कोरोनामुळे निर्बंधाच्या कचाट्यात अडकलेल्या जनतेची आता निर्बंधातून लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याने केंद्राकडून राज्यांना निर्बंध शिथिल करण्याच्या सूचना केल्या आहेत.
जवळपास गेल्या तीन वर्षांपासून कोरोनाने (Coronavirus) देशातील नागरिकांना हैराण केले आहे. दरम्यान सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. कोरोनाच्या कमी होणाऱ्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना (State Government) कोरोना निर्बंधाबाबत सूचना केल्या आहेत. राज्य कोरोनावरील कडक निर्बंधाबाबत पुर्नविचार करु शकता आणि अनावश्यक निर्बंध दूर करुन दिलासा देऊ शकतात, याबाबतचे पत्र केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या सचिवांना लिहिले आहे.
केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांना तसे पत्र लिहिले आहे. देशातील कोरोना रुग्णआलेख घसरला आहे. त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्या आणि चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या प्रमाणाचा आढावा घेऊन कोरोनाचे अतिरिक्त निर्बंध मागे घ्यावेत. निर्बंध शिथिल केले तरीही पंचसुत्रीचे पालन करणे महत्त्वाचे असल्याचंही त्यांनी म्हटले आहे. यामुळे मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळावं लागणार आहे. यासाठी 5 टप्प्याचे धोरणाचीही अंमलबजावणी करता येऊ शकते. यासाठी राज्य टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, वैक्सीनेशन आणि कोरोना अनुरुप व्यवहार यासारखे नियम लावण्यात येऊ शकतात.