नाशिकच्या बाजारात गोल्डन मोदक दाखल, बारा हजार रुपये किलो

बाप्पांना विघ्नहर्ता (Ganesh Fest) म्हटलं जातं. त्यांच्या आगमनानं मरगळ, निराशेचं मळभ हटतं. आशेची पहाट उगवते. नेमकं अगदी असंच होतंय. कोरोनानं इतक्या दिवस थंड असलेल्या नाशिकच्या (Nashik) बाजारपेठेत चक्क 12000 रुपये किलोच्या सोन्याचा वर्ख असलेल्या मोदकांना (Gold modak) तुफान मागणी वाढलीय.

नाशिक तसं मनमौजी शहर. इथं कुठलाही सण असो की उत्सव अगदी यथासांग साजरा केला जातो. मग बाप्पांच्या स्वागताची बातच काही और. कोणी त्याला चारचाकीमध्ये वाजत-गाजत आपल्या घरी नेतं, तर कोणी त्यासाठी मोदकांची आरास करतं. शहरातल्या सागर स्वीट्समध्ये मात्र बाप्पांच्या स्वागतासाठी चक्क 25 प्रकारचे मोदक बनवण्यात आले आहेत. याची माहिती सागर स्वीट्सचे मालक दीपक चौधरी यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. चौधरी म्हणाले, ‘बाप्पाच्या आगमनानं बाजारपेठेत उत्साह संचारलाय. त्याच्या उत्सवात व्यापाराला गती आलीय. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पंचवीस मोदक तयार केलेत. त्यात काजू, बदाम, पिस्ता, चॉकलेट, बटरस्कॉच असे नाना प्रकारचे मोदक आम्ही तयार केलेत. या सर्वात जास्त मागणी आहे, ती सोन्याचा वर्ख असलेल्या मोदकांना. चांगल्या तुपात हे मोदक तयार केले आहेत. त्यामुळं ग्राहकांना ते खूप आवडतायत.’

सागर स्वीट हे नाशिकमधलं तसं जुनं मिठाई दुकान. जवळपास 1991 पासून चौधरी मिठाईच्या व्यवसायात आहेत. गणपती उत्सवाच्या काळात मोदकांच्या विविध प्रकारांना मागणी असते. हे ओळखून त्यांनी ग्राहकांची आवड जपली. येथे सध्या सोन्याचा वर्ख असलेल्या मोदकाचे किलोमागचे दर 12000 रुपये आहेत. इतर प्रकारच्या मोदकाचे दर चक्क 600 रुपये किलोपासून सुरू होतात. त्यात काजूच्या मोदकाचे दर हे सध्या किलोमागे 1500 रुपये आहेत.

सागर स्वीट्स हे नाशिकमधील खूप जुनं मिठाईचं दुकान आहे. आमच्या येथे लोक विश्वासानं येतात. त्यांना माहितंय की, इथं आपल्या जीभेची आवड पूर्ण होईल. गणेशोत्सव तर बाप्पांचा सर्वात मोठा सण. हे लक्षात घेता आम्ही मोदकाचे तब्बल 25 प्रकार तयार केलेत. विशेष म्हणजे यातल्या सोन्याच्या मोदकांचा भाव सर्वात जास्त असूनही, त्याची मागणी जास्त आहे. ग्राहकांना हे मोदक आवडतायत असे दीपक चौधरी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.