गुजरातमधील समुद्रात मासेमारी करणाऱ्या 2 बोटी आणि त्यावरील 16 मासेमारी खलाश्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. 16 पैकी 7 खलाशी हे पालघरमधील असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या समुद्रात मासेमारी करणाऱ्या 2 बोटी आणि त्यावरील 16 खलाश्यांना पाकिस्तान सैनिकांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या खलाश्यांमध्ये 7 खलाशी हे पालघरमधील आहेत. गुजरातमधील ओखा येथील मत्स्यगंधा आणि अन्य एक बोट मासेमारीसाठी गेली असता पाकिस्तान सैनिकांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तान मधील मेरिटाईम सेक्युरिटी एजन्सी ही कारवाई केल्याचं सांगितलं जातं असून पाकिस्तान इंडिया पीपल्स फॉर्म फॉर पीस एन्ड डेमोक्रॅसी संस्थेचे माजी सचिव जतीन देसाई यांनी ही माहिती दिली आहे.
गुजरात पाकिस्तान सीमेलगत असल्याने गुजरातमधील अनेक मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या बोटींवर पाकिस्तानकडून अशी कारवाई करण्यात येते. मासेमारीच्या शोधात खोल समुद्रात गेल्यावर सीमा ओलांडल्याने ही कारवाई करण्यात येते. तर याआधी अनेक वेळा भारतीय सीमेत असताना देखील पाकिस्तानी सैनिकांकडून अशी कारवाई करण्यात आली आहे.
पालघरमधील डहाणू , तलासरी विक्रमगड या दुर्गम भागातील अनेक नागरिक हे गुजरात मधील मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करतात. पालघरच्या ग्रामीण भागात नागरिकांना रोजगार नसल्याने पावसाळ्यानंतर मासेमारी सुरू होताच पालघरच्या ग्रामीण भागातील शेकडो खलाशी हे गुजरातमध्ये रोजगारासाठी जात असतात. या पैकी 7 खलाश्यांचा पाकिस्तानने आज केलेल्या कारवाईत समावेश असून कारवाई अडकलेल्या खलाशींची कुटुंब सध्या चिंचेत आहेत. मागील काही काळात पालघरचे तत्कालीन दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या पाठपुराव्यानंतर काही खलाशांची पाकिस्तान सरकारकडून सुटका करण्यात आली होती.