भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लॉर्ड्समध्ये सुरु असलेली टेस्ट जिंकण्याची टीम इंडियाची आशा अजूनही कायम आहे. अजिंक्य रहाणेचे 61 आणि चेतेश्वर पुजाराचे 45 रन यांच्या मदतीनं टीम इंडियानं चौथ्या दिवसाच्या अखेरीस 6 आऊट 181 रन केले आहे. भारताकडं सध्या 154 रनची आघाडी आहे. ऋषभ पंत आणि इशांत शर्मा ही जोडी सध्या नाबाद आहे. चौथ्या दिवसाच्या शेवटी ऋषभ पंत खेळताना पाहून कॅप्टन विराट कोहली आणि रोहित शर्मा चांगलेच नाराज झाले होते. त्यांच्या नाराजीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
रविंद्र जडेजा आऊट झाल्यानंतर पंत आणि इशांत शर्मा खेळत असताना हा सर्व प्रकार घडला. यावेळी विराट कोहली लॉर्ड्सच्या बाल्कनीतून पंतला सतत इशारा करत होता. सूर्यप्रकाश कमी झालेला असूनही पंत बॅटींग करत होता. विराट सातत्याने त्याबाबत खूण करत पंतला सांगत होता. ‘तुझं लक्ष कुठं आहे?’ असाच विराटच्या त्या हावभावाचा अर्थ होता. फक्त विराटच नाही तर रोहित शर्मा देखील पंत अंधारात खेळत असल्यानं नाराज झाला होता. विराटनं अखेर हनुमा विहारीला मैदानात पाठवून पंतला निरोप दिला.