परराज्यातील दूध संघांकडून चांगला दर, महाराष्ट्रातील संघांकडून लूट
धाराशिव जिल्हयात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील ३ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले. आहेत उर्वरित तालुक्यातील काही महसूली मंडळे दुष्काळसदृष्य जाहीर झाल्याने बळीराजा अडचणीत आला आहे. अशातच दुधाचे दर कमी झाल्यामुळे दुध उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना दुधाचा आधार असताना दुधाचा दर कमी झाल्याने बळीराजा मेटाकुटीला आलाय.धाराशिव जिल्ह्यामध्ये सात लाखांपेक्षा अधिक पशुधन आहे. त्यापैकी जवळपास अडीच लाख पशुधन हे परंडा ,भूम, वाशी तालुक्यात आहे. या तीन तालुक्यांमध्ये जवळपास सात लाख लिटर दूध संकलन केले जाते. त्यापैकी पंधरा टन खवा हा दररोज आठ राज्यांमध्ये विक्रीसाठी जातो. तर या तीन तालुक्यातील दूध संकलन परराज्यात व परजिल्ह्यातील जवळपास 20 दूध संघ हे दूध घेऊन जातात. त्यापैकी परराज्यातील दूध संघ हे या दुधाला चक्क ३४ रुपये दर देतात, मात्र दुसऱ्या जिल्ह्यातील दूध संघ शेतकऱ्यांना हे २७ ते २८ रुपये दुधाला दर देतात.
उत्तराखंड ; अमेरिकन तज्ज्ञांच्या वक्तव्याने चिंता वाढल्या
उत्तरकाशीतल्या सिलक्यारा बोगद्यामध्ये अडकेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी चालू असलेली बचाव मोहीम अंतिम टप्यात आहे असं सांगितलं जात होतं. परंतु, या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. कारण, बचाव मोहिमेसाठी अमेरिकेहून आलेल्या खोदकाम तज्ज्ञाने सांगितलं की या कामगारांना बाहेर काढण्यास खूप वेळ लागणार आहे. बचाव मोहीम राबवणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमडीएमए) मंगळवारी (२१ नोव्हेंबर) सांगितलं की, अवघ्या १५ मीटरचं खोदकाम बाकी असून बुधवारी मध्यरात्री किंवा गुरुवारी पहाटेपर्यंत मजूर सुखरूप बाहेर येऊ शकतील. परंतु, अंतिम खोदकामांत अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे बचाव मोहीम आता लांबवली आहे.
वॉरेन बफे यांची बर्कशायर हॅथवे ‘पेटीएम’मधून बाहेर
वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हॅथवेने डिजिटल देयक व्यासपीठ ‘पेटीएम’ची प्रवर्तक ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’मधील संपूर्ण २.४६ टक्के समभागांची विक्री केली. सुमारे १,३७१ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खुल्या बाजारातून विक्री करण्यात आली. बर्कशायर हॅथवे इंकने तिच्या संलग्न बीएच इंटरनॅशनल होल्डिंग्सद्वारे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर पेटीएमचे १.५६ कोटीपेक्षा जास्त समभागांची विक्री केली. या समभागांची प्रत्येकी ८७७.२९ रुपयांप्रमाणे विक्री करण्यात आली.दरम्यान, कॉप्थॉल मॉरिशस इन्व्हेस्टमेंटने ७५.७५ लाख समभाग आणि घिसालो मास्टर फंड एलपीने सुमारे ४२.७५ लाख समभागांची खरेदी केली आहे. म्हणजेच पेटीएममधील त्यांची हिस्सेदारी आता अनुक्रमे १.१९ टक्के आणि ०.६७ टक्के आहे. शुक्रवारच्या सत्रात राष्ट्रीय शेअर बाजारात ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’चा समभाग ३.०८ टक्क्यांनी ८९५ रुपयांवर बंद झाला.
‘हमास’कडून १३ इस्रायली ओलिसांची सुटका; ४८ दिवसांनंतर युद्धग्रस्तांना दिलासा
‘हमास’च्या अतिरेक्यांनी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर ओलिस धरलेल्या १३ इस्रायलींची शुक्रवारी सुटका केल्याची माहिती इस्रायलच्या माध्यमांनी दिली. इस्रायल आणि हमासदरम्यान झालेल्या शस्त्रविरामाच्या करारानुसार, हमास २४०पैकी ५० ओलिसांची टप्प्याटप्प्याने सुटका करणार आहे. त्यानंतर इस्रायलकडून पॅलेस्टिनी १५० कैद्यांची सुटका केली जाणार आहे. दोन्ही बाजूंनी चार दिवसांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने ओलिसांची आणि कैद्यांची सुटका केली जाणार आहे. याबरोबरच ‘हमास’ने १२ थाई ओलिसांचीही सुटका केल्याची माहिती थायलंडच्या पंतप्रधानांनी दिली.
“संविधान सभेला येऊ शकणार नाही, पण…”, राहुल गांधींचं प्रकाश आंबेडकरांना पत्र
वंचित बहुजन आघाडीने शनिवारी (२५ नोव्हेंबर) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर (दादर) संविधान सन्मान महासभेचं आयोजन केलं आहे. उद्या देशभरात संविधान दिन साजरा केला जाणार आहे. या संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला वंचितने ही महासभा बोलावली आहे. वंचितने या सभेसाठी देशातील अनेक विरोधी पक्षांना आणि नेत्यांना या सभेचं निमंत्रण दिलं आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेदेखील या सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेत देशाचं संविधान, लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय आणि सद्यस्थिती यावर चर्चा केली जाईल. या सभेतून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर देशातील सत्ताधारी नरेंद्र मोदी सरकारवर आणि महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्याची शक्यता आहे.
केसीआर यांचा हजारो कोटींचा भ्रष्टाचार; अमित शहा यांचा आरोप
भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) अध्यक्ष आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केला. आरमुर येथे प्रचारसभेत बोलताना शहा म्हणाले की, ‘‘आपल्याविरुद्ध कोणतीही कारवाई होणार नाही, या भ्रमात त्यांनी राहू नये. भाजप तेलंगणमध्ये सत्तेवर आल्यास या भ्रष्टाचाराची चौकशी केली जाईल आणि दोषी ठरणाऱ्यांना कारावासात पाठवले जाईल.’’
२६/११ हल्ल्याची १५ वर्षे पूर्ण; सागरी सुरक्षेबाबत शासनदरबारी अद्याप अनास्थाच
२६/११च्या दहशतवादी हल्ल्यास उद्या, रविवारी १५ वर्षे पूर्ण होतील. मात्र, सागरी सुरक्षेबाबत शासनदरबारी अद्याप अनास्थाच असल्याचे दिसून येत आहे. मुंबईला लाभलेल्या ११४ किलोमीटर इतक्या मोठ्या सागरी किनाऱ्याची सुरक्षा करण्यासाठी पोलिसांकडे पुरेशा बोटी नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.सन २००८मध्ये करण्यात आलेल्या या हल्ल्यानंतर सागरी सुरक्षा भक्कम करण्यासाठी घेतलेल्या २३पैकी केवळ आठच बोटी वापरात आहेत. विशेष म्हणजे २२ बोटींची आवश्यकता असल्याचा पोलिसांकडून गेलेला प्रस्ताव सुमारे वर्षभरापासून शासनदरबारी धूळ खात पडून आहे. नवीन नाही, निदान जुन्या बोटींचे अत्याधुनिकीकरण करू द्या, असाही प्रस्ताव पोलिसांकडून पाठविण्यात आला आहे. मात्र त्यालाही अद्याप प्रतिसाद न आल्याने सागरी सुरक्षेबाबत असलेले गांभीर्य लक्षात येते.
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, निवृत्ती वय ६० वर्ष करण्याचा शिंदेंचा विचार
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह इतर अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील ५४०० ग्रेड पेची मर्यादा रद्द करण्याप्रमाणेच केंद्राप्रमाणे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे महासंघाकडून सांगण्यात आले.
अंडर-१९ आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा
बीसीसीआयने यूएईमध्ये खेळल्या जाणार्या आगामी अंडर-१९ आशिया चषक २०२३ साठी भारताच्या संघाची घोषणा केली आहे. गतविजेत्या भारताने आठ वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे. भारताच्या अंडर-१९ संघात १५ सदस्य आणि तीन प्रवासी स्टँडबाय खेळाडू असतील. निवड समितीने चार अतिरिक्त राखीव खेळाडूंचीही नावे घोषित केली आहेत. तसेच राखीव खेळाडू दौऱ्यातील संघाचा भाग असणार नाहीत.पंजाबकडून खेळणाऱ्या उदय सहारनच्या हाती कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तसेच सौम्य कुमार पांडे उपकर्णधार आणि अरावेली अवनीश राव याची यष्टिरक्षक म्हणून निवड केली आहे. या संघात रुद्र मयूर पटेल आणि सचिन धस सध्याच्या अंडर-१९ चतुर्भुज मालिकेत सर्वाधिक धावा करणारे दोन खेळाडू तसेच मुशीर खान आणि नमन तिवारी हे प्रमुख विकेट घेणारे खेळाडू आहेत. चतुर्भुज मालिकेत इंग्लंड आणि बांगलादेशचे संघ देखील आहेत. ही मालिका २७ नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे संपणार आहेत.
ना आलिया ना दीपिका… मराठमोळ्या अभिनेत्रीचा जागतिक स्तरावर गौरव
‘जोगवा’, ‘देऊळ’, ‘७२ मैल एक प्रवास’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘नूर’, ‘पंगा’, ‘जवान’, ‘जोरम’ अशा मराठी-हिंदी चित्रपटांमधून आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता तांबे. केवळ चित्रपटच नाही तर मालिका, वेब सीरिजमध्येही तिनं विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे.वेगळ्या भूमिकांकडे कल असणाऱ्या स्मिताचा ‘जोरम’ हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. याच सिनेमातील भूमिकेसाठी तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलं गेलंय. स्टार्स आशियाई फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. लॉस एंजेलिसमधल्या डाऊनटाऊनमध्ये नुकताच हा दिमाखदार सोहळा झाला. एकूण १२ विभागांपैकी ‘जोरम’ या चित्रपटानं दोन पुरस्कार पटकावले.
SD Social Media
9850603590