गोड हास्य, भाळी टिळा… रामलल्लाचं मुखदर्शन पहिल्यांदाच! पूर्ण छायाचित्र आलं समोर
अयोध्या येथील राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या मूर्तीची दृष्य समोर आलेली आहेत. काळ्या पाषाणतल्या मूर्तीचे फोटो माध्यमांमध्ये झळकले आहेत.म्हैसुरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितलं की, तीनपैकी एका मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.”रामलल्लाच्या उर्वरित दोन मूर्ती मंदिराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात येतील. मंदिराचा पहिला मजला तयार होताच दुसऱ्या मूर्तीची विधीवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली जाईल आणि त्यानंतर शेवटच्या मजल्यावर तिसरी मूर्ती स्थापित केली जाईल.” ज्या मूर्तीची २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्या मूर्तीचं पूर्ण छायाचित्र आता समोर आलेलं आहे. काळ्या पाषाणातली ही मूर्ती अत्यंत सुंदर आहे. चेहऱ्यावर गोड हास्य आहे आणि भाळी टिळा लावलेले रामलल्ला मनमोहक दिसत आहेत.
राम मंदिर उद्घाटनानिमित्त राज्य सरकारचा मोठा निर्णय, २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर
येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. संपूर्ण देशभरात आत्तापासूनच या सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. अयोध्येत या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. श्री राम जन्मभूमी ट्रस्टने देशभरातील हजारो दिग्गजांना या सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं आहे. तसेच मंदिर ट्रस्ट या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करणार आहे. त्यामुळे देशभरातील नागरिक दृकश्राव्य माध्यमातून हा सोहळा पाहू शकतील. दरम्यान, मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी २२ जानेवारी रोजी हाफ डे घोषित केला आहे. पाठोपाठ महाराष्ट्रातील महायुती सरकारनेही मोठा निर्णय जाहीर केला आहे.
NASA ने चांद्रयान-3 लँडरची केली विचारपूस
चांद्रयान-३ चंद्रावर पोहोचून ५ महिने झाले आहेत. दरम्यान, आता अशी बातमी आहे की अंतराळ संस्था नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस अॕडमिनिस्ट्रेशनने चंद्रावरील विक्रम लँडरशी संपर्क साधला आहे. अंतराळ संशोधनाच्या दृष्टीकोनातून हे अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते, असे बोलले जात आहे. नासाच्या एका यानाने चंद्राच्या पृष्ठभागावर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) चांद्रयान-3 ला संदेश पाठवला आहे.ISRO ने सांगितले की LRO ने चंद्रावर फिड्युशियल पॉइंट (अचूक मार्कर) म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे. रिफ्लेक्टर बनवणाऱ्या नासाच्या टीमचे प्रमुख झियाओली सन म्हणाले की, या यशामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर लक्ष्य शोधण्याच्या नवीन शैलीचा रस्ता खुला झाला आहे. लेझरद्वारे पृथ्वीवरील उपग्रहांचा मागोवा घेणे सामान्य आहे, परंतु त्या तंत्रज्ञानाचा वापर करून अंतराळातून पृष्ठभागावर वाहने शोधणे खूप खास आहे. यामुळे चंद्रावर सुरक्षित लँडिंगचा मार्ग मोकळा होऊ शकतो. नासाच्या म्हणण्यानुसार, या तंत्रज्ञानाचा भविष्यात अनेक प्रकारे वापर केला जाऊ शकतो. अंतराळवीरांना मार्गदर्शन करण्यापासून ते तळाजवळील पुरवठा जहाजांच्या स्वयंचलित लँडिंगपर्यंतचे उपयोग शक्य आहेत.
‘बारामती अॅग्रो’ प्रकरणी रोहित पवारांना ईडीचं समन्स
बारामती अॅग्रो प्रकरणामध्ये ईडीने रोहित पवारांना समन्स बजावलं आहे. या प्रकरणी ईडीने त्यांना बुधवारी चौकशीसाठी बोलावलं आहे.
सुप्रीम कोर्टाचा राहुल गांधींना दिलासा! विरोधात याचिका करणाऱ्यांना ठोठावला एक लाखाचा दंड
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व बहाल केल्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. मोदी आडनावाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या प्रकरणात सुरतच्या एकाकोर्टाने राहुल गांधी यांना शिक्षा सुनावली होती. यामुळे त्यांचे सदस्यत्व धोक्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात राहुल गांधी यांना दिलासा दिला होता. त्यामुळे त्यांची सदस्यता पुन्हा बहाल करण्यात आली.सर्वोच्च न्यायालयाने फक्त ही याचिकाच फेटाळली नाही, तर त्यासोबतच याचिकाकर्त्यांना दंड देखील ठोठावला आहे. न्यायालयाने याचिका बिनबुडाची असल्याचे म्हणत याचिकाकर्ते अशोक पांडे यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
माजी महापौर किशोरी पेडणेकरांना ईडीचे समन्स
कोरोना काळतील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकरांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत.
IPO गुंतवणूकदारांसाठी सेबी प्रमुखांचा सावधानतेचा इशारा!
बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाचे (सेबी) म्हणणे आहे की, जास्त सबस्क्रिप्शन दाखवण्यासाठी आयपीओ अर्जांमध्ये हेराफेरीची प्रकरणे तपासली जात आहेत. सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी सांगितले की, सेबी अशा तीन प्रकरणांची चौकशी करत आहे. मात्र, तपासाचे स्वरूप त्यांनी सांगितले नाही.
त्या म्हणाल्या की, गैरप्रकारांमध्ये काही मर्चंट बँकर्सची नावेही समोर आली आहेत. एआयबीआय 2023-24 च्या वार्षिक परिषदेमध्ये बुच यांनी ही माहिती दिली.गेल्या काही महिन्यांत डझनभर कंपन्या बाजारात लिस्ट झाल्या आणि बहुतेक आयपीओंना अनेक पट सबस्क्रिप्शन मिळाले. एआयबीआय अर्थात असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट बँकर्स ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच म्हणाल्या की, आयपीओ बरेच व्यापारी खरेदी करत आहेत पण यात गुंतवणूकदार नाहीत.
आरबीआयचा सहकारी बँकांना दणका; 50 लाखांहून अधिकचा ठोठावला दंड
18 जानेवारी 2024 रोजी रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. या बँकांना लाखोंचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे पाऊल उचलले आहे.
ज्या सहकारी बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक, मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक, गुजरातची मेहसाणा नागरीक सहकारी बँक आणि गुजरातची पाटडी नागरीक सहकारी बँक लिमिटेड यांचा समावेश आहे.रिझर्व्ह बँकेने मुंबईच्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याने बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने केलेल्या तपासात असे समोर आले आहे की 2020-21 या आर्थिक वर्षात बँकेने नफ्यातून देणगी देताना आरबीआयचे नियम पाळले नाहीत.
आत्मसमर्पणासाठी आणखी मुदत मागणाऱ्यांना ‘सर्वोच्च’ दणका!
बिल्किस बानो प्रकरणातील बलात्कार आणि तिच्या कुटुंबीयांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या 11 पैकी नऊ दोषींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आत्मसमर्पण करण्यासाठी आणखी वेळ देण्याची विनंती केली होती. या याचिकांवर आज(शुक्रवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. सुप्रीम कोर्टाने बिल्किस बानो प्रकरणातील सर्व 11 दोषींचे अर्ज फेटाळून लावले आहेत. सर्व दोषींना 21 जानेवारीपर्यंत आत्मसमर्पण करण्याची मुदत देण्यात आली आहे.
पाच विजेतेपदं पटकावणाऱ्या भारतासमोर तगडं आव्हान…
19 वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेची आजपासून (दि. 19) सुरूवात झाली. यंदाचा 19 वर्षाखालील वर्ल्डकप श्रीलंका येथे होणार होता. मात्र ऐनवेळी त्याचे यजमानपद दक्षिण आफ्रिकेकडे सोपवण्यात आले. भारतीय संघ उदय सहारनच्या नेतृत्वाखाली खेळणार असून भारतीय संघ आपली मोहीम शनिवारपासून सुरू करणार आहे. पहिल्याच सामन्यात भारतासमोर बांगलादेशचे आव्हान असणार आहे.
भारतीय संघाने 19 वर्षाखालील वर्ल्डकपचे 2002, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये विजेतेपद पटकावलं होतं. यंदा पुन्हा एकदा भारतीय संघ विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. यंदाच्या स्पर्धेत चार ग्रुप केले आहेत. यात चार चार संघ समाविष्ट असणार आहेत.
प्रत्येक ग्रुपमधील पहिले तीन संघ सुपर सिक्समध्ये पोहचणार आहे. सुपर सिक्स फेरी ही 30 जानेवारीपासून सुरू होईल तर पहिली सेमी फायनल ही 6 आणि दुसरी सेमी फायनल ही 8 फेब्रुवारीला होणार आहे. तर अंतिम सामना 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
ऐतिहासिक! चीनमध्ये माकडाचं यशस्वी क्लोनिंग.. दोन वर्षांचा झाला ‘रेट्रो’; माणसांचंही लवकरच शक्य?
चीनच्या वैज्ञानिकांनी एक मोठी घोषणा केली आहे. एका रीसस माकडाचे यशस्वी क्लोनिंग केल्याचा दावा या वैज्ञानिकांनी केला आहे. क्लोनिंगच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं हे माकड आता दोन वर्षांचं झालं आहे. रेट्रो असं या माकडाचं नाव आहे. 1996 साली काही वैज्ञानिकांनी पहिल्यांदाच एका प्राण्याचा यशस्वी क्लोन तयार केला होता. डॉली नावाच्या एका बकरीचा क्लोन बनवण्यासाठी वैज्ञानिकांनी सोमॅटिक सेल न्यूक्लिअर ट्रान्सफर (SCNT) नावाच्या टेक्निकचा वापर केला होता. याच टेक्निकमध्ये थोडाफार बदल करून आता चीनच्या वैज्ञानिकांनी रेट्रो माकडाचा क्लोन बनवला आहे.
”जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय मैदानात उतरून लोकसभा निवडणूक लढविले पाहिजे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आतापर्यंत जरांगे पाटलांचा गरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी रस्त्यावर लढा सुरू आहे. या लढा त्यांनी आता कायदेमंडळापर्यंत पोहोचविण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले पाहिजे. त्यांनी ही भूमिका घेतली तर वंचित बहुजन आघाडीही त्यांना पाठिंबा देण्याबाबत भूमिका स्पष्ट करेल, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
बिल्किस बानोच्या वकील अॅड. शोभा गुप्ता यांना बढती; सुप्रीम कोर्टानं दिला वरिष्ठ वकिलाचा दर्जा
सुप्रीम कोर्टानं आज ५६ वकील आणि अॕडव्होकेट-ऑन-रेकॉर्ड (AoR) यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केलं आहे. यामध्ये बिल्किस बानो सामुहिक बलात्कार आणि कुटुंबियांच्या हत्या प्रकरणातील वकील अॕड. शोभा गुप्ता यांना बढती मिळाली आहे. सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधिशांची एक बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत ५६ वकिलांना आणि अॕडव्होकेट ऑन रेकॉर्ड यांची वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती केली. शोभा गुप्ता या बिल्किस बानो प्रकरणात अॕडव्होकेट ऑन रेकॉर्ड आहेत. म्हणजेच त्या अशा कायदेशीर व्यावसायिक आहेत ज्या सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करण्यास पात्र आहेत.
राज्यातील शेतकरी झाले ‘स्मार्ट’
राज्यात महसूल विभागाने गेल्या चार ते पाच वर्षांपासून राज्यातील पिकांची ऑनलाइन नोंदणी घेण्यास सुरुवात केली आहे. ही नोंदणी ई-पीक पाहणी या मोबाइल ॲपमध्ये करता येते. शेतकरीच या उपयोजनमध्येे पिकांची माहिती तसेच शेतात उभ्या असलेल्या पिकांचे फोटो अपलोड करतात. सन २०२३-२४ या वर्षासाठी महसूल विभागाने केलेल्या ई-पीक पाहणी नोंदणीत आतापर्यंत राज्यात दीड कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंदणी ॲपद्वारे केली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी ‘स्मार्ट’ झाले असल्याचे महसूल विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र राज्य मंडळाकडून २२ जानेवारी रोजी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार असून, कनिष्ठ महाविद्यालयांनी कोणतेही शुल्क न घेता प्रवेशपत्राची प्रत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहे.राज्य मंडळाच्या सचिव डॉ. अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत लेखी परीक्षा होणार आहे, तर तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ ते २० फेब्रुवारी या दरम्यान घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाकडून २२ जानेवारीपासून प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष उलगडणार चित्रपटातून! ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका
सध्या महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील हे नाव खूपच चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी पुकारलेल्या उपोषण आंदोलनमुळे जरांगे पाटील यांचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. सरकारने अध्यादेश दाखवल्यानंतरही त्यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. आता लवकरच मनोज जरांगे पाटील यांच्यावर चित्रपट येणार आहे. ‘संघर्षयोद्धा : मनोज जरांगे पाटील’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटातून त्यांनी मराठा आरक्षणासाठी केलेला संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील साकारणार आहे. रोहन पाटील यांच्याबरोबर या चित्रपटात सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा गोवर्धन दोलताडे यांनी लिहिली असून, निर्मितीही त्यांनीच केली आहे. २६ एप्रिल २०२४ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
प्रतीक्षा संपली! प्रभासचा ब्लॉकबस्टर ‘सालार’ या तारखेपासून ओटीटीवर
साऊथचा रिबेल स्टार प्रभासने २०२३ ची अखेर सुपरहिट केली. प्रभासच्या ‘सालार’ सिनेमाने अनपेक्षितरित्या संपूर्ण भारतभरात चांगली कमाई केली. ‘सालार’ने आतापर्यंत ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली.
प्रभासचा सालार संपूर्ण भारतभरात हाऊसफुल्ल गर्दीत रिलीज झाला. ज्या लोकांना ‘सालार’चा अनुभव थिएटरमध्ये घेता आला नाही, त्यांच्याशी आनंदाची बातमी. ‘सालार’ आता ओटीटीवर रिलीज होत असून सिनेमाचा घरबसल्या आनंद घेता येणार आहे.
SD Social Media
9850603590