स्त्री भ्रूण हत्या प्रकरणात बीड जिल्ह्याचे नाव देशात गाजले होते. आता पुन्हा एकदा याच जिल्ह्यात मुलींच्या जन्माचा दर अत्यंत कमी आल्याचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. कोव्हिड काळात मुलींच्या जन्मदरात मोठी घट झाल्याचे समोर आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात हजार मुलांमागे केवळ 764 मुलींचा जन्म झाला आहे. कोव्हिड काळात पालकांनी मुलाच्या जन्माचा अट्टाहास केल्याने ही भयानक स्थिती उद्भवली असल्याचे PCPNDT च्या अशासकीय सदस्या डॉ आशा मिरगे यांनी सांगितले आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हे भीषण सत्य व्यक्त केले आहे.
पाटोदा, केज आणि परळीत भीषण स्थिती
बीड जिल्ह्यातील एकूण मुलांमागील मुली जन्मण्याचा सरासरी दर 764 असला तरीही जिल्ह्यातील काही तालुक्यांतील आकडेवारी आणखीच धक्कादायक आहे. जिल्ह्यातील केज, पाटोदा आणि परळीतील मुलींचा जन्मदर खूप खालावला आहे. यापैकी पाटोदा तालुक्यात 1 हजार मुलांमागे फक्त 764 मुली जन्मल्या आहेत. तर त्यापाठोपाठ केजमध्ये 888 तर त्यानंतर परळीत 903 मुली जन्मल्या.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजा मुंडे यांचं खंबीर नेतृत्व लाभलेल्या परळी मतदारसंघातही अशी स्थिती समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अज्ञान आणि अवैधरित्या गर्भपात केंद्र सुरु असल्यानं अशी स्थिती समोर आली असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. लातूर जिल्ह्यातल्या दहा पैकी पाच जिल्ह्यांमध्ये मुलांच्या प्रमाणात मुलींचा जन्मदर कमी असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या पर्यवेक्षक मंडळाने दिली आहे . लातूर परिमंडळात असलेल्या देवणी मध्ये एक हजार मुलांमागे 771 मुलींचा जन्मदर आहे . तर औसा तालुक्यात 810, शिरूरअनंतपाळ-836 ,निलंगा 849 ,जळकोट 834 असा जन्म दर आहे . या संख्येला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना राबविण्यात येत आहेत .
अवैध सेंटर्सची माहिती सांगणाऱ्याला लाखांचे बक्षीस
दरम्यान, मुलींचा जन्मदराबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आल्यानंतर बीड आणि लातूर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ज्या तालुक्यांमध्ये सर्वात कमी जन्मदर आहे, त्या ठिकाणी अवैधरित्या गर्भपात होत असल्याचा संशय बळावला आहे. अशा सेंटर्सची माहिती देणाऱ्यावर प्रशासनाने लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.