मानवी आयुष्य अनिश्चित देणे भरलेले आहे. केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. आता हेच पहा ना चोरी करून आणलेला पैसा पाहून एका चोराला इतका आनंद झाला की त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे. चोरी केलेल्या पैशातूनच त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशामध्ये ही घटना उघड झाली आहे.
उत्तर प्रदेशातील बिजनौरचे पोलीस अधीक्षक धरमवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन चोरांनी नवाब हैदर यांच्या मालकीच्या सार्वजनिक सेवा केंद्रामध्ये डल्ला मारला. १६ आणि १७ फेब्रुवारीच्या रात्री ही चोरी झाली. त्यानंतर हैदर यांनी या प्रकरणात पोलीस तक्रार दाखल करत केंद्रातून सात लाख रुपये चोरीला गेल्याचं आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. बुधवारी पोलिसांनी या प्रकरणात छडा लागल्याची माहिती देत दोघांना अटक करण्यात आल्याचं सांगितलं. नौशाद आणि अजीज असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नाव आहेत. हे दोघेही अलिपूर आणि नगिना पोलीस स्थानकाच्या हद्दीतील रहिवाशी आहेत. पोलिसांनी एका रेस्तराँमधून या दोन्ही आरोपींना पाळत ठेऊन अटक करण्यात आल्याची माहिती दिली.
“दोन्ही आरोपी सराईत चोर आहेत. त्यांच्याविरोधात अनेक पोलीस स्थानकांमध्ये तक्रारी दाखल आहेत. त्यांनी सार्वजनिक सेवा केंद्रामध्ये सात लाखांची चोरी केल्याचा गुन्हा कबुल केलाय. या केंद्रामध्ये काही हजार रुपये आपल्याला मिळतील असा अंदाज चोरांनी लावल्याची माहिती दिलीय. मात्र अपेक्षेपेक्षा जास्त पैसा या दोघांना या केंद्रातून मिळाला. त्यांनी मिळालेले पैसे अर्धे अर्धे वाटून घेतले. मात्र त्यानंतर लगेचच अजीजला हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारासाठी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिळालेल्या साडेतीन लाखांपैकी बराच पैसा अजीजने उपचारांवर खर्च केला.