मुंबई मेट्रोच्या दोन मार्गांवरील सेवा मुंबईकरांच्या सेवेत गुढीपाडव्यापासून रुजू होत आहेत. मेट्रो 7 आणि मेट्रो 2-ए या मार्गावरील सेवांची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली आहे. मुंबईत मेट्रो -7 म्हणजेच रेड लाईन आणि मेट्रो -2 ए म्हणजेच यलो लाइनच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे करणार आहेत. दोन्ही मेट्रोची (Metro) अपेक्षित कामे जवळपास पूर्ण झाली असून, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाकडून आवश्यक प्रमाणात प्राधिकरणाला मिळाले आहे.
मुंबई मेट्रोचं काम पूर्ण होण्यास अजून दोन ते अडीच वर्ष लागतील अशी माहिती आयुक्त श्रीनिवास यांनी दिली आहे. मेट्रो 2 ए मार्गावरील 9 स्थानकं आणि मेट्रो 7 मार्गावरील 10 स्थानकं 2 एप्रिलपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवास यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे
मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 पहिल्या टप्प्याचे उदघाटन 2 एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन होणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवास यांनी दिली.
मेट्रो 2 ए मध्ये एकूण 9 स्थानक सुरु होतील. यामध्ये दहिसर पूर्व,आनंद नगर,कंदार पाडा,मंडपेश्वर,एक्सर,बोरिवली पश्चिम,पहाडी एक्सर,कांदिवली पश्चिम,डहाणूकर वाडी स्थानकांचा समावेश आहे.
मेट्रो 7 मधील एकूण 10 स्थानक गुढीपाडव्यापासून सुरु होणार आहेत. आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोयसर, मागाठाणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान,ओवरी पाडा,दहिसर पूर्व या स्थानकांवरील सेवा सुरु होईल.
सुरुवातीच्या काळात सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत दोन्ही मेट्रो मार्ग सुरू राहणार आहेत. एका मेट्रो ट्रेनला सहा कोच असतील. एका मेट्रोमधून 2280 प्रवासी प्रवास करु शकतात.
मेट्रो ट्रेन या चालक विरहित तंत्रज्ञान असलेल्या आहेत. आता सुरुवातीला चालकांद्वारे सेवा चालू करण्यात येतील. एका दिवसात 150 फेऱ्या होतील. तीन ते सव्वा तीन लाख प्रवासी दिवसभरात प्रवास करतील, असा अंदाज आहे.