काँग्रेस आमदारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून चंद्रकांत खैरेंचे स्पष्टीकरण; म्हणाले, “मला असं म्हणायचं होतं की…”
शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडेल म्हणून देवेंद्र फडवणीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत, असा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करत जे आपला पक्ष सांभाळू शकले नाहीत, त्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल बोलू नये, असे प्रत्युत्तर दिले होते. दरम्यान, नाना पटोलेंच्या नाराजी नंतर चंद्रकांत खैरे यांनी आमदारांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
“भाजपा काँग्रेसच्या २२ आमदारांना फोडेल, असं मला म्हणायचं नव्हतं. तर भारत छोडो यात्रा सुरू असल्याचे काँग्रेसचे नेते सध्या व्यस्त आहेत. मात्र, भाजपाचे नेते संधीची वाट बघत आहेत. भाजपाकडून देशात फोडा फोडीचं राजकारण सुरू आहे. नाना पटोलेंना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. त्यामुळे माझ्या वक्तव्याने त्यांना दुःख झाले असेल, तर मी त्यांची नाराजी दूर करतो”, असं स्पष्टीकरण चंद्रकांत खैरे यांनी दिले आहे.
‘२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा ४०० पेक्षा अधिक जागांवर निवडून येईल’; चंद्रकांत पाटलांचा विश्वास
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रचार करण्याची गरज नाही. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचं भल केलं आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा ४०० पेक्षा अधिक जागांवर निवडून येईल, असा विश्वास पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व्यक्त केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये एका खासगी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात बोलत होते. सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची स्थिती ही खोटं बोल पण रेटून बोल अशी झाली असल्याचे म्हणत पाटील यांनी टीका केली आहे.
व्लादिमीर पुतिन यांच्याकडून भारताचे पुन्हा कौतुक
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतीयांचे पुन्हा एकदा तौंडभरून कौतुक केले आहे. भारतातील लोक हे प्रतिभावान आहेत. देशाचा विकास घडवून आणण्यात त्यांच्यात मोठी क्षमता आहे, असे पुतिन म्हणाले आहेत. ते ४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणाऱ्या रशियन दिवसाच्या (रशियन यूनिटी डे) एका कार्यक्रमात बोलत होते.
स्वतंत्र भारतामधील पहिले मतदार शाम शरण नेगी यांचे वयाच्या १०६ व्या वर्षी निधन
स्वतंत्र भारतामधील पहिले मतदार म्हणून ओळख असणारे श्याम शरण नेगी यांचे आज(शनिवार) सकाळी निधन झाले. हिमाचल प्रदेशमधील किन्नौरचे रहिवासी असणारे नेगी १०६ वर्षांचे होते. त्यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी २ नोव्हेंबर रोजी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावला होता. नेगी यांच्या अंत्यसंस्कारासाठी जिल्हाप्रशासनाकडून शासकीय व्यवस्था केली जात असल्याची माहिती किन्नौरचे जिल्हाधिकारी आबिद हुसैन यांनी दिली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर ‘आप’ला धक्का; इंद्रनील राजगुरूंची काँग्रेसमध्ये घरवापसी
गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षातर्फे (आप) इशुदान गढवी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्यात आले आहे. ‘आप’कडून शुक्रवारी तशी घोषणा करण्यात आली. मात्र एकीकडे ही घडामोड घडल्यानंतर दुसरीकडे ‘आप’ला निवडणुकीच्या तोंडावर एक धक्काही बसला आहे. कारण, पक्षाचे नेते इंद्रनील राजगुरू यांनी आम आदमी पार्टीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये घरवापसी केली.
श्रीलंकेमुळे पडली यजमान ऑस्ट्रेलियाची विकेट; इंग्लंडची उपांत्यफेरीमध्ये धडक!
सिडनी येथे इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेतील ३९ वा सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेवर ४ विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवणारा दुसरा संघ ठरला. श्रीलंकेने इंग्लंडला १४२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडने १९.४ षटकांत ६ गडी गमावून १४४ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा उपांत्य फेरीत जाण्याचा पत्ता कट झाला आहे.
उपांत्यफेरीत भारत कोणाविरुद्ध खेळणार? इंग्लंड की न्यूझीलंड? झिम्बाब्वेविरुद्ध पराभूत झाल्यास अथवा सामना रद्द झाल्यास…
पहिल्या गटामध्ये न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे समान म्हणजेच प्रत्येकी सात गुण असले तरी नेट रन रेटच्या जोरावर न्यूझीलंडने कालच उपांत्यफेरीचं तिकीट निश्चित केलं. तर आज इंग्लंडच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं. श्रीलंकन संघाने दिलेलं १४२ धावांचं आव्हान माजी विश्वविजेत्या इंग्लंड संघाने दोन चेंडू आणि चार गडी बाकी असताना पूर्ण केलं. या विजयाबरोबरच ते पहिल्या गटामधून उपांत्यफेरीसाठी पात्र ठरले आहेत. श्रीलंकेने अगदी शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली. मात्र बेन स्ट्रोक्सने संयम दाखवत संघाला सामना जिंकवून दिला.या विजयाबरोबरच आता दुसऱ्या गटातील तीन सामने उद्या खेळवले जाणार असून दुसऱ्या गटामधील संभ्रम अद्याप कायम आहे. असं असलं तरी सध्या दुसऱ्या गटामधून भारत आणि दक्षिण आफ्रिकाच उपांत्यफेरीमध्ये प्रवेश करतील असं चित्र दिसत आहे. भारताकडे सध्या सहा गुण आहेत. शेवटचा सामना जिंकून ते आठ गुणांसहीत अव्वल स्थान कायम राखू शकतात. तर दक्षिण आफ्रिकेकडे चार सामन्यांमध्ये पाच गुण आहेत.
आयसीसीने निश्चित केलेल्या नियमांनुसार सुपर १२ फेरीमध्ये दोन्ही गटांमधून प्रत्येकी दोन असे एकूण चार संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरतील. पहिल्या गटामधून आता न्यूझीलंड पहिल्या स्थानी तर इंग्लंड दुसऱ्या स्थानी पात्र ठरला आहे. दुसऱ्या गटातील तीन सामने रविवारी खेळवले जाणार असून त्यामधून अव्वल स्थानी कोण राहणार हे निश्चित होणार आहे. सध्याची स्थिती पाहता सर्व सामने प्रबळ संघांनी जिंकले तर भारत पहिल्या स्थानी कायम राहील तर दक्षिण आफ्रिका हा दुसऱ्या गटातून पात्र ठरणार दुसरा संघ ठरेल.दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामन्यात विजय झाला आणि भारत झिम्बाब्वेविरुद्ध पराभूत झाला तर दक्षिण आफ्रिका सात गुणांसहीत अव्वल स्थानी असेल. तर भारत दुसऱ्या स्थानावर राहून पात्र ठरेल. या उलट झिम्बाब्वेविरुद्धचा सामना भारताने जिंकला किंवा गुण वाटून दिले तर भारत दुसऱ्या गटात अव्वल स्थानी असेल.
गोव्यात उघड्यावर दारू पिण्यास बंदी! उल्लंघन केल्यास पिण्याची वासना राहणार नाही, सरकारचे कडक निर्बंध
तुम्ही तुमच्या मित्रांसोबत गोव्याला जाण्याचा प्लॅन अनेकदा केला असेल. गोव्यात तरुणांमध्ये पार्टी करण्याची प्रचंड क्रेझ आहे. तुम्हीही गोव्यात मित्रांसोबत पार्टी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गोव्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि पर्यटन स्थळांची स्वच्छता आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गोवा सरकारने पर्यटन स्थळांसाठी कडक नियम आणले आहेत. या नियमांचे उल्लंघन करताना कोणीही आढळल्यास मोठा भुर्दंड बसू शकतो.
काही लोक गोव्यात फिरण्याबरोबरच ड्रिंकचा आनंद घेण्यासाठीही गोव्यात येतात. कारण गोव्यात स्वस्तात दारू मिळते. म्हणूनच लोक मित्रांसोबत एन्जॉय करतात आणि बीचवर बसून दारू पिऊन पार्टी करतात. पण आता असं करणे शक्य होणार नाही. कारण अलीकडेच पर्यटकांसाठी नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्या नियमांचे पालन न केल्यास पर्यटकांना हजारो रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.
ज्येष्ठ बासरीवादक पंडित शशांक सुब्रह्मण्यम यांचा सन्मान, फ्रेंच नाइटहूड हा फ्रान्सचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
भारतीय कला आणि संस्कृती पुरातन वारसा असलेली आणि वैविध्यपूर्ण आहे. भारतातच नाही, तर जगभरात भारतीय कलेचं कौतुक होतं. आतापर्यंत अनेक भारतीय कलावंतांना परदेशातले मोठे पुरस्कार मिळाले आहेत. आता यात आणखी एका नावाची भर पडली आहे. भारतातले प्रसिद्ध बासरीवादक पंडित शशांक सुब्रह्मण्यम यांना नुकताच फ्रान्समधला फ्रेंच नाइटहूड हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘आज तक’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
फ्रेंच नाइटहूड (Chevalier de l’Ordre des et des Lettres) हा फ्रान्सचा राष्ट्रीय पुरस्कार आहे. भारतीय बासरीवादक आणि संगीत नाटक अकादमीचे वरिष्ठ पुरस्कार विजेते पंडित शशांक सुब्रह्मण्यम यांना यंदा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या क्षेत्रात त्यांची 35 वर्षांची साधना आहे. यामुळेच फ्रान्स सरकारनं त्यांना या पुरस्कारानं गौरवलं आहे.
सोयाबीन, कापसाच्या नुकसानीमुळे खाद्य तेलाचे दर वाढले, सर्वसामान्यांना फटका!
आनंदाचा सण असलेली दिवाळी आता संपलीय. सर्वजण सुट्टीवरुन परतून आपल्या कामाला लागले आहेत. दिवाळीनंतरही देशातील महागाईची परिस्थिती मात्र बदललेली नाही. रशिया-युक्रेन युद्ध आणि राज्यात मागच्या महिन्यात झालेली अतिवृष्टी याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर झाला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानं सोयाबीन आणि कापसाचं नुकसान झालं. या नुकसानीचा फटका खाद्य तेलाच्या किंमतीवर झाला आहे. औरंगाबाद मध्ये घरगुती तेलाच्या किंमतीमध्ये 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे.
जानेवारी ते मे महिन्यामध्ये तेलाचे भाव घसरले होते यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र रशिया युक्रेन युद्धाचा भडका सर्वत्र उडाला. मलेशिया आणि इंडोनेशियातून भारताला तेल आयात केले जाते. काही महिन्यांपूर्वी आयात बंदी झाल्याने करडई, शेंगदाणा, पाम तेल, सूर्यफुलाचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणारे पाम तेल देखील वाढले आहे.
SD Social Media
9850 60 3590