शेतकऱ्यांच्या बंदला
सर्वत्र प्रतिसाद
मोदी सरकारच्या नव्या 3 कृषी कायद्यांविरोधात आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी देशाची राजधानी दिल्लीतून देशव्यापी भारत बंदची हाक दिली. त्याला सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळला आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथेही रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. तामिळनाडूतील थिरुपूर येथे भारत बंदला पाठिंबा देणाऱ्या आंदोलकांनी रस्त्यावर बसून आपला निषेध व्यक्त केला.
सिंघू सीमेवर
एका शेतकऱ्याचा मृत्यू
हरियाणातील सिंघू सीमेवर आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर अधिक तपशील शेअर केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवली आहे.
शाळा सुरू करणार मात्र
तयारीसाठी निधी कुठून आणायचा
करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शाळा सुरू करण्यासाठी घ्यावयाची काळजी, आवश्यक तयारी याबाबत सूचनांची मोठी यादी विभागाने शाळांना दिली आहे. मात्र, या तयारीसाठी लागणारा खर्च करण्याबाबत मात्र विभागाने कच खाल्याचे दिसत आहे. आवश्यक तयारीसाठी लागणारा खर्च कंपन्यांकडून मिळणारा सामाजिक उत्तरदायित्व निधी, लोकसहभाग यातून करण्यात यावा, अशी सूचना शाळांना देण्यात आली आहे.
राज्यसभा निवडणूक
बिनविरोध होणार
राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती. महाराष्ट्राच्या परंपरेनुसार ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देत आणि राज्याची परंपरा कायम राहावी, यासाठी भाजपाचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
काळ्या यादीमध्ये पंकजा मुंडेंचा
साखर कारखाना देखील
साखर आयुक्तांकडून राज्यातील ४४ साखर कारखान्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे, म्हणजेच ब्लॅक लिस्टेड करण्यात आलंय. या काळ्या यादीमधील कारखान्यांमध्ये भाजपा नेते सुभाष देशमुख यांच्या लोकमंगलचा तसेच पंकजा मुंडे यांच्याही साखर कारखान्याचा समावेश आहे. हे ४४ कारखाने शेतकऱ्यांची कोणत्या ना कोणत्या मार्गाने फसवणूक करत असल्याचं साखर आयुक्तांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांचा ऊस घेऊन नंतर त्यांची फसवणूक करणाऱ्या साखर कारखान्यांचा खरा चेहरा शेतकऱ्यांसमोर यावा.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री फालेरो
तृणमूल काँग्रेस मध्ये जाण्याची शक्यता
गोव्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस बडे नेते असलेल्या लुईझिन्हो फालेरो यांनी पक्षातून आपला राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लुईझिन्हो फालेरो हे लवकरच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात. फालेरो यांनी यापूर्वी नुकतंच ममतांचं कौतुक देखीलं केलं होतं. आता राजीनाम्यानंतर समर्थकांना संबोधित करताना फालेरो म्हणाले की, “मी काँग्रेसमध्ये त्रस्त होतो. मला गोव्याचा हा त्रास संपवायचा आहे. जर माझं दुःख इतकं असेल कॉंग्रेससाठी मतदान करणाऱ्या गोव्यातील नागरिकांच्या दुर्दशेची कल्पना करा.”
पश्चिम बंगाल मध्ये प्रचारादरम्यान
भाजप खासदारावर हल्ला
पश्चिम बंगालच्या राजकारणात भवानीपूर पुन्हा एकदा केंद्रस्थानी आहे. भवानीपूर पोटनिवडणुकीत प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. तृणमूल आणि भाजपाने ही जागा जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी येथून निवडणूक लढवत आहेत. भाजपाने प्रियांका तिब्रेवाल यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, प्रचारादरम्यान तृणमूल समर्थकांनी दिलीप घोष यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. दिलीप घोष यांची भवानीपूरमध्ये पदयात्रा सुरू होती त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
डेक्कन ओडीसीप्रमाणे सुविधा द्या,
आम्ही कॅबिनेट बैठक घेऊ : मुख्यमंत्री
जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाने आज (27 सप्टेंबर) आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची घोषणा केलीय. आगामी काळात पर्यटन विभागाने डेक्कन ओडीसीप्रमाणे सुविधा सुरू करावी. आम्ही आमची कॅबिनेट बैठक रेल्वे किंवा त्या विमानातून करु, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. यावेळी राज्याच्या पर्यटन विभागाला काहीही कमी पडू देणार नाही. राज्य सरकार आणि राज्याचं अर्थखातं त्यांच्या पाठीशी आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
साताऱ्यात अल्पवयीन मुलीची
स्मशानभूमीत पूजा करण्याचा प्रकार
साताऱ्यातील सुरूर (ता वाई) येथील अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पुजण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ माजली आहे. हा प्रकार पुण्यातील मांत्रिक व मुलीच्या नातेवाईकांकडून घडला आहे. दरम्यान हा प्रकार स्थानिक युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी आणि तिचे नातेवाईक बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी भुईंज (ता. वाई) पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक (वाई) डॉ शीतल जानवे खराडे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत.
ग्रामीण भागातील तरुणांना
HDFC बँक देणार रोजगार
देशातील सर्वात मोठी खासगी बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) एका निर्णयामुळे आगामी काळात ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होणार आहे. एचडीएफसी बँकेने ग्रामीण भागात विस्तार करण्याची योजना आखली आहे. त्यादृष्टीने देशातील दोन लाख गावांमध्ये बँकेच्या शाखांचे जाळे उभारण्यात येईल. यासाठी साहजिकच बँकेला कर्मचाऱ्यांची गरज भासेल. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना नोकरीची संधी मिळू शकेल.
SD social media
9850 60 3590