अमेरिकेत भारतीय कुटुंबाने उभारला अमिताभ यांचा पुतळा!

प्रख्यात अभिनेते अमिताभ बच्चन यांचा पूर्णाकृती पुतळा अमेरिकेतील एडिसन शहरातील एका भारतीय वंशाच्या अमेरिकन कुटुंबाने आपल्या घराबाहेर उभारला आहे. अमिताभ यांच्यावरील अतीव प्रेम, आदर व्यक्त करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. रिंकू व गापी सेठ यांच्या एडिसन शहरातील घराबाहेर या पुतळय़ाच्या अनावरण सोहळय़ासाठी सुमारे ६०० भारतीय जमले होते.

‘छोटा भारत’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात बहुसंख्य भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक राहतात. एका काचेच्या मोठय़ा पेटीत हा पूर्णाकृती पुतळा बंदिस्त आहे. त्याचे अनावरण भारतीय समुदायाचे प्रसिद्ध नेते अल्बर्ट जासानी यांनी केले. अनावरणानंतर उत्स्फूर्त नृत्य करण्यात आले. तसेच फटाके फोडण्यात आले. अमिताभ यांचा ‘कौन बनेगा करोडपती’मधील वेशभूषेतील हा पुतळा आहे. तो राजस्थानमध्ये तयार करून अमेरिकेला जहाजातून आणण्यात आला. यासाठी सेठ यांनी ७५ हजार डॉलर (६० लाख रुपये) खर्च केले.

‘परमेश्वरासमान!’

अंतर्गत सुरक्षा अभियंता असलेल्या गोपी सेठ यांनी सांगितले, की अमिताभ माझ्यासाठी परमेश्वरासमानच आहेत. पडद्यावरील त्यांच्या कामगिरीप्रमाणेच मला पडद्यामागचे त्यांचे वास्तव जीवनही माझ्यासाठी स्फूर्तिदायक आहे. ते निगर्वी आणि वास्तववादी आहेत. सेठ हे गुजरातहून १९९० मध्ये अमेरिकेत स्थलांतरित झाले. तेथे गेल्या तीस वर्षांपासून ते ‘बिग बी’ यांच्यासंबंधी त्यांच्या चाहत्यांसाठी एक संकेतस्थळही नियमित चालवत आहेत. सेठ म्हणाले, की पुतळा करण्याइतपत माझी योग्यता नसल्याचे अमिताभ यांनी नम्रपणे सांगितले, परंतु मला परवानगी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.