‘3 दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकार बिनमंत्र्यांचे होते. 40 दिवसांनंतर कसाबसा मंत्रिमंडळाचा पाळणा हलला. दोन्हीकडच्या ‘नाकीनऊ’ अशा एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र त्याला तीन दिवस उलटले तरी खातेवाटपाचे ‘बारसे’ होऊ शकलेले नाही. कारण हे सरकार ‘संधीसाधूं’चे आहे. ज्यांना मंत्रिमंडळात ‘संधी’ मिळाली ते ‘साधू’ बनल्याचे ढोंग करीत आहेत आणि मलईदार खात्यापासून हवा तसा बंगला मिळावा यासाठी रस्सीखेच करीत आहेत. त्यामुळे बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे असे ‘नामुष्की सरकार’ सहन करण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे’ अशा शब्दांत शिवसेनेनं पुन्हा एका शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
पत्राचाळ प्रकरणामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या ऑर्थर रोड कारागृहामध्ये मुक्कामी आहे. पण, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिंदे सरकारवर टीकास्त्र सुरूच आहे.
‘राज्याच्या मंत्रिमंडळाचे ना खातेवाटप झाले आहे ना जिल्ह्या-जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरले आहेत. आधी मंत्रिमंडळ विस्ताराला 40 दिवस लागले; आता त्यातील खातेवाटपासाठीही घोळात घोळ सुरू आहे. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, ‘जो उशिरा आला त्याला पहिल्या पंगतीत बसविले आणि जो पहिला गेला त्याला शेवटच्या रांगेत बसविले आहे,’ अशा शब्दांत त्यांनी विद्यमान सरकारवर निशाणा साधला. पुन्हा त्यांनी या सरकारचे जाहीर ‘बारसे’ही करून टाकले आहे. ‘धोका देणाऱ्यांचे राज्य’ असे नामकरण त्यांनी या सरकारचे केले आहे. ‘जो जास्त धोका देणार तो मोठा नेता होणार आणि त्यालाच मंत्रिपद मिळणार,’ अशा शब्दांत बच्चू यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे ‘कडू’ सत्य पुन्हा चव्हाट्यावर आणले. अर्थात त्यात नवीन काय आहे? असा सवालच सेनेनं उपस्थितीत केेला.
‘शिंदे गट काय किंवा त्यांना मांडीवर घेणारा भाजप काय, दोघांचेही दुसरे नाव ‘विश्वासघात’, ‘धोका’ हेच आहे. शब्द द्यायचा आणि नंतर फिरवायचा ही तर भाजपची रीतच आहे आणि त्याचा प्रत्यय 2019 मध्ये महाराष्ट्राला आलाच आहे. त्याआधीही 2014 मध्ये शेवटच्या क्षणी त्यांनी विश्वासघात केलाच होता. शिंदे गटाने तरी दुसरे काय केले आहे? त्यांचा मुखवटा हिंदुत्व वगैरेचा असला तरी मूळ चेहरा विश्वासघात आणि धोकेबाजीचाच आहे, अशी टीकाही सेनेनं केली.