आज दि.२१ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

एकनाथ शिंदे शिवसेनेत परतण्यास इच्छूक नाहीत, मिलिंद नार्वेकरांच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर

महाराष्ट्राच्या राजकारणात आज खूप मोठा भूकंप घडू शकतो. कारण महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांसह पक्षाविरोधात बंड पुकारलं आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी मिलिंद नार्वेकर हे स्वत: एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी गुजरातला गेले आहेत. गुजरातच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह थांबले आहेत. तिथे मिलिंद नार्वेकर त्यांची भेट घेण्यासाठी गेले. विशेष म्हणजे नार्वेकर गेले तेव्हा त्यांना हॉटेलमध्ये आत प्रवेश दिला गेला नाही. हॉटेल प्रशासनासोबत बराच वेळ चर्चा केल्यानंतर अखेर एकनाथ शिंदे हे मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार झाले. दोन्ही नेत्यांमध्ये सलग अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत परतण्याची इच्छाच नसल्याचं मत व्यक्त केलं. त्यामुळे शिवसेनेसाठी पुढची वाट ही प्रचंड खडतर असल्याचं मानलं जात आहे. शिंदे 35 आमदारांसह सत्तेतून बाहेर पडलं तर महाविकास आघाडी कोसळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडण्याची शक्यता आहे.

‘साहेब, मी 24 तासात शिवसेनेला इतका वाईट झालो का?’, एकनाथ शिंदेंचा फोनवर ठाकरेंना भावनिक सवाल

शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर हे गुजरातच्या सूरत शहरात शिंदे यांच्या भेटीसाठी गेले होते. शिंदे सूरतमधील ली-मेरिडीअन या पंचतारांकीत हॉटेलमध्ये आपल्या समर्थक आमदारांसह थांबले आहेत. शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी मिलिंद नार्वेकर हे गेले होते. यावेळी नार्वेकर आणि शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना भाजपसोबत जुळवून घेण्याची विनंती केली. तसेच शिवसेना कार्यकर्त्यांकडून विरोधात घोषणाबाजी केली जात असल्याने शिंदे भावूक झाले. साहेब, मी 24 तास इतका वाईट झालो का? असा भावनिक सवाल शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना केला.

यंदाची आषाढीची पूजा फडणवीस करतील?

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात केलेल्या कथित बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस व्होटींग झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे पक्षाच्या संपर्कात नसून काल म्हणजेच २० जून रोजी रात्री वर्षा बंगल्यावर झालेल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीपासूनच शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जातोय. असं असतानाच शिंदे हे गुजरातमधील सुरत येथे काही शिवसेना आमदारांसोबत असल्याची माहिती समोर आली असून त्यांनी काही अटी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर ठेवल्या आहेत.मागील २४ तासांपासून राज्यात सुरु असणाऱ्या या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार पडणार की काय अशापद्धतीच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु झाल्या आहेत. मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकारला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी भाजपाकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यातच आता भाजपाच्या एका नेत्याने आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये पांडुरंगाची शासकीय पूजा ही सध्याचे विरोधी पक्ष नेते असणारे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री या नात्याने करतील असं भाकित व्यक्त केलंय.

जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारतीयांनी साजरा केला जागतिक योग दिन

जगभरात 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. जगभरात योगाभ्यासाचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा यामागचा मुख्य हेतू. आज जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आबालवृध्दांनी योग दिन साजरा केला.जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूर पॅलेस येथे योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पंतप्रधानांनी यावेळेस भ्रामरी प्राणायम केले.बिकानेर येथील योग कार्यक्रमात बीएसएफचे जवान सहभागी झाले होते.

पराभवाची जबाबदारी स्वीकारून पटोलेंनी राजीनामा द्यावा; माजी आमदारांची मागणी

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे प्रथम क्रमाकांचे उमदेवार चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी आमदार व काँग्रेस नेते डॉ. आशीष देशमुख यांनी येथे केली. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा पहिल्या क्रमांकाचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. काँग्रेसची मते फुटली. ही खेदाची बाब आहे. चंद्रकांत हंडोरे दलित समाजाचे आहेत. त्यांना निवडून आणणे अपेक्षित होते.

त्यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा व मतफुटीची पक्षपातळीवर चौकशी करावी, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पाठवणार, असेही देशमुख म्हणाले.

महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा जवानांवर थुंकल्या!

राहुल गांधी यांची ईडीकडून होणाऱ्या चौकशीच्या वृत्तानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेत्यांकडून याचा विरोध केला जात आहे. विरोध व्यक्त करण्यासाठी अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यादरम्यान एक अत्यंत घाणेरडा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीवरुन आंदोलन केल्याचं दिसत आहे. आंदोलन थांबवण्यासाठी कार्यकर्त्यांना पकडण्यात येत आहे.

यावेळी महिला काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षा नेटा डिसूजा यांनी घृणास्पद कृत्य केलं. त्या गाडीवर उभ्या असताना महिला जवानांवर थुंकल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याचा निषेध केला जात आहे. अशा प्रकारे महिला जवानांवर थुंकणं हा मोठा अपमान आहे.

विरोधकांकडून यशवंत सिन्हा उमेदवार, भाजप कोणावर लावणार डाव?

महाराष्ट्रात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं बंडखोरी नाट्य रंगलं असताना तिकडे दिल्लीत राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांनी उमेदवार घोषित केला आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह 13 विरोधी पक्षांनी मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी उमेदवार म्हणून नाव देण्यास सहमती दर्शवली आहे. सूत्रांनी ही माहिती दिली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांची एकमताने निवड करण्यात आल्याचे संयुक्त निवेदनात म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजपकडून अद्याप कोणतही नाव समोर आलेलं नाही. मात्र, काही नावांची चर्चा नक्की सुरू आहे.

बिहारमध्ये RJD ला मोठा धक्का! बाहुबली आमदाराला 10 वर्षांची शिक्षा

बिहारमधल्या मोकामा येथील आरजेडीचे दिग्गज नेते आणि आमदार अनंत सिंह  यांना लडमा येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरात एके-47 रायफल आणि ग्रेनेड  सापडल्याप्रकरणी एमपी-एमएलए न्यायालयाने 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अनंत सिंह यांच्या घरातून एके-47 आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. अनंत सिंह यांना मंगळवारी (21 जून 22) पाटण्यात या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली. पोलिसांच्या दाव्यावर खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अनंत सिंह यांना दोषी ठरवण्यात आलं आणि आता या प्रकरणी एमपी-एमएलए न्यायालयाने निर्णय दिला आहे. मोकामाचे आमदार अनंत सिंह सध्या पाटणा येथील बेऊर कारागृहात आहेत.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.