चाळीसगाव बाजार समितीने घेतलेला निर्णय इतर बाजार समित्यांसाठी तर प्रेरणादायी आहेच पण महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. यंदाच्या गुढीपाडव्याचे मुहूर्त साधत शेतकऱ्यांच्या शेतीमाल मोजण्यासाठी भुईकाट्यावरील फी असते ती माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. पाढव्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. हा निर्णय छोटा असला तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या बाजार समितीवर 18 फेब्रुवारीपासून अशासकीय प्रशासकीय मंडळ कार्यरत आहे. मुख्य प्रशासक दिनेश पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे.
चाळीसगाव बाजार समितीमध्ये शेतीमालाची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. शिवाय हंगामाच्या काळात अधिकची आवक ही ठरलेलीच. शेतीमाल घेऊन येणाऱ्या वाहनाचे आणि मालाचे वजन केले जाते. यासाठी शेतकऱ्यांना किमान 50 आणि त्यापेक्षा अधिकही रक्क द्यावी लागत होती. पण ही जबाबदारी आता बाजार समितीने घेतली आहे. यामुळे बाजार समितीचे 6 लाखाचे उत्पन्न घटले आहे. असे असले तरी याचा ताण शेतकऱ्यांवर येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारची फी माफ म्हणजे एक प्रकारे उत्पन्नात वाढ असल्यासारखेच आहे.
बाजार समितीच्या या निर्णयामुळे 6 लाखाचे उत्पन्न मिळणार नाही. पण प्रशासनामधील सर्वांच्या मंजूरीनंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतीमाल विक्रीपूर्वी जे रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली जात होती ती आता पाडव्यापासून बंद होणार आहे. 2 एप्रिल म्हणजेच पाडव्याचे मुहूर्त साधत या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे.
‘माझी बाजार समिती’ अॅपचाही शेतकऱ्यांना फायदा
बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. यापूर्वी ‘माझी बाजार समिती’ हे मोबाईल अॅप सुरु करण्यात आलेले आहे. यामुळे बाजारपेठेतील शेतीमालाचे दर काय आहेत याची माहिती शेतकऱ्यांना मिळत आहे. शिवाय शेतीमालाची आवक, बाजारपेठेत कोणत्या शेतीमालाची आवक झाली, याची सर्व माहिती शेतकऱ्यांना घरबसल्या मिळत आहे.याचा फायदा शेतकऱ्यांना होत असून योग्य दरावरच शेतीमालाची विक्री की साठवणूक हा निर्णय घेता येत आहे. बाजार समिती प्रशासनाचे लहान-मोठे उपक्रम शेतकऱ्यांसाठी चांगले उपयोगी ठरत आहे.