महाराष्ट्रात झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या 8 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं आहे. मोहन प्रकाश यांच्या एक सदस्यीय समितीने काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींना हा रिपोर्ट दिल्याचं वृत्त न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. या आमदारांविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई करू नये, अशी शिफारसही या अहवालात करण्यात आली आहे.
विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला, यानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांना हंडोरेंच्या पराभवाची कारणं शोधून याबाबतचा सविस्तर अहवाल द्यायला सांगितला. यानंतर मोहन प्रकाश मुंबईमध्ये आले आणि त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि आमदारांचीही भेट घेऊन चौकशी केली.
मोहन प्रकाश यांच्या रिपोर्टनुसार भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडे 113 मतं होती, पण त्यांना जास्तीची 20 मतं मिळाली. काँग्रेसच्या 6 आमदारांनी भाजपला तर दोघांनी राष्ट्रवादीला मतदान केलं. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या या 8 आमदारांची ओळख वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून पटवण्यात आली आहे. या आमदारांसोबत वैयक्तिक आणि गुप्त चर्चा करण्यात आल्याचं, काँग्रेसमधल्या सूत्रांनी सांगितलं आहे.
या आमदारांना मतदान पत्रिकेवर ठराविक कोड आणि खुणा करायला सांगण्यात आल्या होत्या, पण त्यांच्या मतपत्रिकेवर हे कोड किंवा खुणा नव्हत्या. मतदानाची पद्धत गुप्त असल्यामुळे ही रणनिती 100 टक्के यशस्वी होऊ शकत नाही, त्यामुळे या आमदारांवर कारवाई करून त्यांची राजकीय कारकिर्द खराब करता येणार नाही, असंही मोहन प्रकाश यांनी त्यांच्या अहवालामध्ये नमूद केलं आहे.
काँग्रेस पक्षश्रेष्ठींनाही आमदारांवर कारवाई करण्याची ही वेळ योग्य नसल्याचं वाटत आहे. काँग्रेस सध्या कठीण काळातून जात आहे. आधीच अनेक जण पक्ष सोडून जात आहेत, त्यामुळे आमदारांना एकत्र ठेवण्याचं आव्हान पक्षापुढे आहे. या परिस्थितीमध्ये फक्त संशयावरून सज्जड पुरावा नसताना आमदारांचं निलंबन करणं योग्य ठरणार नाही, त्यामुळे हा मुद्दा थंड बस्त्यात टाकण्यात येईल. परिस्थिती जेव्हा अनुकूल असेल तेव्हा हाय कमांड या आमदारांवर कारवाई करू शकते, असं काँग्रेस नेत्याने सांगितलं.