सध्या पेट्रोल आणि डिझेल सोबतच घरगुती सिलिंडरच्या दरातही प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. अशातच काही गॅस एजन्सीजकडून सिलिंडरसाठी जादा पैसे आकारून ग्राहकांना लुबाडले जात आहे.
घरगुती सिलिंडरसाठी तुमच्याकडून ठरवून दिलेल्या रक्कमेपेक्षा जास्त पैसे आकारले जात असतील तर तुम्ही त्याविरोधात तक्रार नोंदवू शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ एक ट्विट करावे लागेल. त्यानंतर MoPNG e-Seva या सरकारी विभागाकडून संबंधित एजन्सीवर योग्य ती कारवाई केली जाईल.
तसेच तुम्ही एजन्सीकडून वेळेवर सिलिंडर घरी पोहोचवला जात नसल्यास एजन्सी लगेच बदलू शकता. केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, खादा ग्राहक त्यांच्या गॅस एजन्सीकडून देण्यात येणाऱ्या सेवेच्या दर्जाविषयी समाधानी नसेल तर तो दुसऱ्या गॅस एजन्सीत कनेक्शन ट्रान्सफर करु शकतो. सुरुवातीच्या काळात ही सुविधा फक्त एकदाच वापरता येईल. ज्याप्रमाणे रेशन कार्डधारकाला त्याचे दुकान किंवा डिलर बदलण्याची सुविधा आहे, तसेच या सुविधेचे स्वरुप आहे.
ही सुविधा सुरुवातीला चंदीगड, पुणे, कोईम्बतूर आणि गुडगावमध्ये सुरु केली जाईल. त्यानंतर टप्याटप्प्याने देशभरात ही सुविधा मिळेल. त्यामुळे ऑनलाईन बुकिंग करताना ग्राहकाला कोणत्या एजन्सीकडून सिलेंडर घ्यायाचा हे ठरवता येईल.ही सुविधा तुर्तास प्रायोगिक तत्वावर सुरु केली जाईल. जेणेकरून गॅस एजन्सीजना सुधारणेची एक संधी मिळेल, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव तरुण कपूर यांनी सांगितले. यामुळे स्पर्धा निर्माण होऊन गॅस एजन्सीकडून दिल्या जाणाऱ्या सेवेचा दर्जा सुधारेल. जेणेकरून ग्राहकांना आणखी चांगली सेवा मिळेल. सध्याच्या घडीला देशभरात 29 कोटी एलपीजी ग्राहक आहेत. तर देशात इंडेन, एचपी आणि भारत गॅस या मुख्य गॅस एजन्सीज आहेत.