आज दि.१७ जानेवारीच्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

देशातील सर्व रेल्वे स्टेशन्स फुलांची आरास अन् रोषणाईनं उजळणार; राम मंदिराचा सोहळा साजरा होणार

राम मंदिराचा उद्घाटनं सोहळा आता आठवड्यावर येऊन ठेपला आहे. यापार्श्वभूमीवर देशभरात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता देशभरातील सर्व रेल्वे स्टेशन्स फुलांची आरास अन् रोषणाईनं उजळून निघणार आहे, सुत्रांच्या हवाल्यानं एएनआयनं वृत्त दिलं आहे. 

नार्वेकरांच्या निकालाविरोधातील ठाकरेंच्या याचिकेवर आता २२ जानेवारीला होणार सुनावणी

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच निकाल जाहीर केला. पण हा निकाल विरोधात गेल्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर आता सोमवारी २२ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. याबाबत ठाकरेंच्या वकिलांनी सरन्यायाधिशांकडं विनंती केली आहे. 

सामान्य जनतेला आकर्षित करण्यासाठी काँग्रेसची खेळी; जाहीरनाम्यासंदर्भात घेतला ‘हा’ निर्णय

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करण्यासाठी काँग्रेस पक्ष थेट जनतेशी संवाद साधणार आहे. मतदारांना ऑनलाईनद्वारे सुद्धा काँग्रेसकडे आपल्या सूचना व प्रस्ताव पाठविता येणार आहेत. या सूचनांचा विचार करून काँग्रेस पक्ष निवडणूक जाहीरनामा तयार करणार आहे.काँग्रेसने निवडणूक जाहीरनामा तयार करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली १६ सदस्यीय समिती गठित केली आहे. या समितीची काही दिवसांपूर्वी दिल्लीत बैठक झाली होती. यात लोकांच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत, याचे प्रतिबिंब निवडणूक जाहीरनाम्यात पडले पाहिजे, या प्रकारचे विचार व्यक्त करण्यात आले होते.

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा, कुकी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह या सीमावर्ती भागातील शहरामध्ये संशयित कुकी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.वांगखेम सोमोरजित असे मरण पावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून तो पश्चिम इंफाळ जिल्ह्यातील रहिवासी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सुरक्षा दले आणि संशयित कुकी दहशतवाद्यांमध्ये बुधवारी सकाळी चकमक झाली. या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या चौकीवर बॉम्ब फेकत गोळीबार देखील केला.

खर्गे, पवार, ममतांनंतर आता लालूंचाही नकार! राम मंदिर सोहळ्याला लावणार नाहीत हजेरी

अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळ्यावर राजकीय सोहळा असं संबोधत इंडिया आघाडीतील बहुतांश पक्षांनी बहिष्कार घातला आहे. यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेसनं आपण या सोहळ्याला जाणार नाही, असं जाहीर केलं आहे. त्यात आता राष्ट्रीय जनता दलही या कार्यक्रमात सहभागी होणार नाही, अशी घोषणा पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केलं आहे. 

टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने टाकल्या नांग्या! शिवम दुबे एक तर कोहली, सॅमसन शून्यावर तंबूत

अफगाणिस्तानविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाची टॉप ऑर्डर पूर्णपणे फेल ठरली. यशस्वी जैस्वाल चार धावा करून बाद झाला तर शिवम दुबे एक धाव काढून बाद झाला. तर विराट कोहली आणि संजू सॅमसन गोल्डन डकचे बळी ठरले. सध्या कर्णधार रोहित शर्मा आणि रिंकू सिंग क्रीजवर आहेत.

उद्यापासून शाकंभरी नवरात्र उत्सव सुरू

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास गुरूवार, १८ जानेवारी रोजी घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे. नवरात्रापूर्वीच्या मंचकी निद्रेस दर्शवेळा अमावस्येच्या दिवशी प्रारंभ झाला होता. गुरूवारी पहाटे देवीची मंचकी निद्रा संपून सिंहासनावर देवीच्या मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना आणि घटस्थापना होणार आहे. २५ जानेवारी रोजी घटोत्थापन व २६ जानेवारी रोजी महाप्रसाद आणि रात्रीच्या छबिना मिरवणुकीने नवरात्रौत्सवाची सांगता होणार आहे.

प्रणिती शिंदे भाजपामध्ये जाणार का?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपाकडून पक्षप्रवेशाची ऑफर मिळाली होती, असा गौप्यस्फोट करून आज महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यानंतर राजकीय क्षेत्रातून यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. काँग्रेसपेक्षा भाजपाच्याच नेत्यांनी हिरीरीने प्रतिक्रिया दिल्या. त्यात राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर येथे सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे या गोंधळात आणखी भर पडली. शिंदे यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांसमोर याबाबतचा खुलासा केला.भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यास भाजपाचे नेते तुमचे स्वागत करणार आहेत, असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता शिंदे म्हणाले की, भाजपाचे लोक स्वागत तर करणारच. पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रत्येकाचेच स्वागत केले जाते. भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत आणखी स्पष्टपणे सांगताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, मी याआधीच माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. माझे आयुष्य काँग्रेसमध्ये गेले, मी काँग्रेसी आहे. त्यामुळे कुठेही जाण्याचा प्रश्नच येत नाही. मग प्रणिती शिंदे या भाजपाच जाणार का? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता ते म्हणाले, “प्रणितीच्या मनात काय आहे, हे मी सांगू शकत नाही. ती प्रगल्भ आणि स्वतंत्र आहे.”

“आता मथुरेत कृष्णाचं भव्य मंदिर…”, भाजपा खासदार हेमामालिनी यांचं वक्तव्य चर्चेत

अयोध्येत रामाचं मंदिर उभं राहतं आहे ही खूपच चांगली आणि आनंदाची बाब आहे. आता आमची मागणी आहे की कृष्णाचं भव्य मंदिर मथुरेत उभं रहावं असं भाजपा खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी यांनी म्हटलं आहे. ANI या वृत्तवाहिनीशी त्यांनी अयोध्येत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे.“मथुरेत कृष्णाचं भव्य मंदिर झालं पाहिजे. मथुरेत जर तुम्ही नजर मारलीत तर तुम्हाला कळेल की हे मंदिरांचं शहर आहे. मात्र कृष्णजन्मस्थळ तोडून तिथे मशिद बांधण्यात आली. हा प्रश्न जर सुटला तर खूपच चांगलं होईल. मथुरा हे भगवान कृष्णाची जन्मभूमी आहे. या ठिकाणी भव्य मंदिर झालं पाहिजे. मशिदीचा वाद जो आहे तो मिटला पाहिजे. आत्ता तिथे मंदिर आहे. ते मंदिर सुंदर आहे, मात्र या ठिकाणी भव्य मंदिर बांधलं गेलं पाहिजे.” असं हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे.

झिम्बाब्वेचा ११ चेंडूत ३४ धावा करून विजय

श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसरा सामना खूपच रोमांचक झाला. आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात झिम्बाब्वेने सहा गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. झिम्बाब्वेचा हा श्रीलंकेविरुद्धचा पहिला टी-२० विजय होता. १७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला शेवटच्या षटकात २० धावांची गरज होती. अँजेलो मॅथ्यूजने हे षटक टाकले आणि एक चेंडू शिल्लक असताना झिम्बाब्वेने चार विकेट्स राखून विजय मिळवला.

सिद्धार्थ जाधवच्या नवीन सिनेमाची घोषणा! ‘लग्न कल्लोळ’ सिनेमाची घोषणा

सध्या मराठी मनोरंजन विश्वात विविध विषयांवरचे सिनेमे लोकांच्या भेटीला येत आहेत. अशातच सिद्धार्थ जाधवचा नवीन सिनेमा लोकांच्या भेटीला आलाय. या सिनेमाचं नाव आहे ‘लग्न कल्लोळ’.

सिद्धार्थ जाधवच्या ‘लग्न कल्लोळ’ सिनेमाचं पोस्टर भेटीला आलंय. या पोस्टरमधून हटके विषय आणि तगडी स्टारकास्ट लोकांच्या भेटीला येणार आहे.मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचे नवीन मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. या जबरदस्त पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव लग्नाच्या पेहरावात दिसत आहेत. तिघांच्याही हातात हार असून आता ही वरमाला कोणाच्या गळ्यात पडणार, हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(छायाचित्र गुगल साभार )

SD Social Media

9850603590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.