जिल्हा न्यायालयातही ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’ची व्यवस्था, राज्य शासनाने दिले एक कोटी
सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील ‘डिजिटलायझेशन’ची प्रक्रिया वेगवान केल्यावर आता राज्यातील जिल्हा आणि तालुका न्यायालयांनाही अद्यावत करण्यात येत आहे. जिल्हा व तालुका न्यायालयात ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’ची व्यवस्था करण्यात येणार आहे.राज्यात यासाठी पाचशे सॉफ्टवेअर लायसेंस खरेदी करण्यात येतील. राज्य शासनाच्यावतीने यासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. राज्याच्या विधी आणि न्याय विभागामार्फत याबाबतचे परिपत्रक जाहीर करण्यात आले. ई-कोर्ट प्रकल्पाच्या अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील जिल्हा न्यायालयांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा देण्यासाठी राज्य शासनाला प्रस्ताव सादर केला होता. विधी आणि न्याय विभागाच्या २० ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली. राज्य शासनाच्यावतीने एक कोटी दोन लाख ६६ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
पटोलेंचा सवाल, महाराष्ट्राने काय पाप केले, ४५० रुपयांना गॅस सिलिंडर का नाही?
राजस्थान व छत्तीसगडमध्ये भाजपाचे सरकार आल्यास ४५० रुपयांना गॅस सिलिंडर देणार अशी मोठी जाहिरातबाजी भारतीय जनता पक्षाने केली आहे. महाराष्ट्रात सध्या भाजपाचेच सरकार आहे मग भाजपा सरकार महाराष्ट्रात ४५० रुपयांना सिलिंडर देत का नाही? असा प्रश्न कांग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते आज नागपुरात माध्यम प्रतिनिधीशी बोलत होते.
कष्टकऱ्यांचे नेते ते चळवळींचे मार्गदर्शक कॉ. गोविंद पानसरे यांची जयंती
महाराष्ट्रातील कष्टकरी,कामगारांचे नेते आणि रस्त्यावरील लढाईसोबत समाजाची वैचारिक जडण घडण झाली पाहिजे यासाठी लेखन करणाऱ्या कॉ. गोविंद पानसरे यांची आज जयंती आहे. कॉ. गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सोप्या शब्दांमध्ये मांडलं. शिवाजी कोण होता? या पुस्तकानं विक्रीचे विक्रम प्रस्थापित केले. हिंदी, कन्नड आणि इंग्रजीसह विविध भाषांमध्ये ते पुस्तक भाषांतरीत झालं. कॉ. गोविंद पानसरे यांनी शिवाजी महाराजांचं जे चित्रण केलं होतं ते इथल्या कष्टकऱ्यांशी, शेतकऱ्यांशी आणि सामान्य माणसांसोबत महाराजांची नाळ जोडणारं होतं. या पुस्तकाचं आतापर्यंत ३६ वेळा पुनर्मुद्रण झालं असून दीड लाखांपेक्षा अधिक प्रती वाचकांनी विकत घेतल्या आहेत. या पुस्तकाची १० एप्रिल १९८८ पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती.
राज्याच्या दोन उपमुख्यमंत्री निवडीचा पॅटर्न आता ग्रामपंचायतीत, जारकरवाडीला दोन उपसरपंच!
महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्याच राजकारणाचा आदर्श घेऊन आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी ग्रामपंचायतीत दोन उपसरपंच असावे, अशी मागणी या ग्रामपंचायतीमधील सदस्यांनी केली होती. त्यासंदर्भात त्यांनी पत्रक देखील काढले होते. या मागणीचा विचार करून सरपंचांनी जारकरवाडी ग्रामपंचायतीत दोन उपसरपंच नेमले आहेत.
सूर्याच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्याच सामन्यात रचला इतिहास
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २ विकेट्स आणि १ चेंडू राखून जिंकला आहे. भारताने या सामन्यात विजय मिळवत आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्याच सामन्यात इतिहास रचला आहे. आतापर्यंत भारताच्या टी-२० संघाने अशी कामगिरी केली नव्हती. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०९ धावांचा पाठलाग करून मोठा विक्रम केला आहे.पुढील वर्षी टी-२० विश्वचषक होणार आहे, त्यामुळे या विश्वचषकात कर्णधारपद कोणाकडे द्यायचे हा मोठा प्रश्न आहे. जर सूर्याने विश्वचषकापूर्वी स्वत:ला सिद्ध केले तर तो विश्वचषकासाठी कर्णधार म्हणूनही संघात सामील होऊ शकतो.
भारतात ‘डीपफेक’ला लागणार लगाम; येत्या १० दिवसांत नवी नियमावली होणार तयार
कृत्रिम प्रज्ञा (एआय) वापरून तयार केलेले ‘डीपफेक’ हा प्रकार केवळ अभिव्यक्तिस्वातंत्र्यालाच नव्हे, तर लोकशाही व समाजापुढे निर्माण झालेला मोठा धोका आहे, असे सांगतानाच, अशा डीपफेकवर कडक निर्बंध लागू करण्यासाठी पुढील दहा दिवसांत स्पष्ट नियमावली तयार करण्याबाबत सर्व संबंधितांनी सहमती दर्शवली आहे, असे केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान (आयटी) मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी सांगितले.
राजस्थानात कॉंग्रेस की भाजप? प्रचाराच्या तोफा थंडावल्या, १९९ जागांसाठी उद्या होणार मतदान
राजस्थानमध्ये उद्या, २५ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची मुदत बुधवारी संध्याकाळी संपली. सत्ताधारी काँग्रेसने मुख्यमंत्री अशोक गहलोत सरकारची कामे आणि त्यांनी राबवलेल्या योजना या मुद्द्यांवर प्रचार केला. पक्षाची सत्ता कायम राहिल्यास ‘सात’ हमींचे आश्वासन दिले. त्याचवेळी भाजपने महिलांवरील गुन्हे, तुष्टीकरण, भ्रष्टाचार, पेपरफुटीच्या मुद्द्यांवर काँग्रेसवर हल्लाबोल केला.राज्यातील विधानसभेच्या २००पैकी १९९ जागांवर उद्या, शनिवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, गहलोत आदींनी अनेक प्रचार सभा घेतल्या, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या प्रचाराचे नेतृत्व केले. बिकानेर आणि जयपूरमध्ये त्यांनी रोड शोही केले.
जगात किती लोक Social Media वापरतात?
सोशल मीडिया ही आजच्या काळाची गरज बनला आहे. अनेकांचा तर सोशल मीडियाशिवाय दिवसही जात नाही. आज जवळपास सर्वच इंटरनेट युजर्सला सोशल मीडियाचे ‘व्यसन’ लागले आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जगभरात सोशल मीडिया वापरणाऱ्या युजर्सची संख्या सद्यस्थितीत ४ अब्ज ९० कोटी इतकी असून, २०२८ पर्यंत ही संख्या सहा अब्जांवर पोहोचणार आहे.एका सर्वेक्षणानुसार, सोशल मीडिया वापरणाऱ्या युजर्सची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. सद्यस्थितीत सुमारे ९५ टक्के इंटरनेट युजर्स विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करीत आहेत. ही संख्या गेल्या वर्षापेक्षा चार टक्क्यांनी जास्त आहे.
करोनानंतर चीनमध्ये आणखी एका रोगाचा प्रादूर्भाव, भारताला धोका किती?
चीनमध्ये H9N2 चा प्रादुर्भाव वाढला असून तेथील लहान मुलांमध्ये श्वसनाच्या तक्रारी वाढल्या आहेत. करोनाप्रमाणे हा सुद्धा संसर्गजन्य आजार असल्याने भारतीय नागरिकांमध्येही घबराट निर्माण झाली आहे. परंतु, केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. चीनमध्ये आढळललेले एव्हीयन इन्फ्लूएन्झा (H9N2) चा भारताला कमी धोका असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे.उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनाचा आजार वाढला आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने एक निवेदन देखील जारी केले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे, चीनमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये श्वसनाच्या आजारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेले कामगार खेळतात चोर-पोलीस
उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामात गुरुवारी पुन्हा अडथळा आला. त्यामुळे बचावकार्य पुन्हा थांबले असून मजुरांच्या सुटकेसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, अडकलेल्या मजुरांची मानसिक अवस्था बिघडू नये याकरता त्यांना तिथं लुडो आणि पत्ते पाठवण्यात येणार आहेत. तसंच, अडकेलेल कामगार चोर पोलीस खेळत असल्याची माहितीही मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रोहित गोंदवाल यांनी पीटीआयला दिली. हिंदुस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
विश्वचषकावर पाय ठेवणाऱ्या मिशेल मार्श विरुद्ध एफआयआर! मोदींनाही धाडलं पत्र, ऑस्ट्रेलियाच्या स्टारला भारतात बंदी?
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून जेतेपदावर नाव कोरलं आणि मग ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममधला एक फोटो प्रचंड चर्चेत आला. हा फोटो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला होता पण यावरून नंतर वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. तुमच्याही लक्षात आले असेल, हे प्रकरण म्हणजे मिशेल मार्शने विश्वचषकावर पाय ठेवून हातात बिअर घेत काढलेला फोटो. विश्वचषक अपात्र संघाच्या हाती पडल्यावर हा असा अपमान होणे साहजिकच आहे अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली होती, अलीकडेच मोहम्मद शमीने सुद्धा मार्शच्या या फोटोबाबत निराशा व्यक्त केली. पण आता मिशेल मार्शच्या या फोटोमुळे भारतात चक्क एक एफआयआर नोंदवण्यात आल्याचे समजतेय.अलिगढमधील एका आरटीआय कार्यकर्त्याने मिशेलच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या खेळाडूला भारतात खेळण्यास बंदी घालण्याची विनंती केली आहे. आरटीआय कार्यकर्ते पंडित केशव यांनी ही तक्रार दाखल केली असून मार्शने वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवण्याच्या कृतीमुळे भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. प्राप्त माहितीनुसार केशव यांनी तक्रारीची एक प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पाठवली आहे.
रोहित शर्मा, विराट कोहली टी २०मधून निवृत्ती घेणार? BCCI च्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतीय खेळाडूंप्रमाणेच तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांचा स्वप्नभंग झाला. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी २० मालिकेमधून विश्वचषक स्पर्धेच्या संघातील बहुतेक खेळाडूंनी ब्रेक घेतला आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली तरुण खेळाडूंचा संघ या मालिकेत उतरवण्यात आला आहे. मात्र, विराट कोहली व रोहित शर्मा या भारताच्या दोघा स्टार खेळाडूंनी फक्त याच मालिकेतून ब्रेक घेतला नसून ते थेट टी २० क्रिकेटमधूनच निवृती घेणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
रेमंड कुटुंबात वडीलही मुलावर नाराज, आता सुनेला देणार आधार
रेमंड कुटुंबातील वैयक्तिक कलह आता रस्त्यावरील चर्चेचा विषय बनला आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि एमडी गौतम सिंघानिया लग्नाच्या ३२ वर्षांनंतर त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानियांपासून घटस्फोट घेणार आहेत. याआधी गौतम सिंघानिया यांचे वडील विजयपत सिंघानिया यांच्याबरोबरचे भांडणही चांगलेच गाजले होते. आता विजयपत सिंघानिया यांनीही आपल्या सुनेला पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं आहे. विजयपत सिंघानिया यांनी अनेक वेळा उघडपणे सांगितले आहे की, सर्व संपत्ती आपल्या मुलाला देऊन आपण चूक केली. त्यांच्या मुलाने त्यांना घरातून हाकलून दिले. त्यांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. आता त्यांनी पत्नी नवाज मोदी सिंघानियाबरोबरही असेच वर्तन केले आहे.
भारताच्या नेतृत्वात १४ देश चीनविरोधात एकवटले, ड्रॅगनसमोर आता मोठे आव्हान
भारत, अमेरिकेसह १४ देशांनी चीनविरोधात आघाडी उघडली आहे. हे सर्व देश चीनवरील अवलंबित्व कमी करून एकमेकांशी व्यापार वाढवण्यासाठी एकत्र आले आहेत. इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क (IPEF) मध्ये भारत, यूएसए, ऑस्ट्रेलिया, जपान, फिजी, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, सिंगापूर, व्हिएतनाम आणि थायलंड यांसारखे सदस्य आहेत. जागतिक जीडीपीमध्ये त्यांचा वाटा ४० टक्के आणि जागतिक व्यापारात २८ टक्के आहे. एकीकडे चीन छोट्या देशांना कर्जाच्या जाळ्यात अडकवत आहे. दुसरीकडे हिंद आणि प्रशांत महासागरात चीनचा हस्तक्षेपही वाढत आहे. याला सामोरे जाण्यासाठी हे सर्व देश एकत्र आले आहेत.
SD Social Media
9850603590