आज दि.२२ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

‘स्वआधार’ला शासनाचा बालस्नेही पुरस्कार; बालकांच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल

अत्याचारपीडित, मतिमंद मुलींच्या शिक्षण, पालनपोषणाची जबाबदारी घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे तसेच अत्याचारपीडितांच्या पालकांना येणार्‍या अडचणीत मदत करणार्‍या आळणी येथील तुळजाई प्रतिष्ठान संचलित स्वआधार मतिमंद मुलींच्या बालगृहाला राज्य बालहक्क संरक्षण आयोग, महिला व बालविकास आयुक्तालय आणि युनिसेफ यांच्यावतीने राज्यस्तरीय बालस्नेही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.बालकांच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात बुधवार, २२ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात महिला व बालविकासमंत्री महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार, राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुसिबेन शहा, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, विभागीय उपायुक्त हर्षा देशमुख यांच्या हस्ते संस्थेच्यावतीने सचिव शहाजी चव्हाण, प्रकल्प संचालक गुरूनाथ थोडसरे, मानसोपचारतज्ञ रूपाली कांबळे, शिक्षिका वैशाली पोफळे यांनी राज्य शासनाचा बालस्नेही पुरस्कार स्वीकारला.

आकाशात विविध नजाऱ्यांची उधळण, मनमोहक कार्तिक सोहळ्याची पर्वणी

गुलाबी थंडीच्या दिवसांत आकाशात विविध नजाऱ्यांची उधळण अनुभवता येणार आहे. या अनोख्या उत्सवात सहभागी होऊन आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले.चांद्रमासात येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला चंद्र त्या संबंधित नक्षत्राच्या जवळ असतो. या कार्तिक पौर्णिमेला चंद्र सहा ताऱ्यांनी एकत्रित बनलेल्या कृतिका नक्षत्रात पाहता येईल. निरभ्र आकाशात शनिवारी सायंकाळी पूर्व क्षितिजावर गुरु-चंद्र एकमेकांजवळ तर आकाश मध्याशी शनी ग्रह व पश्चिमेस बुध ग्रह बघता येईल. यावेळी पश्चिम ते पूर्व आकाशात अनुक्रमे धनु, मकर, कुंभ, मीन, मेष, वृषभ या सहा राशी दिसतील. दर दोन तासांनी एकेका राशीचा उदय पूर्वेस तर अस्त पश्चिमेस होत असतो. मध्यरात्रीच्या सुमारास पूर्व क्षितिजावर उदित होणारे मृग नक्षत्र पहाटे पश्चिमेस येत असून यावेळी मृग नक्षत्रातील लाल रंगाची काक्षी, व्याध ही सर्वात तेजस्वी तारका आणि प्रश्वा या तीन ताऱ्यांचा समभूज त्रिकोण पाहता येईल. तसेच प्रश्वा व गोमेईझा आणि मिथुन राशीतील ‘कॅस्टर’ व ‘पोलूक्स’ या चार ताऱ्यांच्या समांतरभूज चौकोनास आकाशातील स्वर्गव्दार अर्थात चंद्र, सूर्य आणि ग्रहांचा भ्रमणमार्ग बघता येणार आहे.

भारतात परतताच चंद्रशेखर बावनकुळेंनी ‘त्या’ फोटोप्रकरणी दिली प्रतिक्रिया

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पर्यटनावर असताना त्यांचा कॅसिनोतील एक फोटो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्हायरल केला. महाराष्ट्र जळत असताना राज्यातील नेता मकाऊमध्ये असल्याची एक्स पोस्ट त्यांनी केली होती. त्या फोटोवरून राज्यात प्रचंड राजकारण झालं. तसंच, राऊंतांनी त्यांच्यावर गंभीर आरोपही केले. आता या सर्व प्रश्नांवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते भारतात परतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मागच्या ३४ वर्षांपासून राजकीय, सामाजिक जीवनात आहे. भाजपा-शिवसेना युतीत अनेक वर्षे काम केले. शिवसेनेतील अनेक नेते मला ओळखतात. विधिमंडळात अनेक मित्र मंडळी आहेत. चारवेळा आम्ही निवडून आलो आहोत. अशा फोटोंच्या आधारावर कोणाची इमेज खराब करता येत नाही, असं मला वाटतं. ३४ वर्षे काम करून आम्ही इमेज तयार केली आहे. त्यामुळे हा प्रयत्न केला असेल तर त्यांचा प्रयत्न त्यांना लखलाभ.

मध्‍य रेल्‍वेचा सौर ऊर्जेवर भर, ८.११ मेगावॅट क्षमता स्‍थापित

भारतीय रेल्वेने सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या उद्देशाने सौर पॅनेल लावण्यावर भर दिला आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून मध्‍य रेल्वेने आतापर्यंत छतावर सौरऊर्जा (रुफटॉप सोलर) निर्मिती पॅनेलच्‍या माध्‍यमातून ८.११ मेगावॅट ऊर्जा निर्मिती स्‍थापित केली असून अतिरिक्‍त ४ मेगावॅटचे लक्ष्‍य ठेवण्यात आले आहे.ऑक्‍टोबर महिन्‍यात मध्‍य रेल्‍वेच्‍या विविध स्‍थानकांवर ८५ किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल बसविण्‍यात आले आहेत. मुंबई विभागातील कळंबोली येथे २० किलोवॅट, पुणे विभागातील रुकडी येथे २० किलोवॅट आणि मसूर येथे २५ किलोवॅट, नागपुर विभागातील चांदूर बाजार येथे २० किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्‍प स्‍थापित करण्‍यात आले आहेत. विविध ८१ ठिकाणी १ मेगावॅट क्षमतेच्‍या सौर ऊर्जा प्रकल्‍पांसाठी कामे सुरू करण्‍यात आली आहेत. नागपूर विभागातील अजनी येथे १ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्‍प उभारला जात आहे. पुणे विभागामध्‍ये १ मेगावॅटचा प्रकल्‍प प्रगतीपथावर आहे. रेल्‍वेची विनावापर आणि मोकळी जागा सौर ऊर्जा प्रकल्‍पांच्‍या उभारणीसाठी शोधली जात आहे.

धनगर आरक्षण मोर्चात दगडफेक; जालना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहनांचे नुकसान

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान दगडफेक झाली. या दगडफेकीत वरिष्ठ अधिकाऱ्याच्या गाडीच्या तसेच कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या प्रकरणी तालुका जालना पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून मोर्चातील दहा जणांना ताब्यात घेतले आहे.

दूध दरवाढ बैठक निष्फळ; दरवाढीचा शासन आदेश अमान्य; २४ नोव्हेंबर रोजी दूध उत्पादकांचे आंदोलन 

राज्यात दूध खरेदीच्या दरात वाढ करण्याचा शासनाचा आदेश दूध संघांनी मंगळवारी फेटाळून लावला. त्यावर सरकारने घेतलेल्या धोरणामुळे नाराज झालेल्या दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सह्याद्री अतिथिगृहासमोरच शासन निर्णयाची होळी करीत येत्या २४ नोव्हेंबर रोजी राज्यभरात दूध संकलन केंद्रासमोर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.  राज्यात दूध संघ व कंपन्यांनी संगनमत करून दुधाचे भाव पाडल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हस्तक्षेप केला होता. दुधाच्या चढउतारामुळे निर्माण होणारी अस्थिरता संपविण्यासाठी दुग्धविकास विभागाने दुधाचे खरेदी दर निश्चित करण्यासाठी समिती नेमली होती. 

”…तर फाशी द्या, आम्ही तयार, खोटा प्रचार करत नाही”; रामदेव बाबा यांनी स्पष्टच सांगितलं

इंडियन मेडिकल असोसिएशन आणि रामदेव बाबा यांची पतंजली आता एकमेकांसमोर येऊन उभे ठाकले आहेत. एक दिवस अगोदर सुप्रीम कोर्टाने रामदेव यांच्या पतंजतीला दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर फटकारले होते. त्यानंतर बुधवारी पत्रकार परिषदेत रामदेव बाबा म्हणाले की, आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो. खोट्या जाहिराती किंवा अपप्रचार केल्यास आम्हाला कोट्यवधी रुपयांचा दंड आणि फाशीची शिक्षा द्यावी. आक्षेप घेतला जाणार नाही. आम्ही खोटा प्रचार करत नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले. पत्रकारांना संबोधित करताना ते म्हणाले की, काही लोक पतंजलीविरोधात खोटा प्रचार करीत आहेत. अॕलोपॅथी आणि आधुनिक वैद्यकशास्त्राचे पुरस्कर्ते खोटेपणाचा प्रचार करत आहेत. न्यायालयासमोर शेकडो रुग्ण उभे करू शकतो. आम्ही ते सर्व रिपोर्ट आणि संशोधन न्यायालयात दाखवण्यास तयार आहोत, ज्याबद्दल आम्ही नेहमी सांगत आलो आहोत, असंही रामदेव बाबा म्हणालेत.

“मला लाथा-बुक्क्यांनी मारलं…”, गौतम सिंघानियांवर नवाज मोदींचे खळबळजनक आरोप

प्रसिद्ध उद्योगपती आणि रेमंड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांच्या घटस्फोटाची देशभर चर्चा चालू आहे. गौतम सिंघानिया लग्नाच्या ३२ वर्षांनंतर पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांना घटस्फोट देणार आहेत. त्यांच्या पत्नीने घटस्फोटासाठी मोठ्या अटीदेखील ठेवल्या आहेत. नवाज मोदी यांनी गौतम सिंघानिया यांच्याकडे त्यांच्या एकूण संपत्तीपैकी ७५ टक्के रक्कम मागितली आहे. दरम्यान, नवाज मोदी यांनी गौतम सिंघानिया यांच्यावर मारहाणीचे आरोप केले आहेत. नवाज मोदी यांनी सांगितलं की, आतापर्यंत तीन वेळा गौतम सिंघानिया यानी त्यांना जबर मारहाण केली आहे.

१८ मीटरचं खोदकाम बाकी, ४१ मजूर उद्या सकाळपर्यंत बाहेर येणार?

उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगद्यामध्ये अडकलेले ४१ कामगार सुरक्षित असल्याची चित्रफीत मंगळवारी ‘एनडीएमए’ने (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) जारी केली. सर्व कामगार सुखरूप असून आता त्यांच्या सुटकेसाठी नवी मोहीम हाती घेण्यात आली आहे. बचाव पथकांनी मंगळवारपासून आडव्या दिशेने खोदकाम करण्यास सुरूवात केली आहे. ‘बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी एकाच वेळी पाच आघाड्यांवर प्रयत्न चालू आहेत. सध्याच्या परिस्थितीत उभ्या दिशेने खोदकाम करताना खडक लागत असल्यामुळे आडव्या दिशेने खोदण्यावर भर दिला जात आहे. या बचाव मोहीमेचा आजचा ११ वा दिवस आहे.

कॅनेडियन नागरिकांना भारताचा दिलासा

खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. या आरोपानंतर भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील राजनैतिक संबंध ताणले गेले आहेत. जस्टिन ट्रुडो सातत्याने भारतावर आरोप करत आहेत, तसेच त्यांच्याकडे भारताविरोधातले पुरावे असल्याचा दावा करत आहेत. भारताने ट्रुडो यांचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, भारताने २१ सप्टेंबर रोजी कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याची सेवा तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या दोन महिन्यांपासून ही सेवा बंद आहे. दरम्यान, भारताने आता कॅनेडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहे. सूत्रांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

मोहम्मद शमी आजारी आईला पाहताच झाला भावूक, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी विश्वचषक स्पर्धेनंतर आपल्या घरी परतला आहे. शमीने आईबरोबरचा एक फोटोही शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना शमीने लिहिले की, त्याची आई त्याच्यासाठी खूप आहे. आई लवकरच बरी होईल, अशी आशाही शमीने व्यक्त केली आहे. या फोटोमध्ये शमी आईला मिठी मारताना दिसत आहे.मोहम्मद शमीने एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये चमकदार कामगिरी केली आणि सर्वाधिक २४ विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्या चार सामन्यांमध्ये शमीला खेळण्याची संधी मिळाली नाही, असे असतानाही त्याने सर्वांना मागे टाकत विकेट्स घेण्याच्या शर्यतीत पहिला आला. भारतीय भूमीवर वेगवान गोलंदाजाची ही कामगिरी अविश्वसनीय आहे. शमी हा वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.

रोहित शर्मा कर्णधारपदावरून पायउतार होणार? BCCI शी बैठकीनंतर निर्णयाची शक्यता

विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघामध्ये निराशेचं वातावरण पाहायला मिळालं होतं. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनंही प्रशिक्षकपदावर कायम राहण्याबाबत निर्णय घेतला नसल्याचे सूतोवाच केले होते. त्यापाठोपाठ आता भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा एकदिवसीय व टी २० कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. रोहित शर्माची लवकरच BCCI बरोबर महत्त्वपूर्ण बैठक होणार असून त्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

SD Social Media

9850603590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.