दि.२३ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

एकनाथ शिंदे सरकारचा मोठा निर्णय! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून ४ टक्के महागाई भत्ता लागू

एकनाथ शिंदे सरकारने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. १ जुलैपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार १ जुलै २०२३ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२ वरुन ४६ टक्के करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ १ जुलै २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीतील थकबाकीसह नोव्हेंबरच्या वेतनासह रोखीने देण्यात यावी असा निर्णय सरकारने घेतला आहे. 

हिंदी अभिनेते आपल्याच भाषेत बोलण्यास कचरतात हे दुर्दैवी; राज्यपाल रमेश बैस यांची खंत

गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे आयोजित क्षेत्रीय राजभाषा संमेलनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पार पडलं. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अणुशक्ती भवन तुर्भे (मुंबई) येथे गुरुवारी हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रमेश बैस म्हणाले, राज्यपाल म्हणून अनेक देशांचे राजदूत व वाणिज्यदूत मला भेटायला येतात. त्यातील काहींना तर हिंदी भाषादेखील अवगत असते. अनेक देशांमधील विद्यापीठांमध्ये हिंदी भाषा विभाग कार्यरत असल्याचे त्यांच्याकडून समजते. दुर्दैवाने आपणच आपल्या मातृभाषांबाबत उदासीन आहोत. हिंदी चित्रपटातील अभिनेते, अभिनेत्री नेहमी इंग्रजीतच बोलतात; हिंदी भाषेत बोलण्यास कचरतात, हे दुर्दैवी आहे.

शरद पवारांचे शिलेदार अमोल कोल्हेंनी मंत्रालयात घेतली अजित पवारांची भेट

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह कुणाचं? याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. अशातच खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयातील कार्यालयात भेट घेतली आहे. यामुळे चर्चेला उधाण आलं होतं. भेटीनंतर अमोल कोल्हेंनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

क्रीडा अकादमीच्या बहाण्याने १८ लाखांची फसवणूक, श्रीसंतवर गुन्हा दाखल

भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीसंतने अकादमी सुरू करण्याच्या बहाण्याने उत्तर केरळ येथील कन्नूर जिल्ह्यातील एका गुंतवणूकदाराची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यासह इतर दोघांवरही गुन्हे दाखल झाले आहेत.सुरेश गोपालन यांनी ही तक्रार केली होती. ते चुंडा येथील रहिवासी असून आरोपी राजीव कुमार आणि व्यंकटेश किणी यांनी २५ एप्रिल २०१९ पासून कर्नाटकातील कोल्लूर येथे स्पोर्ट्स अकादमी बांधणार असल्याचे सांगून विविध तारखांना १८.७० लाख रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. यामध्ये श्रीसंतही भागिदार आहे. सरेश गोपालनने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, अकादमीमध्ये भागीदार बनण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी पैसे गुंतवले.

भारत-कॅनडा संबंध सुधारले? कॅनेडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा सुरू 

खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. ट्रुडो यांच्या या आरोपानंतर भारत आणि कॅनडामधील राजनैतिक संबंध ताणले गेले आहेत. जस्टिन ट्रुडो सातत्याने भारतावर आरोप करत आहेत, तसेच आपल्याकडे भारताविरोधातले पुरावे असल्याचा दावा करत आहेत. दुसऱ्या बाजूला भारताने ट्रुडो यांचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, भारताने २१ सप्टेंबर रोजी कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याची सेवा तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या दोन महिन्यांपासून ही सेवा बंद होती. परंतु, भारताने आता कॅनेडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमधील संबंध सुधारत असल्याचं दिसू लागलं आहे. यावर भारताचे परराष्ट्रंत्री एस. जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती फातिमा बिवी यांचं निधन

सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या भारताच्या पहिला महिला जज अर्थात जस्टिस एम. फातिमा बिवी यांचं निधन झालं. त्या ९६ वर्षांच्या होत्या. देशातल्या महिलांसाठी त्या आदर्श ठरल्या. तसंच त्यांची वकिली क्षेत्रातली कामगिरीही उल्लेखनीय ठरली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून जेव्हा त्या निवृत्त झाल्या त्यानंतर त्या तामिळनाडूच्या राज्यपालपदीही विराजमान झाल्या होत्या. राजकीय क्षेत्रातही त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला होता.

डीपफेकला रोखण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल

गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांचे डीपफेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर वावरणाऱ्या प्रत्येकासाठी ही धोक्याची घंटा आहे. डीपफेकचं जाळं पसरत गेलं तर सामान्य कुटुंबातील महिलांनाही याची झळ बसू शकते. यावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने पावलं उचलली आहेत. याबाबत आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस टूल्सवर काम करणाऱ्या कंपन्या सहभागी होत्या.डीपफेक प्रकाराला आळा घालण्यासाठी सरकार पातळीवर नियमन केलं जाणार आहे. त्यासाठी मसुदा तयार केला जाणार आहे. याबाबत माहिती देताना माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, डीपफेक लोकशाहीसाठी एक नवीन धोका आहे. त्यामुळे डीपफेक तयार करणारे आणि ज्यावर हे व्हायरल झालंय त्या प्लॅटफॉर्मची अशा सामग्रीची जबाबदारी असेल.

लोकसभा पोर्टलच्या वापरापासून ते प्रश्न विचारण्यापर्यंत, खासदारांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचे आरोप झाल्यानंतर आता खासदारांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. त्यामुळे आता केवळ खासदारच लोकसभा पोर्टलचा वापर करू शकतील. ते त्यांच्या लॉग इन आयडीसह इतर माहिती कोणाशीही शेअर करू शकत नाहीत. तसेच त्यांना गोपनीयता बाळगण्यास सांगितलं आहे. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपांनंतर तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी मान्य केलं की त्यांनी लोकसभा पोर्टलचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड दर्शन हिरानंदानी यांना दिला होता. हेच दर्शन हिरानंदानी महुआ मोइत्रा यांच्या वतीने लोकसभेत प्रश्न विचारत होते, असा आरोपदेखील करण्यात आला आहे. याप्रकरणी मोइत्रा यांची चौकशी चालू आहे.

“…म्हणून भारत वर्ल्डकप फायनल हरला”, इंदिरा गांधींचा उल्लेख करत आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२३ च्या अंतिम फेरीत (१९ नोव्हेंबर) भारताला ऑस्ट्रेलियाकडून सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या भारताच्या या दारूण पराभवाने चाहत्यांना आश्चर्यचकित केलं. भारतच विश्वविजेता होईल, असं जगभरातल्या क्रिकेटरसिकांना वाटत होतं. परंतु, ऑस्ट्रेलियाने बलाढ्य भारतीय संघाला पराभूत केलं. दरम्यान, या सामन्याचं अहमदाबादमध्ये आयोजन केल्यामुळे बीसीसीआयवर टीका होत आहे. तर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पनवती म्हणत टोला लगावला आहे. दरम्यान, आता भाजपाने या पराभवाचं खापर गांधी घराण्यावर फोडलं आहे.भारताच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवाबाबत आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते हिंमत बिस्व सर्मा यांनी एक हास्यास्पद वक्तव्य केलं आहे. तेलंगणातील निवडणूक प्रचारसभेत बोलताना सरमा यांनी इंदिरा गांधींच्या जयंतीचा आणि भारताच्या पराभवाचा संबंध जोडून वक्तव्य केलं आहे. सरमा म्हणाले, इंदिरा गांधींच्या जयंतीच्या दिवशी अंतिम सामना खेळवण्यात आला आणि भारताचा पराभव झाला. म्हणूनच मी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला विनंती करतो की, पुढच्या वेळी असा अंतिम सामना असेल तेव्हा काळजी घ्या की तो दिवस गांधी घराण्याशी संबंधित नसावा.

घरी सुरु होती लग्नाची तयारी, दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झाले कॅप्टन शुभम गुप्ता

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सामना करताना कॅप्टन शुभम गुप्ता शहीद झाले. या घटनेची बातमी कळताच शुभम गुप्ता यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कारण शुभम गुप्ता यांच्या लग्नाची तयारी त्यांच्या घरी सुरु होती. मात्र याच घरावर शोककळा पसरली. मुलगा घरी येईल आणि त्याचं लग्न होईल ही वाट पाहणारे त्यांचे कुटुंबीय आता त्यांच्या पार्थिवाची वाट बघत आहेत.शुभम गुप्ता शहीद झाल्याची बातमी आली आणि त्यांचे कुटुंबीय खूप दुःखी झाले. शुभमच्या आईची शुद्ध हरपली. त्यांचे वडील वसंत गुप्ता म्हणाले मी जेव्हा जेव्हा शुभमला लष्कराच्या गणवेशात बघायचो तेव्हा मला अभिमान वाटायचा. तो घरी आला की आम्ही त्याचं लग्न करणार होतो असं माध्यमांना सांगितलं आहे. आग्र्याचे भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री एस. पी. बघेल यांनी शुभम गुप्ता यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.

पंजाब, हरियाणात ‘एनआयए’चे छापे; अमेरिकेतील भारतीय वाणिज्य दूतावास हल्ला

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर या वर्षी झालेल्या हल्ल्याच्या तपासासंदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी पंजाब आणि हरियाणामधील १४ ठिकाणी छापे टाकले. ‘एनआयए’च्या प्रवक्त्याने ही माहिती देताना सांगितले, की १९ मार्च आणि २ जुलै रोजी अमेरिकेत झालेल्या हल्ल्यांमागील संपूर्ण कट उघड करण्यासाठी दोन्ही राज्यांत छापे टाकण्यात आले.

नाणेफेक जिंकून टीम इंडियाने घेतला गोलंदाजीचा निर्णय

एकदिवसीय विश्वचषक २०२३ नंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-२० सामन्यांची मालिका सुरू होत आहे. दोन्ही संघ युवा खेळाडूंसह क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करतील. डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियम विशाखापट्टणम येथे दोन्ही संघ पहिल्या टी-२० सामन्यासाठी आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळलेले बहुतांश खेळाडू या मालिकेचा भाग नाहीत. अशा स्थितीत युवा खेळाडूंना चांगली कामगिरी करून टीम इंडियातील आपला दावा मजबूत करण्याची संधी आहे.

SD Social Media

9850603590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.