अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल सलीम फ्रुटने एनआयएच्या चौकशीत अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. सलीम फ्रुट हा दाऊदच्या जवळचा छोटा शकील याचा मेहुणा आहे. 2014 साली अनिस इब्राहिमच्या मुलीसाठी दागिने, लग्नाचा लेहेंगा आणि दाऊद इब्राहिमचा सूट मुंबईच्या नागपाड्यामध्ये बनवण्यात आला. अनिस इब्राहिमच्या सांगण्यावरूनच त्याच्या मुलीचा लेहेंगा आणि दाऊदचा सूट घेऊन उमराहच्या नावाने सौदी अरबला निघालो आणि कराचीमध्ये उतरून अनिस इब्राहिमच्या मुलीच्या लग्नात गेलो, असंही सलीम फ्रुटने सांगितलं. सलीम फ्रुटची पत्नीही या लग्नाला नेपाळ मार्गे कराचीला अनिस इब्राहिमच्या मुलीचे दागिने घेऊन पोहोचली. एनआयएच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
अनिस इब्राहिमच्या लग्नाच दाऊदचा भाऊ नूरा याच्यासह संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. याचसोबत आयएसआयचे मोठे अधिकारीही लग्नाला आले होते. दाऊदने या लग्नात भारतातून बनवण्यात आलेला सूट घालून कमांडोंच्या सुरक्षेमध्ये काही वेळ आला होता. दाऊद जवळ जाणं शक्य नव्हतं, त्यामुळे मी त्याला लांबूनच बघितल्याचंही सलीम फ्रुटने एनआयएला सांगितलं.
सलीम फ्रुटचे वकील काय म्हणाले?
सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुटने एनआयएसमोर केलेले खुलासे कोर्टामध्ये स्वीकार्य नाहीत, त्यामुळे या वक्तव्यांना काहीही अर्थ नाही. एनआयए दुसऱ्या कोणी तरी केलेली वक्तव्य आणि अफवांचा आधार घेऊन ही वक्तव्य सलीम फ्रुटची असल्याचं सांगत आहे, असा दावा सलीम फ्रुटचे वकील विकार राजगुरू यांनी केला.
सलीम फ्रुट दाऊदचे कपडे घेऊन गेला, हे एनआयए कसं सिद्ध करणार? कोर्टामध्ये मी माझं म्हणणं मांडेन तेव्हा बऱ्याच गोष्टींचा खुलासा करेन, असं सलीम फ्रुट म्हणाला आहे. सलीम फ्रुटच्या वक्तव्याच्या नावाखाली मीडिया ट्रायल सुरू आहे, असा आरोपही सलीम फ्रुटच्या वकिलांनी केला.