शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हे अनपेक्षित होतं. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे तब्बल 35 आमदार गुजरातला निघून गेले आहेत. गुजरातच्या एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये ते थांबले आहेत. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांनी सध्याच्या या घडामोडींवर ‘न्यूज 18 लोकमत’ला प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिवसेना पुन्हा संघर्षाने उभी करु’, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“शिवसेनेचा जन्मच संघर्षातून झालाय. असे अनेक संघर्ष शिवसेनेने पाहिले आहेत. आताही संघर्ष करू आणि शिवसेना पुन्हा संघर्षाने उभी करू. मी आतापर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलंय आणि पुढेही करतच रहाणार”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी ‘न्यूज 18 लोकमत’ला दिली.
‘भाजपसोबत कसं जायचं?’, मुख्यमंत्र्यांचा शिवसेना आमदार-खासदारांना सवाल
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर आज संध्याकाळी शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसोबत मनमोकळेपणाने चर्चा केली. आपण एकनाथ शिंदे यांना समजवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. ते ऐकतील, असा विश्वास असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना भाजपसोबत जुळवून घ्या, अशी विनंती केली आहे. पण भाजपसोबत कसं जायचं? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांसमोर उपस्थित केला.
“तुमचं काही नाही, माझं काही नाही तर जायचं कशाला? आता बोलत आहेत की, भाजपसोबत चला… जेव्हा भाजपसोबत होतो तेव्हा आपल्याला कमी त्रास झाला का? मग आता भाजपसोबत कसं जायचं? आपण एकनाथ शिंदेंना समजवण्याचा प्रयत्न करत आहोत. ते माझं ऐकतील हा मला पूर्ण विश्वास आहे. ते लवकरच आपल्यामध्ये असतील. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आपल्यासोबत आहेत”, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.