आता मुख्यमंत्र्यांनी सविस्तर सांगितली बंडखोरीमागील Inside Story
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात नुकताच जनगौरव सत्कार करण्यात आला. यावेळी शिंदे यांनी अनेक विषयांवर प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या. एकनाथ शिंदे म्हणाले, की मी मुख्यमंत्री पदाकरता हे पाऊल उचललं नाही. मी आजही मुख्यमंत्री झालो आहे, असं वाटत नाही. मात्र, अन्यायाविरोधात लढा द्या आणि सर्वसामान्यांना न्याय द्या, हे बाळासाहेब आणि आनंद दिघे यांनीच शिकवलं असल्याचं सांगत याच कारणामुळे आम्ही हे पाऊल उचलल्याचं ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले, की महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना ज्या घडामोडी घडल्या त्यावर सर्व आमदार नाराज होते. मात्र, आम्ही आदेशाचे पालन केलं. मी अनेक आमदारांना समजावलं. त्यावेळची परिस्थिती बिकट होती. मी आमदारांचं नाव घेणार नाही पण जे काही समीकरण सुरु होतं ते कोणालाच आवडलं नव्हतं. आमदारांचं खच्चीकरण होऊ लागलं. निधी विरोधकांना मिळू लागला. सत्ता आणि मुख्यमंत्री आपला असताना हे सर्व भोगावं लागलं.
पुढे ते म्हणाले, मी याबाबत उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. असचं सुरु राहिलं तर आपण निवडणुकीला कसं सामोरं जाणार? असा सवालही उद्धव ठाकरेंना केला. मी प्रयत्न केला पण दुर्दैवाने त्यात आम्हाला यश मिळालं नाही. बाळेसाहेबांच्या भाषणांची आठवण करून देत शिंदे म्हणाले, की जो मार्ग आम्ही पत्कारलेला आहे तो बाळासाहेबांच्या भूमिकेचा आहे. बाळासाहेबांची अनेक भाषणे आहेत ज्यात ते बोलतात, की काँग्रेस आणि NCP सोबत जायचं नाही. त्यांच्यासोबत कधी जायची वेळ आली तरी दुकान बंद करेन, असं बाळासाहेब ठाकरे बोलले होते, मग आम्ही काय चुकीचं केलं? असा सवाल शिंदेंनी केली. राष्ट्रवादीतील नेते जाहिरपणे बोलत होते, की पुढचा मुख्यमंत्री आमचाच असणार, असा दावाही त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीसांवरील प्रेम व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले, की मी काम करणा-या माणसावर प्रेम करतो. देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आहेत आणि कामाचा झपाटा लावतात. परिस्थितीमुळे आज मी मुख्यमंत्री झालो, त्यात फडणवीस यांचा मोठेपणा आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करुन सर्वांची तोंडं बंद केली. माझं नाव मुख्यमंत्रीपदी जाहीर होणार हे फडणवीस यांना माहिती होतं. मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तींना उपमुख्यमंत्री पदावर कसं बसवणार हे मला कळतच नव्हतं, मी त्यांना विचारलं तेव्हा ते बोलले की मला पक्षाचा आदेश शिरसंधान आहे.
पुढील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की पुढचे मंत्रिमंडळ विस्तार लवकरच सप्टेंबरमध्ये होणार. -विरोधकांचे खूप आमदार आजही आमच्या संपर्कात आहेत. पुढे ते म्हणाले, सावकारांच्याविरोधात जे वक्तव्य करायचे त्यांच्यासोबत आम्हाला सत्तेत बसावं लागत होतं. जेव्हा अन्याय होतो तेव्हा उठाव होतो. या उठावाची कल्पना आम्ही खूप आधी दिली होती. सुरतला जाईपर्यंत उद्धव ठाकरे आणि आमचा संवाद सुरुच होता. 370 कलम रद्द झाला त्याचाही आनंद आम्ही मविआत असताना साजरा करु शकलो नाही.
येणा-या सर्व निवडणूका भाजपा शिवसेना युती म्हणून लढणार, असंही त्यांनी जाहीर केलं. सोबतच सत्तेचा माज डोक्यात जाता कामा नये, असंही ते म्हणाले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी राज्याचा मुख्यमंत्री व्हायचं नाही का? जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत त्यांनीच मुख्यमंत्री व्हायचं का? असा सवालही त्यांनी केला.