आज दि.३ फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

दहावी आणि बारावीच्या
परीक्षा ऑफलाइन होणार

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. तसंच दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. दहावीची लेखी ऑफलाइन परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे. त्याची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ दरम्यान होणार आहे. बारावीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्च दरम्यान होणार असून १४ ते ३ मार्चदरम्यान श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा होईल अशी माहिती शरद गोसावी यांनी दिली आहे.

कोणत्या राजकारण्याचा मुलगा
दारु पित नाही त्याचं नाव सांगा : बंडातात्या

साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर म्हणाले, पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? असंही ते पत्रकारांना म्हणाले. तसंच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केला. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा असं आव्हानच त्यांनी पत्रकारांना दिलं. तसंच आपण नावं घेतली आहेत त्यांनी पुरावा मागितलं तर सिद्ध करु शकतो. सुप्रिया सुळेंनी बंडातात्या खोटं बोलत असल्याचे सांगितले.

देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं काम
जोरात, सुरत होणार पहिले स्थानक

देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं काम जोरात सुरू आहे. बुलेट ट्रेनसाठी तयार करण्यात आलेल्या मुंबई-अहमदाबाद मार्गादरम्यान बांधले जाणारे सुरत हे पहिले स्थानक असेल. एका अधिकाऱ्याने बुधवारी याबाबत माहिती दिली. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “चार स्थानकांवर (वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच) कामाला वेग आला आहे आणि ते डिसेंबर २०२४ पर्यंत तयार होतील. या चार स्थानकांपैकी सुरत हे तयार होणारे पहिले स्थानक असेल.

सरकारच्या विरोधात बोलले की
मोदींचा वेताळ, खांद्यावर बसतो

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू आणि व्यावसायिक प्रविण राऊत यांना ईडीनं अटक केल्यानंतर त्यावरून सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “राष्ट्रीय तपास यंत्रणा ‘विक्रम आणि वेताळ’च्या वेताळासारख्या आहेत. फरक हाच की विक्रम बोलला तर वेताळ खांद्यावरून उडून जायचा. मोदींचा वेताळ, मोदी सरकारच्या विरोधात बोलले कि बोलणाऱ्याच्या खांद्यावर बसतो”, असं सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

राज्यघटना पुन्हा लिहण्याची
मोहीम सुरू करणार : चंद्रशेखर

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यघटना पुन्हा लिहण्याबाबत मोहीम सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी ते देशातील अनेक नेत्यांना भेटणार आहेत. “आम्हाला भारतात नवीन राज्यघटना तयार करायची आहे. आता भारतात संविधानाचे पुनर्लेखन करण्याची गरज आहे. मी सर्व नेत्यांना भेटून माझी मते सांगणार आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या फोनमुळे 10 पोलीस
उपायुक्तांच्या बदल्या रद्द : सीताराम कुंटे

राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या फोनमुळे परमबीर सिंग यांनी 10 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द केल्या होत्या असा गौप्यस्फोट सीताराम कुंटे यांनी केला आहे. पोलीस बदल्यांबाबत सीताराम कुंटे यांनी ईडीसमोर जबाब नोंदवला आहे. परमबीर सिंग यांनी आपल्या जबाबात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं होतं. आता कुंटे यांच्या जबाबामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जात आहे.

पतंजलीने आता स्वतःचे
क्रेडिट कार्ड केले लॉन्च

योग आणि आयुर्वेदाने जगभरात ओळख निर्माण केल्यानंतर पतंजलीने आता स्वतःचे क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. ही क्रेडिट कार्डे पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेड (PAL) ने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या भागीदारीसह लॉन्च केली आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या RuPay प्लॅटफॉर्मवर को-ब्रँडेड क्रेडिट कार्डे ऑफर केली जातात आणि PNB RuPay Platinum आणि PNB RuPay सिलेक्ट या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.

राणीच्या बागेसाठी
११५.४६ कोटींची तरतूद

मुंबईतल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच प्रसिद्ध राणीच्या बागेसाठी ११५.४६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्या अंतर्गत आता राणीच्या बागेत जिराफ, झेब्रा सारखे विदेशी प्राणीसुद्धा आणण्यात येणार आहेत. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय यांच्या आधुनिकीकरण प्रकल्पाची कामे टप्याटप्याने केली जात आहेत. सन २०२०-२१ मध्ये दुसऱ्या टप्यातील विकास कामांकरिता १४३ कोटी इतका खर्च करण्यात आला आहे.

तीन ट्रेकर्स डोंगरावरून कोसळले
दोन ठार एक गंभीर जखमी

चांदवड तालुक्यातील हबडीच्या शेंडी डोंगरावर ट्रेकिंग करताना तीन ट्रेकर्स डोंगरावरुन कोसळल्याची घटना घडली आहे. तिघांपैकी दोन तरुण ठार झाले असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रॅपलिंग करताना डोंगरावरुन तिघे कोसळल्याची घटना घडली. अहमदनगर येथून 8 मुली व 7 मुले असे एकूण 15 जण ट्रेकिंग करण्यासाठी या शेंडीच्या डोंगरावर आले होते. यावेळी ही घटना घडली आहे.

भारताच्या युवा संघाने
उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा

भारताच्या युवा संघाने जबरदस्त खेळ दाखवत वेस्ट इंडिज येथे सुरु असलेल्या अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. काल झालेल्या सेमीफायनलच्या दुसऱ्या लढतीत भारताच्या अंडर 19 टीमने ऑस्ट्रेलियावर तब्बल 96 धावांनी विजय मिळवला. भारताच्या विजयाचे नायक ठरले कॅप्टन यश धुल आणि शेख राशीद. या दोघांनी विजयाचा पाय रचला. यश धुलने कर्णधारपदाला साजेसा खेळ दाखवत (110) शानदार शतकी खेळी केली. त्याला राशीदने (94) साथ दिली. त्याचं शतक सहा धावांनी हुकलं.

टीम इंडिया विरुद्ध वेस्टइंडिज
यांच्यात 6 फेब्रुवारीपासून वनडे सीरिज

टीम इंडिया विरुद्ध वेस्टइंडिज यांच्यात 6 फेब्रुवारीपासून वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या काही खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाली आहे. टीम इंडिया आणि विंडिजमध्ये प्रत्येकी 3 सामन्यांची वनडे आणि टी 20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंना कोरोना झाल्याने मोठा फटका बसला आहे. वनडे आणि टी 20 सीरिजच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.