‘या’ धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ नका, केंद्राने हस्तक्षेप करावा; राज ठाकरेंची मागणी
झारखंड सरकारने गिरिडीह जिल्ह्यातील पारसनाथ टेकडीला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. पारसनाथ टेकडी समेद शिखर म्हणून प्रसिद्ध आहे, जगभरातील जैनांमध्ये हे सर्वोच्च तीर्थक्षेत्र आहे. झारखंड सरकारच्या या निर्णयाविरोधात जैन समाजाचे लोक देशभरात निदर्शने करत आहेत. या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत भाष्य केले आहे. या धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ नका, प्रसंगी केंद्राने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.झारखंडमधल्या गिरीहीद जिल्ह्यातलं ‘सम्मेद शिखरस्थळ’ हे जैन धर्मियांचं पवित्रस्थळ आहे. ह्या धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ नये, कारण एकदा का ते पर्यटनस्थळ म्हणून घोषित झालं की तिथे जैन धर्माला मान्य नसलेल्या अनेक गोष्टी घडू शकतील, अशी जैन बांधवांची भावना आहे.
स्मिथला मोडता आला नाही सचिनचा विश्वविक्रम, थोडक्यात गमावली संधी
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 30 शतके करण्याचा विश्वविक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत स्टीव्ह स्मिथला हा विश्वविक्रम मोडण्याची संधी होती. पण त्याची ही संधी थोडक्यात हुकली. मात्र कसोटीत सर्वात कमी डावात 30 शतके करण्याच्या बाबतीत स्मिथने मॅथ्यू हेडन, रिकी पाँटिंग आणि भारताचे लिटल मास्टर सुनिल गावस्कर यांना मागे टाकलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 30 किंवा त्यापेक्षा जास्त शतक करणारे केवळ 14 फलंदाज आहेत. आता या यादीत स्टिव्ह स्मिथचासुद्धा समावेश झाला आहे.
स्मिथने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 104 धावा केल्या आणि हे त्याच्यचा कसोटी कारकिर्दीतील 30 वे शतक ठरले. कसोटी कारकिर्दीत 30 शतके पूर्ण करण्यासाठी स्मिथला 162 डाव खेळावे लागले. तर सचिनने ही कामगिरी 159 डावात केली होती.
सप्तशृंगी गडावर शाकंभरी नवरात्रोत्सव, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध पीठ असलेल्या श्री सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवी मंदिरात शाकंभरी नवरात्रोत्सव सुरू आहे. त्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शाकंभरी उत्सवानिमित्त भगवतीच्या मंदिरात सहस्रचंडी महायाग, तसेच भगवतीच्या महापूजेबरोबरच पंचांग कर्म पूजन, देवता स्थापन, अग्निस्थापन, नवग्रह हवन पूजन, सहस्रार्चन या पूजाविधीचे आयोजन करण्यात आले आहे.पाच दिवसांत पंचदिनात्मक सहस्रचंडी महायागाच्या कालावधीत दररोज मुख्य सत्रामध्ये महायज्ञ व होमहवन, धार्मिक विधी होणार आहे. दुपारी 3 ते सायंकाळी 6 दरम्यान प्रतिमा प्राणप्रतिष्ठा, पूजन स्थापन, सूर्यादी, नवग्रह, विश्व कल्याणासाठी पंचदिनात्मक सहस्रचंडी महायाग होत आहे. 6 जानेवारीला पौर्णिमेच्या दिवशी उत्सवाची प्रात: पूजन यथाशक्ती पूजन, उत्तरांग पूजा, होम, नवाहुती, बलिदान व महायज्ञ, पूर्णाहुती व भाविकांना महाप्रसादाचा वाटपाचा कार्यक्रम ट्रस्टच्या भोजनालयात आयोजित केला असल्याची माहिती सप्तशृंगी निवासिनीदेवी ट्रस्टतर्फे देण्यात आली आहे.
ठाणे : मेट्रोच्या ब्रिजची प्लेट पडली, अन् कचरा वेचणाऱ्या महिलेसोबत घडलं भयानक
ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कचरा वेचणाऱ्या एका महिलेच्या अंगावर मेट्रोच्या ब्रिजची प्लेट पडली. या दुर्घटनेत या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथे घडली.
ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथे मेट्रोचे काम सुरू आहे. याच परिसरात एका अज्ञात महिलेच्या अंगावर मेट्रोच्या ब्रिजची प्लेट पडून तिचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच ठाणे राबोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची पाहणी आणि शहनिषा केल्या नंतर पोलिसांना मयत झालेली ही अज्ञात महिला कचरा वेचानारी असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनात आले आहे.
युपीमध्ये गुंतवणुकीसाठी योगींचा मुंबईत रोड शो, उद्योगपतींशी चर्चा करणार
उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक आणण्याबाबत परदेशात यशस्वी रोड शो केल्यानंतर योगी आदित्यनाथ आता विविध राज्यांना भेटी देत आहेत. उत्तर प्रदेशात औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काल (दि.04) बुधवारी दुपारी मुंबईत दाखल झाले. मुंबईतील नामांकित ज्येष्ठ उद्योगपती आणि उद्योगसमूहांशी योगी आदित्यनाथ हे गुरुवारी दिवसभर भेटी आणि बैठका घेऊन चर्चा करणार आहेत.
आदित्यनाथ यांचा मुंबईत आज रोड शो होत आहे. दरम्यान योगींचे देशातील नऊ महत्वाच्या शहरांमध्ये रोड शो होणार आहेत यामध्ये ते राज्यातील गुंतवणूकीबाबत चर्चा करणार आहेत. उत्तर प्रदेशातील गुंतवणूक संधी आणि राज्य सरकारकडून त्यांना मिळणाऱ्या विशेष सवलती याबाबत माहिती देऊन उद्योगांना आकर्षित करण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. काल मुंबईत योगी आदित्यनाथ दाखल होताच विविध मान्यवरांच्या भेटी घेत विविध विषयांवर चर्चा केली.
साखर उत्पादनात ५० लाख टनाचा टप्पा पार, राज्यात १९७ कारखाने सुरू, मागील वर्षापेक्षा सरस कामगिरी
राज्यातील साखर उद्योगाने बुधवारपर्यंत ५० लाख टन साखर उत्पादनाचा टप्पा पार केला आहे. १९७ कारखान्यांनी गाळप सुरू करून मागील हंगामापेक्षा सरस कामगिरी करून गाळप आणि साखर उत्पादनातही आघाडी घेतली आहे.
साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ४ जानेवारीअखेर शंभर सहकारी आणि ९७ खासगी, अशा १९७ साखर कारखान्यांनी ५३६.७८ लाख टन उसाचे गाळप करून पन्नास लाख टन (५०५.६४ लाख क्विंटल) साखरेचे उत्पादन केले आहे.
महाराष्ट्रातील सामाजिक कामांना पाठबळ देणाऱ्या सुनील देशमुख यांचं निधन
राज्यातील विविध सामाजिक चळवळींना पाठबळ देणारे महाराष्ट्र फाऊंडेशनचे संस्थापक सुनील देशमुख यांचे निधन झाले. मूळचे सांगलीचे रहिवासी असलेले सुनील देशमुख पदवीनंतर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले आणि पुढे तेथेच स्थायिक झाले. मात्र, अमेरिकेत राहूनही त्यांना महाराष्ट्रातील मातीची ओढ कायम राहिली आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून त्यांनी मोठं काम केलं.
श्रीलंकेविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज!
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी२० सामना होणार असून हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजचा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. ह्या सामन्यात हार्दिक सेना मालिका जिंकण्याच्या इराद्याने उतरणार असा सर्व चाहत्यांना विश्वास आहे. भारतानेया मैदानावर २०१२ पासून केवळ तीनच आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले गेले. त्यातील दोन सामने भारताने जिंकले आहेत. भारताने या मैदानावर शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्धच खेळला होता. तेव्हा विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील भारताने ७८ धावांनी विजय मिळवला होता. तर याआधी झालेल्या सामन्यात मात्र श्रीलंकेने बाजी मारली होती. यामुळे आता होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघ चांगलीच टक्कर देणार आहेत.
आयसीसी क्रमवारीत इशान किशनची मोठी झेप, तर दिपक हुडा पुन्हा टॉप १०० मध्ये दाखल
भारताचा सलामीवीर इशान किशनने १० क्रमांकांनी झेप घेत २३व्या स्थानावर झेप घेतली आहे, तर दीपक हुड्डाने गुरुवारी जारी केलेल्या टी२० फलंदाजांच्या नुकत्याच जाहीर केलेल्या आयसीसी क्रमवारीत पुन्हा टॉप-१०० मध्ये प्रवेश केला आहे. मंगळवारी मुंबईत श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने दोन धावांनी विजय मिळविला. पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांच्या प्रभावी कामगिरीनंतर दोघांनीही चार्टमध्ये वरच्या दिशेने वाटचाल केली.हुडाने २३ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्यानंतर ४० क्रमांकांनी पुढे जात ९७ व्या स्थानावर पोहोचला आहे तर सलामीवीर किशनला क्रमवारीत ३७ धावांच्या शानदार खेळीचे बक्षीस मिळाले. मुंबईत दुर्मिळरित्या अपयशी ठरल्यानंतरही धडाकेबाज सूर्यकुमार यादवने फलंदाजांमध्ये अव्वल स्थान कायम राखले. भारताचा नवा टी२० कर्णधार हार्दिक पंड्या, गोलंदाजांमध्ये नऊ क्रमांकांनी पुढे जात ७६ व्या स्थानावर आहे.
‘ताई नको दादा हवे’, शरद पवारांसमोरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची खदखद बाहेर!
पुण्यामध्ये आज बऱ्याच दिवसांनी शरद पवारांनी राष्ट्रवादीची तालुका निहाय बैठका घेत कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. पण याच बैठकीत कार्यकर्त्यांमधली गटबाजी तर उघड झालीच पण वेल्ह्यातील एका कार्यकर्त्यांनी सुप्रियाताईंऐवजी चक्क अजितदादांनाच तालुक्यात लक्ष घालण्याची थेट मागणी केली, यामुळे पुणे राष्ट्रवादी काँग्रेसमधील खदखद बाहेर आली आहे.
पक्षातील गटतट दूर झाले तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता येईल. कात्रज दूध संघ, पीएमआरडीए या कमिट्यांवर पक्षातील पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली नाही. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात रोजगार नसल्यामुळे अनेक कुटुंब तालुक्यातून शहरात जात आहेत, त्यामुळे तालुका विस्थापित होत आहे. हे लक्षात घेऊन नवनवीन रोजगार कसे येतील यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. यासह असंख्य समस्या आणि पक्षातील अंतर्गत गटबाजीचा पाढा पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांसमोर वाचला.
SD Social Media
9850 60 3590