मराठी वाचा आणि वाचवा हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्यात सुरु असलेल्या पुस्तकांचे गाव या योजनेचे एक केंद्र औरंगाबादमधील वेरूळ येथेही सुरु होणार आहे. वेरूळ ग्रामपंचायत अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाला ‘पुस्तकांचे गाव’ करण्यास राज्य शासनाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. तंटामुक्त गाव, वाचन संस्कृती, आदर्शगाव, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, निसर्गसंपन्नता, शांतता आदी वेरुळच्या वैशिष्ट्यांमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्या पुस्तकांचे गाव या योजनेत सहभागी होण्यासाठी वेरुळता प्रस्ताव दिला होता.
25 मार्च रोजी राज्य शासनाच्या महसुल विभागाने राज्यभरातून आलेल्या प्रस्तावांची छाननी केली. त्यानंतर वेरुळच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यामुळे पर्यटननगरी औरंगाबादमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी वेरुळ येथे आणखी एक आकर्षण केंद्र उभे राहिल. तसेच स्थानिकांमध्ये वाचन संस्कृती विकसित होण्यासाठीही मदत होईल.
‘हे ऑन वे’ या वेल्स इंग्लंडमधील गावाच्या धर्तीवर राज्यात पुस्तकांचे गाव ही संकल्पाना अस्तित्वात आली. राज्यात महाबळेश्वरमधल भिलार येथे पहिले पुस्तकांचे गाव साकारले गेले. कुणीही येऊन पुस्तके हाताळा, चाळा, वाचा तेही मोफत..अशी सुविधा असते. शालेय पाठ्यपुस्तकं वगळता मराठी साहित्यातील हजारो पुस्तके येथे उपलब्ध करुन दिली जातात. वाचनाची आवड असलेल्या लोकांनी येथे येऊन मनसोक्त वाचनाचा आनंद लुटायचा.
अट फक्त एकच असते, कोणत्याही गोंगाटाशिवाय इथले उपक्रम सुरु राहू द्यायचे. पुस्तकांचे गाव ज्या ठिकाणी थाटायचे आहे, त्याठिकाणी लोक सहभाग, 250 चौरस फुटाची दहा दालने, जागेची सुरक्षितता, वाचकांसाठी सुविधा, संबंधित संस्थांची राज्य मराठी विकास संस्थेसोबत करार करण्याची तयारी या गोष्टींची आवश्यकता असते. एका गावासाठी पाच लाख रुपये शासन अनुदान देणार आहे. मराठी भाषा गौरव दिन, वाचन प्रेपणा दिन, भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमांचे आयोजन निवड झालेल्या संस्थांना करावे लागते.
राज्यातील औरंगाबादमधील वेरूळ, नागपूरमधील नरेगाव बांध, सिंधुदुर्गमधील पोंभुर्ले, पुण्यातील अंकलखोप या ठिकाणी पुस्तकांचे गाव उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पुस्तकांचे गाव ज्या ठिकाणी वसवायचे असते, तेथे पर्यटनस्थळ, तीर्थक्षेत्र, वाड्.मय, साहित्य चळवळ, ऐतिहासिक वारसा वैशिष्ट्ये, कृषी पर्यटन तसेच पुस्तकांचा खपात लौकिक यापैकी बहुतांश निकष पूर्ण केलेले असावेत. या निकषात वेरुळचा समावेश होतो. तसेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले घृष्णेश्वर देवस्थान, जगप्रसिद्ध लेण्यांमुळे वेरुळमध्ये येणाऱ्या पर्यटक आणि भक्तांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे पुस्तकांचे गाव तेथे झाल्यास आणखी एक आकर्षण पर्यटकांसाठी वाढणार आहे.