आज दि.१३ आॕगस्ट च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

‘मला रिटायरमेंट घ्यायची आहे, पण…’ राज्यपालांनी सांगूनच टाकलं!

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यापूर्वी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला होता. वरिष्ठांकडून माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले की, देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशाने प्रगती केल्याचं दिसून येत आहे. विशेष करून मागील सात-आठ वर्षात देशाने भरपूर प्रगती केली आहे. ज्या घरात वीज नव्हती तिथं वीज आली, ज्या घरात शौचालय नाही तिथं शौचालय बनवण्यात आले. देशातील 33 कोटी लोकांचे बँकेत खातं उघडणे असो वा अशी अनेक काम होतं आहेत. त्यामुळे समाधान वाटतंय. यानंतर मला मला रिटायर्डमेंट घायची आहे, पण देत नाहीत असंही ते यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा महाराष्ट्रातील सर्व आमदारांसाठी पहिला मोठा निर्णय

शिवसेनेत फूट पडण्यामागे नेमकं कारण काय? असा प्रश्न बंडखोर आमदारांना विचारला तर त्यांचं पहिलं उत्तर हे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची अनैसर्गिक युती असं आहे. त्यासोबतच त्यांचा दुसरा दावा हा आपल्याला पुरेसा निधी मिळत नव्हता असा आहे. दुसरा दावा हा खूप महत्त्वाचा असल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जात होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सर्व निधी मिळायचा पण आपल्याला मिळायचा नाही, असा त्यांचा दावा होता. या समस्येवर आपण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेदेखील आपली उद्विग्नता व्यक्त केल्याची माहिती त्यांनी दिली होती. पण त्यांनी आपल्या भूमिकेकडे लक्ष दिलं नाही. पण एकनाथ शिंदे यांनी आपल्याला झालेल्या त्रासाची दखल घेत नगरविकास खात्यातून निधी दिला, असं शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांचं मत होतं. विशेष म्हणजे आमदारांच्या याच भावनांची जाणीव एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठेवली आहे. त्यातूनच त्यांनी खूप मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे त्यांनी हा निर्णय फक्त त्यांच्या समर्थक आमदार किंवा भाजप आमदारांसाठी घेतलेला नाहीय, तर सर्वपक्षीय आमदारांसाठी घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांकडून आमदार विकास निधीसाठी तब्बल 276 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी प्रत्येक आमदाराला 80 लाखांचा निधी देण्यात येणार आहे. हा निधी जिल्ह्यातील विकासकामांसाठी वापरला जाणार आहे. सर्वपक्षीय आमदारांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वपक्षीय आमदारांना प्रत्येकी 80 लाखांचा विकास निधी दिला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने सगळे आमदार खूश होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंची नवी रणनीती, आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत, महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अंक

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा विधान परिषदेच्या सदस्यत्वाचादेखील राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. पण उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात विधान परिषदेच्या सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा दिला नव्हता. त्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या घडामोडींनंतर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे आपल्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाच्या म्हणजेच आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत. विधान परीषदेत शिवसेनेचं  संख्याबळ कमी होऊ नये म्हणून शिवसेना पक्ष कार्यकारणीने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

2 मराठी खेळाडू ठरणार मुंबईचे ट्रम्प कार्ड, परिस्थितीशी झगडत मिळवलंय यश

खो-खो लीगच्या पहिल्या सिझनला रविवारपासून पुण्यात सुरूवात होत आहे. या सिझनमध्ये 6 टीम सहभागी होणार असून 34 सामन्यांनतर पहिला विजेता निश्चित होईल. चेन्नई क्विक गन्स , गुजरात जायंट्स , ओडिशा जगरनॉट्स , राजस्थान वॉरियर्स , तेलुगु योद्धाज या पाच टीमसह मुंबई खिलाडीज ही टीम सहभागी होणार आहे.खो-खो लीगमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मुंबईच्या टीमकडे सर्वांचं लक्ष आहे. पुण्यातील बालेवाडीत होणाऱ्या या स्पर्धेत ही टीम विजेतेपदाची मुख्य दावेदार मानली जात आहे. मुंबईच्या या टीममध्ये अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश असून दोन मराठी खेळाडू या टीमचे ट्रम्प कार्ड आहेत.

4 वर्षांपूर्वी याच दिवशी सुबोध भावेनं चाहत्यांना दिलं होत खास सप्राइज; प्रेक्षकांची मिळाली होती पसंती

मराठी सिनेसृष्टीत उत्तमोत्तम बयोपिक करणारा सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे सुबोध भावे. अभिनेत्यानं आजवर अनेक वेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत. टेलिव्हिजनपासून सुरूवात करुन सुबोधनं नाटक आणि सिनेमातही आपली छाप उमटवली. सुबोधच्या या कारकिर्दीतील त्याची एक वेगळी भूमिका आजच्या दिवशी म्हणजेच 13 ऑगस्ट दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ज्या व्यक्तिरेखेनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. झी मराठीवरील ती मालिका आणि मालिकेतील व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. ती मालिका म्हणजे ‘तुला पाहते रे’. मालिकेचा एक फोटो सुबोध भावेच्या फॅन पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.

बॉयकॉट ‘पठाण’ ची मागणी करणाऱ्याला साधूंना जीवे मारण्याची धमकी

सध्या बॉलिवूडच्या  चित्रपटांना बॉयकॉट करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी सोशल मीडियावर त्या चित्रपटाला बॉयकॉट  करण्याचा ट्रेंड जोर धरतो आहे. नुकताच अमीर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाला याचा सामना करावा लागला आहे. आमिरच्या या  चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा हॅशटॅग प्रचंड प्रमाणात ट्रेंड झाला. या ट्रेंडचा परिणाम लाल सिंग चड्ढा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईवर पाहायला मिळाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होताना दिसतोय. अशातच शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाला देखील बॉयकॉट ट्रेंडचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेला  शाहरूख खान सध्या त्याच्या  ‘पठाण’  या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहरूख खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते  गेली चार वर्ष उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. आता येणाऱ्या वर्षात म्हणजेच जानेवारी 2023 रोजी पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण त्याआधी त्याला अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. शाहरुख खानच्या आगामी चित्रपट ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन कच्छ साधू समाजाच्या अध्यक्षांनी केले होते. पण त्यांना आता जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

भंगारातील साहित्यापासून बनविले देशी जुगाड

शेतीतील उत्पादन खर्च सातत्याने वाढत आहे. त्यात केलेल्या कष्टाच्या तुलनेत उत्पन्नाचा मेळ बसत नाही. यामुळे कष्ट कमी करणे आणि खर्च जास्तीत जास्त वाचवणे गरजेचे आहे. यासाठी शेतीत संशोधक वृत्ती महत्त्वाची आहे, अशाच वृत्तीतून केज तालुक्यातील पाथरा येथील प्रवीण पवार  या शेतकऱ्याने देशी जुगाडातून फवारणी यंत्राची निर्मिती केली आहे. या यंत्रांची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा होत आहे.सध्या सोशल मीडियावर जुगाड तंत्रज्ञानाच्या भन्नाट कल्पना पहायला मिळतात. या कल्पना प्रत्यक्षात उतरल्या तर अनेक कामे सहज आणि सोपी होतील. असा विचार करून अनेकजण या जुगाड तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामात करण्यास इच्छुक असतात. असे जुगाड तंत्रज्ञान शेतीसाठीही अतिशय फायदेशीर ठरू शकतात.

कौतुकास्पद! साडेसहा वर्षांच्या कबीरनं साडेतीन तासांमध्ये केले कळसुबाई सर

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून कळसुबाई या शिखराचं नाव घेतलं जातं. शिखराची उंची समुद्रसपाटीपासून 1646 मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून त्याची उंची सुमारे 900 मीटर आहे. कळसुबाई हे शिखर सर करण्यासाठी अनुभवी ट्रेकर्सची देखील दमछाक होते. मात्र, औरंगाबाद शहरातील साडेसहा वर्षांच्या कबीर शिंदेने हे शिखर फक्त साडेतीन तासांत सर केले आहे. यामुळे कबीरचं औरंगाबाद शहराच्या विविध भागातून कौतुक केले जात आहे. नेचर सेव्हिअर ग्रुपने नुकतीच कळसुबाई शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. या मोहिमेत अवघ्या साडेसहा वर्षांच्या कबीर शिंदे याने सहभाग घेतला होता.

आर आर पाटलांचा मुलगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, चर्चांना उधाण

राज्यात सध्या सत्तासंघर्षावरून राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभर दौरे करत आहेत. आज कोल्हापुरात पूर स्थितीचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौरा केला. यावेळी त्यांचं विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे युवा नेते आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सदस्य रोहित पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं आहे. यावेळी स्वागत करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमानंतर भाजप नेते थेट रुग्णालयात 

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने देशभरात तिरंगा यात्रेचं आयोजन केलं जात आहे. गुजरातमध्येही तिरंगा यात्रा काढण्यात आली. या तिरंग्या यात्रेत गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल सामील झाले होते. त्यांच्यासोबत झालेल्या एका अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मेहसाणाजवळ आयोजित केलेल्या तिरंग्या यात्रेदरम्यान नितीन पटेल यांच्यावर गाईने हल्ला केला. या हल्ल्यात नितीन पटेल यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

‘मन उडू उडू झालं’ चा शेवटचा भाग प्रदर्शित होताच हृता भावुक

झी मराठीवरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मालिका   ‘मन उडू उडू झालं’ आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. आज १३ ऑगस्ट रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. मालिकेचा वेगळा विषय प्रेक्षकांचं आकर्षण ठरला होता.दिपू आणि इंद्राची जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. अभिनेता अजिंक्य राऊत आणि हृता दुर्गुळे यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. परंतु, आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. इंद्रा आणि दिपूला प्रेक्षक मिस करणार आहेत.  एक चांगली मालिका संपतेय म्हणून प्रेक्षक दुःखी झाले आहेतच पण आता शेवटचा भाग प्रसारित होताना मालिकेचे कलाकार सुद्धा भावुक झालेत. अभिनेत्री ऋता दुर्गुळेने सोशल मीडियावर भावुक पोस्ट टाकली आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.