राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. शिवसेना आणि काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याने पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आले. दहाव्या जागेसाठी काँग्रेसच्याच दोन उमेदवारांमध्ये लढत झाली आणि पक्षाचे पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झाले, तर भाई जगताप यांचा विजय झाल्याचं चित्र सोमवारी पहायला मिळालं. या निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असतानाच अपक्ष आमदार रवी राणा यांनी थेट दोन महिन्यांमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केलाय. येत्या दोन महिन्यांमध्ये फडणवीस योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार असून ते मुख्यमंत्री होतील, असं राणा यांनी भाजपाच्या विजयावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय.
विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारविरोधात अविश्वास ठरवा आणला जाईल. शिवसेना आणि काँग्रेसची मतं फुटल्याचं समोर आलं आहे. या सरकारला पायउतार व्हावे यासाठी योग्यवेळी करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असं म्हणत राणा यांनी सूचक शब्दांमध्ये इशारा दिलाय. तसेच पुढे बोलताना रवी राणा यांनी भगवान हनुमानाचा आशिर्वाद फडणवीसांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं. रावणाची लंका जाळण्यासाठी रामभक्त आणि हनुमानभक्त आमदारांच्या रुपात मैदानात उतरले आहेत. आधी आमदार धडा शिकवतील आणि मग जनताच सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल असंही रवी राणा म्हणालेत.
मुख्यमंत्र्यांनी भगवान हनुमानाचा अपमान केला. हनुमान चालिसा पठण करण्याच्या मुद्द्यावरुन आम्हाला तुरुंगात डांबण्यात आलं. राज्यसभेच्या निकालाच्यावेळीस मी ठाकरे सरकारची उलटी गिनती सुरु झाल्याचं म्हटलेलं. हे दोन्ही निकाल त्याचीच सुरुवात आहेत. पुढील दोन महिन्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होतील. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनतील, असा दावा राणा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलाय.