राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA च्या नेतृत्वाखाली 22 सप्टेंबर रोजी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI या मूलतत्त्ववादी इस्लामिक संस्थेविरुद्ध धाडी टाकण्यात आल्या. त्यात केरळमधल्या मलप्पुरममधल्या एकाच पत्त्यावरच्या ठिकाणाहून सर्वाधिक जणांना अटक करण्यात आल्याचं समजतं. एनआयएने ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालय आणि राज्य पोलिस दलांच्या सहकार्याने ‘पीएफआय’शी निगडित असलेल्या 93 ठिकाणी धाडी टाकल्या. त्यामध्येच केरळमधल्या मलप्पुरममधल्या या केंद्राचा समावेश होता. या केंद्रात धार्मिक-सांस्कृतिक-शैक्षणिक कार्यक्रमांसह अन्य कारणांसाठी बरेच जण एकत्र येतात. दहशतवादाला साह्य करणारी कृत्यं केल्याच्या आरोपावरून पीएफआय या संस्थेचे 100हून अधिक नेते आणि कार्यकर्त्यांना या धाडींदरम्यान अटक करण्यात आली. त्यापैकी 45 जणांना एनआयएने अटक केली. अटक झालेल्यांची एकूण संख्या, तसंच एनआयएच्या अटकेतल्यांची संख्या यांचा विचार करता, त्यांपैकी सर्वाधिक जणांना केरळमधल्या मलप्पुरममधल्या या एकाच केंद्रातून अटक करण्यात आली.
22 सप्टेंबर रोजी पहाटे जेव्हा धाडी टाकण्यास सुरुवात झाली, तेव्हा पीएफआयचे बहुतांश नेते मलप्पुरममधल्या या केंद्रात किंवा या ठिकाणाच्या जवळपास होते. पहाटेच्या वेळी अनेक जण मोठ्या हॉलमध्ये एकत्र जमले होते, अशी माहिती सूत्रांनी न्यूज 18ला दिली.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर न्यूज 18ला सांगितलं, की ‘संशयितांच्या हालचालींमुळे या केंद्रावर गेल्या काही आठवड्यांपासून नजर ठेवण्यात आली होती. या केंद्रात एक मोठा हॉल आहे, खोल्या आहेत, तसंच अन्य सुविधाही आहेत. प्रार्थना, तसंच स्थानिक शैक्षणिक कार्यक्रमांसाठी हे केंद्र प्रसिद्ध आहे. या धाडींमध्ये यंत्रणांनी पीएफआयचे सर्वाधिक नेते आणि सदस्यांना मलप्पुरममधलं हे केंद्र, तसंच जवळपासच्या भागातून अटक केली.’
हे सारे नेते सकाळी एवढ्या लवकर केंद्रात का जमले होते, यावर आता तपास केंद्रित केला जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धाडी टाकण्याआधी या केंद्राभोवतालचा परिसर सुरक्षित करण्यात आला. स्थानिक पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांच्या साह्याने या यंत्रणांनी त्या केंद्राच्या बिल्डिंगमध्ये 21 सप्टेंबरच्या रात्री आणि 22 सप्टेंबरच्या पहाटे प्रवेश केला. त्या वेळी हॉल, तसंच अन्य खोल्यांमध्ये अनेक जण होते, असं यंत्रणांना आढळलं. त्यानंतर त्यांची ओळख पटवून वेगवेगळ्या यंत्रणांनी त्यांना अटक केली. अटक केलेल्यांचा समूह मोठा असल्याने या यंत्रणांना त्यांची अगदी ओळख पटवण्यासारख्या कामातही समन्वय साधून काम करावं लागलं होतं, असं समजतं.