काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष गांधी कुटुंबाबाहेरचा असणार? या प्रश्नावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी उत्तर दिलं आहे. मुख्य म्हणजे अशोक गहलोत हे काँग्रेस अध्यक्ष होण्याच्या रेसमध्ये सगळ्यात पुढे आहेत, पण अशोक गहलोत यांनी मात्र राहुल गांधींना अध्यक्ष करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले जातील, असं उत्तर दिलं आहे. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत राहुल गांधींना अध्यक्ष होण्यासाठी मनवण्याचा प्रयत्न करू. काँग्रेस कार्यसमितीची बैठक 28 ऑगस्टला बैठक होणार आहे, या बैठकीत त्यांनी अध्यक्ष व्हावं, ही आमची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया अशोक गहलोत यांनी दिली.
‘जर राहुल गांधी अध्यक्ष बनले नाहीत तर अनेक लोक निराश होतील आणि घरी बसतील,’ असंही गहलोत म्हणाले. गहलोत यांचं हे वक्तव्य जेव्हा त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर आलं आहे. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये काँग्रेस अध्यक्षाच्या निवडीबाबत चर्चा झाली असल्याचं बोललं जातंय. अशोक गहलोत यांना काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष गांधी कुटुंबाबाहेरचा असेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा काँग्रेसमधल्या कुणी तुम्हाला हे सांगितलं आहे का? जोपर्यंत अधिकृतरित्या कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणतंही वक्तव्य करू शकत नाही, असं गहलोत यांनी सांगितलं.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी माझं नाव बऱ्याच काळापासून मीडियामध्ये सुरू आहे, पण निर्णय काय होणार, काय होणार नाही, कुणालाही माहिती नाही, अशी सावध प्रतिक्रिया गहलोत यांनी दिली. सोनिया गांधी उपचारांसाठी परदेशात गेल्या आहेत, त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी मी त्यांची भेट घेतल्याचंही गहलोत यांनी स्पष्ट केलं. मी आणि वेणुगोपाल गुजरातमध्ये जात आहोत, यासाठी आम्ही सोनिया गांधींचा आशिर्वाद घेतला, असं गहलोत म्हणाले.
‘मला दोन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. एक तर गुजरातसाठी मला वरिष्ठ पर्यवेक्षक करण्यात आलं आहे. याशिवाय मी राजस्थानचा मुख्यमंत्रीही आहे, या दोन्ही जबाबदाऱ्या मी पार पाडणार आहे. राजस्थानमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार कसं येईल यासाठी माझा प्रयत्न असेल,’ असं विधान अशोक गहलोत यांनी केलं.