दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या काकापोरा रेल्वे स्थानकाजवळ चहाच्या स्टॉलवर चहा पित असलेल्या रेल्वे संरक्षण दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात रेल्वे सुरक्षा दलाचे दोन जवान शहिद झाले.
एका चहाच्या स्टॉलवर चहा पीत असलेल्या रेल्वे संरक्षण दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी काल हल्ला केला. या हल्ल्यात रेल्वे सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले. या तिन्ही जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापैकी दोन जखमींना डॉक्टरांनी आज सकाळी शहीद घोषित केले. एसआय देवराज आणि हेड कॉन्स्टेबल सुरेंद्र सिंग अशी शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत.
या हल्ल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेलं. तर, सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. या शोध मोहिमेत पोलिसांनी जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केलाय.
शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी शस्त्रे, दारूगोळा जप्त केला. 10 पिस्तूल, 17 पिस्तुल मॅगझिन जप्त, 54 पिस्तुल राऊंड, 5 ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. तर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकेबंदी करून शोध मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक नाक्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची झडती घेतली जात आहे.