टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत झिम्बाब्वेचा ७१ धावांनी पराभव करत भारताने थाटात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. या सामन्यासाठी आम्हाला लवकरात लवकर स्थितीशी जुळवून घ्यावं लागणार असल्याचं भारतीय कर्णधार रोहित शर्माने म्हटलं आहे. दरम्यान, झिम्बाब्वेविरोधातील सामन्यात सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा आपल्या तडाकेबाज फलंदाजीची (२५ चेंडूत ६१ धावा) झलक दाखवली. भारताने झिम्बाब्वेसमोर १८७ धावांचं आव्हान ठेवलं असताना ११५ षटकांमध्येच संपूर्ण संघ गारद केला.
“आम्ही अष्टपैलू कामगिरी केली असून, याकडेच लक्ष होतं. या सामन्याआधी आम्ही पात्र झालो असलो तरी आम्हाला अपेक्षेप्रमाणे खेळायचं होतं. सूर्यकुमार यादव सध्या जबरदस्त कामगिरी करत आहे. इतर फलंदाजांवरील दबाव कमी केल्याने संघाला फायदा होत आहे. आम्हाला त्याची क्षमता माहिती असून, यामुळे इतर खेळाडूंवरील दबाव कमी होत आहे. तो प्रचंड आत्मविश्वासाने फलंदाजी करतो. आम्हाला त्याच्याकडून अशीच अपेक्षा आहे.” असं रोहित शर्माने म्हटलं आहे.
इंग्लंडविरोधात होणाऱ्या उपांत्य फेरीमधील सामन्याबद्दल तो म्हणाला की, तेथील स्थितीशी लवकरात लवकर जुळवून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. इंग्लंड संघ आमच्यासाठी चांगलं आव्हान आहे. ते चांगलं क्रिकेट खेळत आहेत. दोन्ही संघांमधील सामना पाहण्यासारखा असेल. आम्ही कशा प्रकारे इथपर्यंत पोहोचलो आहोत हे विसरु इच्छित नाही. प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून ती पार पाडण्याची गरज आहे. या सामन्यात फार दबाव असणार आहे. आम्हाला फक्त चांगलं खेळायचं आहे. जर आम्ही त्या सामन्यात चांगलं खेळलो तर पुढील सामन्यातही त्याचा फायदा होईल. आम्हाला लवकर जुळवून घेण्याची आणि त्याप्रमाणे योजना आणखण्याची गरज आहे.
“चाहते आम्हाला चांगला पाठिंबा देत आहेत. प्रत्येक सामन्यात गर्दी होत आहे. उपांत्य फेरीतही असाच पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा आहे. संघाच्या वतीने मी चाहत्यांचे आभार मानतो,” असं रोहितने सांगितलं आहे. गुरुवारी भारत आणि इंग्लंड संघ भिडणार आहे.