, तर चिकुन गुन्याचे 40 रुग्ण सापडले होते. 2019 मध्ये डेंग्यूचे रुग्ण 177 होते. या वर्षी चिकुन गुन्याच्या रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी होते. फक्त 1 रुग्ण सापडला होता. 2020 मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 115 होती, तर चिकुन गुन्याच्या रुग्णांची संख्या 7 होती. मात्र, 2021 डेंग्यू आणि चिकुन गुन्याच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसते. शहरात डेंग्यूचे रुग्ण 888 वर, तर चिकुन गुन्याचे रुग्ण 633 वर गेले आहेत.

सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीचे रुग्ण वाढले आहेत. अनेक खासगी रुग्णालये हे डेंग्यू तसेच चिकुन गुन्याच्या रुग्णांनी भरली आहेत. बऱ्याच रुग्णालयात रुग्णांसाठी खाटा मिळत नसल्याचे चित्र आहे. सिन्नर, येवला, निफाडमध्ये वाढते कोरोना रुग्ण पाहता जिल्ह्यात अजूनही तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.