राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली नसल्याचा उल्लेख केला होता त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी काल विधानसभेत देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना उपरोधिक टोला लगावला होता. उत्तर महाराष्ट्र मुख्यमंत्रिपदासाठी कुठे कमी पडला यावर एकनाथ खडसे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
उत्तर महाराष्ट्रात स्वर्गीय बळीराम हिरे, रोहिदास जी पाटील, मधुकरराव चौधरी आणि एकनाथ खडसे यांच्यासारखे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतानाही त्यांना मुख्यमंत्री पद मिळू शकले नाही. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जातील त्यानंतर गिरीश महाजन यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळेल असा उपरोधिक टोला अजित पवार यांनी लगावला होता, ही वस्तुस्थिती आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. यासंदर्भात मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार आहे हे समजताच माझी छळवणूक करण्यात आली, असं एकनाथ खडसे म्हणाले.
उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतानाही सत्तर वर्षात उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री पद मिळाले नाही. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे नाशिक जळगाव यातील एकाला ही संधी मिळाली नाही. कोकणात संधी मिळाली. मराठवाड्यात चार चार मुख्यमंत्री झाले.विदर्भात चार चार मुख्यमंत्री झाले. उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्र्याची पात्रता असतानाही एकालाही मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली नाही हे उत्तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. एकनाथ खडसे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहे हे समजता बरोबर माझी छळवणूक करण्यात आली, असं एकनाथ खडसे म्हणाले.
माझे दाऊदच्या बायकोबरोबर संबंध जोडण्यात आले खोटा भूखंड, ईडी प्रकरण असे अनेक आरोप माझ्यावर लावण्यात आले. मुख्यमंत्रिपदाचा दावेदार होतो म्हणून रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून माझा फोन टॅपिंग करण्यात आला असं देखील एकनाथ खडसे म्हणाले. माझं तिकीट नाकारण्यात आलं, असं देखील एकनाथ खडसे म्हणाले. उत्तर महाराष्ट्रावर होणारा अन्याय छळवणूक कधी ना कधी भरून निघेल. 60 वर्षापासून आम्हाला उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रिपद मिळालं नाही, असं देखील एकनाथ खडसे म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी उत्तर महाराष्ट्रावर अन्याय झाल्याचे वक्तव्य सभागृहात केले होते. अजित पवार यांनी व्यक्त केलेली खंत योग्यच असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिली आहे. उत्तर महाराष्ट्रातून अनेक मुख्यमंत्री पदाचे दावेदार असताना त्यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले नाही. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचा विकास रखडला असल्याचे ही गुलाबराव देवकर म्हणाले.