लाच प्रकरणातील संशयित शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर कारागृहात

आठ लाखांच्या लाच प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर (Vaishali Veer-Zankar) यांची अखेर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. छातीत दुखत असल्याचं कारण सांगून त्या रुग्णालयात अॅडमिट झाल्या होत्या, मात्र रात्री त्यांची रवानगी कारागृहात झाली. शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानला मंजुरी देण्यासाठी 8 लाख रुपयांची लाच घेताना नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर पकडल्या गेल्या आहेत. झनकर यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

याआधी वैशाली वीर-झनकर यांच्या चार दिवसांच्या पोलीस कोठडीपैकी दोन दिवस त्यांचा मुक्काम रुग्णालयात गेला होता. त्यानंतर बुधवारी अंतरिम जामीन अर्ज फेटाळून कारागृहात रवानगी करण्याचे आदेश मिळताच वैशाली वीर यांच्या छातीत ‘कळ’ आली. त्यामुळे त्या बुधवारी पुन्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. या प्रकरणातील दोन संशयित आरोपी चालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20 टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी 8 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून ही लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले होते. शिक्षण विभागातील मोठ्या पदावरील अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर जिल्हा परिषदेत चर्चेला उधाण आलं. झनकर यांच्यासह यात वाहन चालक आणि एका प्राथमिक शिक्षकाचा सहभाग आहे.

आरोपी शिक्षणाधिकाऱ्यांनी एका संस्था चालकांकडे सरकारकडून मिळणारं 20 टक्के अनुदान मंजूर करण्यासाठी ही लाच मागितली होती. संस्था मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरु करण्याच्या ऑर्डरची मागणी करत होती. ही ऑर्डर करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेकडून सुमारे 9 लाख रुपयांची लाच मागितली. यावेळी तक्रारदारांनी तडजोडीअंती 8 लाख रुपये देण्याचे कबूल केले. मंगळवारी (10 ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचला ठाणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने झनकर यांना अटक केली होती. (फोटो क्रेडिट गुगल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.