पाकिस्तानचे उच्च शिक्षण भारतात
ग्राह्य धरले जाणार नाही
भारतीय विद्यार्थी आणि परदेशी विद्यार्थ्यांनी पाकिस्तानातील शिक्षण संस्थांमधून शिक्षण घेतल्यास ते भारतात उच्च शिक्षण आणि नोकरीच्या संधींसाठी पात्र ठरणार नाही, असे विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) स्पष्ट केले आहे. चीनमधील विद्यापीठांतून केवळ ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केलेली पदवी भारतात ग्राह्य धरली जाणार नसल्याचे यूजीसी आणि एआयसीटीई यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. आता पाकिस्तानमधील सर्वच अभ्यासक्रमांबाबतचे स्पष्टीकरण यूजीसी आणि एआयसीटीई यांच्याकडून संयुक्त परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहे.
सरकारी पक्षच मुंबईतलं वातावरण
बिघडवत आहे : नारायण राणे
राणा दांपत्य मातोश्रीवर जाणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता शिवसेनेकडून राणा दांपत्यानं माफी मागितल्याशिवाय त्यांना परत अमरावतीला जाऊ देणार नाही, असं जाहीर केलं आहे. त्यासंदर्भात बोलताना आता नारायण राणेंनी थेट शिवसेना आणि मुंबई पोलिसांनाच इशारा दिला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. “आज मुद्दाम ही पत्रकार परिषद घेतली आहे. महाराष्ट्रात सरकार आहे असं काही वाटत नाही. सरकारी पक्षच मुंबईतलं वातावरण बिघडवत आहे असं वातावरण सध्या आहे. शिवसेनेच्या नेत्यांची भाषणं किंवा पत्रकार परिषदा ऐकल्यानंतर मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे याचं या संजय राऊत, अनिल परब या सर्वांना भान आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे”, असं नारायण राणे म्हणाले आहेत.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण
होऊ नये यासाठी माघार : आमदार राणा
मातोश्री बाहेर आणि राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिकांनी ठिय्या दिला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी राणा दाम्पत्याला घरातच रोखून ठेवलं होतं. आता माघार घेणार असल्याचं आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत दौरा आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी माघार घेत असल्याचं आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे.
मातोश्रीबाहेर घोषणाबाजी 92 वर्षांच्या
आजीबाईंवर ‘पुष्पा’ फिव्हर!
रवी राणा आणि नवनीत राणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं समजल्यापासून शिवसेना कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राणा दांपत्याने मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर राणा यांच्या निवासस्थानाबाहेर आणि मातोश्रीबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. या गर्दीमध्ये एक ९२ वर्षांच्या आजीबाई सहभागी झाल्या होत्या. राणा दांपत्याविरोधात घोषणाबाजी करताना आजीबाईंनी थेट ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये “झुकेगा नहीं साला” म्हणत इशारा दिला आहे.
माझे कार्यकर्ते मशीदींचं संरक्षण
करणार : रामदास आठवले
३ मे ला जर कोणी मशीदींवरील भोंगे काढायला आले तर माझे कार्यकर्ते मशीदींचं संरक्षण करणार आहेत. आम्ही ही दादागिरी करू शकतो पण आम्हाला दादागिरी येते. पोलिसांनी यात लक्ष घालणं गरजेच आहे. मुस्लिम नेत्यांनी पण संयम पाळला पाहिजे. अजान थोडा वेळाची असते. त्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका चुकीची आहे,” असं आठवले म्हणाले. “अजानसंदर्भात भोंगे काढण्याची ही भूमिका आहे ती संविधानाच्याविरोधात आहे. ही भूमिका आहे ती समाजात, धर्माधर्मात वाद निर्माण करणारी आहे. राज ठाकरेंनी आपल्या भूमिकेमध्ये बदल करावा,” असं मत आठवलेंनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केले.
अवकाळी पावसाने झाड
पडून पुण्यात तिघांचा मृत्यू
आपल्या घरी जात असताना अवकाळी पाऊस सुरु होता. अवकाळी पाऊस आणि जोरदार वारा यामुळे वडाचे झाड पडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुरंदर येथील सासवड वीर मार्गावर घडली. या अपघातात नवविवाहित जोडप्यासह लहान भाचीचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या दांपत्याचे नुकतेच लग्न झाले होते. काल जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. यावेळी अंगावर वडाचे झाड पडून नवविवाहित जोडप्यासह लहान मुलीचा बळी गेला. या दुर्घटनेत सात वर्षांची त्यांची भाची गंभीर जखमी झाली होती. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पुण्यात तब्बल ३०७ मोबाइल
चोरून नेल्याची घटना
पुण्यातील सोमवार पेठ भागातील खुराणा मोबाईल शॉपीची भिंतीला भगदाड पाडून, तब्बल ३०७ मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सोमवार पेठ परिसरातील खुराणा मोबाईल शॉपी या दुकानाला मध्यरात्री दोन चोरट्यांनी भगदाड पाडले. त्यातून दोन चोर आतमध्ये शिरले. त्यांनी मोबाईल बॉक्समधील एक एक मोबाइल काढून बॅगमध्ये ठेवले. दुकानातील जवळपास ३०७ मोबाईल काही मिनिटांत बॅगमध्ये भरले.
SD social media
9850 60 35 90