फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याचे सर्वाधिक उत्पादन हे महाराष्ट्रात आणि त्यापाठोपाठ गुजरातमधील जुनागढ येथे आहे. सर्वाधिक महागड्या आणि चवीला गोड असणाऱ्या हापूसचे व्यसन आता अमेरिकापाठोपाठ जपानमधील नागरिकांनाही लागले आहे. अॕग्रीकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्टस् एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अॕथॉरिटीने (अपेडा) मुंबईहून अल्फान्सो आणि केशर आंब्याची जपानला निर्यात केली जात आहे. हंगामातील निर्यातीची पहिली खेप नुकतीच पोहचली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त टोकियो येथे एक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील विविध स्टॉलमध्ये आंब्याचे प्रदर्शन केले जाणार आहे. दरवर्षी देशातून 400 कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला जातो. यामध्ये जपानचे योगदान खूपच कमी आहे. देशातून आंब्याची सर्वाधिक निर्यात ही संयुक्त अरब अमिरातीमध्ये होते. याशिवाय इंग्लंड, अमेरिका, सौदी अरेबिया, हाँगकाँग, इटली आणि स्वित्झर्लंड इत्यादी देशांतही आंब्याची निर्यात केली जाते. येथून दशहरी, चौसा, लमे, अल्फान्सो या आंब्यांना भरपूर मागणी आहे.
देशातून शेतीमालाची निर्यात केली जावे यासाठी अपेडा अर्थात अॕग्रीकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्टस् एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ही काम करीत आहे. यासाठी व्हर्च्युअल ट्रेड फेअर आयोजित करण्यासाठी व्हर्च्युअल पोर्टल विकसित करणे, शेतकरी कनेक्ट पोर्टल, ई-ऑफिसेस, क्षैतिज ट्रेसॅबिलिटी सिस्टम, खरेदीदार-विक्रेता भेट, रिव्हर्स खरेदीदार-विक्रेता भेट, उत्पादन विशिष्ट मोहिम या माध्यमातून निर्यात प्रोत्साहन उपक्रम राबवले जातात.
एवढेच नाही तर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि राज्यातून शेतीमालाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी अपेडा राज्य सरकारबरोबर काम करीत आहे. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील एक वैधानिक संस्था, अपेडा ही भारतीय कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न निर्यातीला चालना देणारी नोडल एजन्सी आहे. बागायती, फुलशेती, प्रक्रिया केलेले अन्न, कुक्कुटपालन उत्पादने, दुग्धशाळा आणि बरेच काही निर्यात सोपी करण्यासाठी ही काम करीत आहे.