राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)चे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्लीमध्ये आहेत. सोमवारी त्यांनी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली. आज शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मंत्री नवाब मलिकांनी दिली आहे. या बैठकीला 15 ते 20 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक आज (मंगळवारी) दिल्लीत होणार आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. या बैठकीला सर्व निमंत्रित सदस्य आणि परमनंट सदस्य सहभागी होणार आहेत. या बैठकीत विविध अजेंड्यावर चर्चा होणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.
दरम्यान, या बैठकीनंतर शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत असेही नवाब मलिक म्हणाले. नवाब मलिक म्हणाले की, आगामी लोकसभेच्या अधिवेशनाबाबत यामध्ये चर्चा होणार आहे. शिवाय देशातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा केली जाणार आहे. संपूर्ण देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम आजपासून शरद पवार हे करणार असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मुंबईत पवार यांची भेट घेतली होती आणि काल (सोमवारी) दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असून या भेटीत त्यांनी देशात राजकीय परिस्थिती काय आहे, याची माहिती त्यांच्याकडे जी उपलब्ध होती ती दिल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. आज मोजक्या पक्षांसोबत चर्चा होणार असून त्यानंतर हळूहळू इतर पक्षांना कसं एकत्र आणता येईल त्याबाबतीत हे नेते बसून ठरवणार आहेत असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
आज सकाळी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची एक बैठक होणार आहे आणि संध्याकाळी चार वाजता विरोधी पक्षनेते पवारांच्या घरी एकत्र येतील. 2024 च्या निवडणुकीला अजून तीन वर्ष बाकी आहेत. पण पश्चिम बंगालमध्ये ममतांनी ज्या पद्धतीने भाजपला टक्कर दिली त्यानंतर भाजपला सक्षम पर्याय देण्यासाठी काँग्रेस वगळता इतरांनी एकत्र येण्याची गरज आहे का? याबाबत या हालचाली सुरु आहेत. आजच्या बैठकीसाठी काँग्रेसचा कुणी प्रतिनिधी उपस्थित असेल हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही.