फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांना त्यांच्या देशातील तरुणाने भररस्त्यात एकच श्रीमुखात लगावली. कोरोना संकटात सर्वस्व गमावल्याचा आणि फ्रान्समध्ये लसीकरणाचा बोजवारा उडाल्याचा राग त्याच्या मनात उफाळून आला आणि त्याने हे कृत्य केले. या कृत्याचा निषेधच व्हायला हवा, पण जनतेच्या संयमाचा कडेलोट होणार नाही याची काळजी राज्यकर्त्यांनीही घ्यायला हवी. मॅक्रॉन यांच्याबाबत जे घडले त्याचा हाच संदेश आहे, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
अन् फाडकन मॅक्रॉन यांच्या श्रीमुखात भडकावली…!
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांना त्यांच्याच देशात एका तरुणाने भररस्त्यात श्रीमुखात भडकावली आहे. श्रीमुखात हा सभ्य संस्कारातील शब्द आहे. आपल्या भाषेत ‘थप्पड’ लगावली, थोबाड फोडले, कानफट रंगवले असे बरेच काही सांगता येईल. अध्यक्षांच्या कानफटात भडकावणे हा त्या देशाचाच अपमान आहे, पण असे माथेफिरू अनेक देशांत जागोजाग निपजत असतात. तैन-आय हर्मिटेज या छोट्या शहरात मॅक्रॉन एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी पोहोचले. तेथे जनतेच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असताना एक व्यक्ती पुढे आली. त्याने राष्ट्राध्यक्षांच्या अंगरक्षकांनाही जुमानले नाही व फाडकन मॅक्रॉन यांच्या श्रीमुखात भडकावली.
फ्रान्स हा लोकशाहीप्रधान देश आहे. संसदीय लोकशाहीस तेथे मोलाचे स्थान आहे. मॅक्रॉन हे निवडणुकीत विजयी होऊन राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. मॅक्रॉन हे कुणाला आवडत नसतील तर त्यांच्यावर टीका होऊ शकते, पण देशाच्या अध्यक्षांवर हल्ला करून लोकशाहीचा गळा आवळण्याचा हा प्रकार आहे. यापूर्वी अनेक देशांत अनेक राज्यकर्त्यांनीही अशा श्रीमुखातील भेटी स्वीकारल्या आहेत.