राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चुरस आणखी वाढली आहे. शिवसेनेनं दोन उमेदवार मैदानात उतरवले आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी उमेदवार मैदानात आहे. पण, भाजपने आता तिसरी जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी आता 7 उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे.
राज्यसभा निवडणूक आता बिनविरोध होणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून एकूण 7 उमेदवार रिंगणार उतरले आहे. ३ जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख त्या दिवशी राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष लढत होणार हे स्पष्ट होणार आहे.
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना विरुद्ध भाजप अशी प्रतिष्ठेची लढत होणार आहे. भाजपने तिसरा अतिरीक्त उमेदवार रिंगणात उतरवला आहे. तोही कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांना. त्यामुळे शिवसेनेचे दुसरे उमेदवार कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता प्रत्यक्ष मतदान होऊन निवडणुकीत दोघांपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. राज्यसभेच्या ६ जागापैकी २ जागा निवडून आणण्याची मतदान क्षमता भाजपकडे आहे.
मात्र भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडीक यांना निवडुन आणण्यासाठी भाजपला 18 अतिरीक्त मतांची बेगमी करावी लागणार आहे. त्यासाठी अपक्ष आणि इतर पक्षांतील आमदारांची फोडा फोडी करण्यासाठी घोडाबाजार होण्याची शक्यता नाकारत येत नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्ष निवडणुकीची वेळ आल्यास आवाजी पद्धतीने हात वर करून मतदान होणार आहे. त्यामुळे भाजपला आमदाराचा घोडेबाजार करता येणार नाही. पण भाजपने तिसरा उमेदार रिंगणात उतरवला आहे मग निश्चितच त्यांच्या विजयाचेही गणित सोडवण्यासाठी रणनिती आखली असणार आहे.
राज्यसभा निवडणुकीचा रणसंग्राम
1) राज्यसभेच्या 57 जागांच्या सदस्यांचा कार्यकाळ 4 जुलै रोजी संपत आहे.
2) केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीची घोषणा केली असून, त्यासाठी 24 ते 31 मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल केले जातील.
3) अशा स्थितीत उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी 1 जूनला होणार आहे, तर 3 जूनपर्यंत नावे मागे घेता येणार आहेत.
4) राज्यसभेसाठी 10 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत विधान भवनात मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजेपासून मतमोजणी सुरू होईल.
5) येत्या 3 जून रोजी राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष मतदान होऊन लढत होणार हे स्पष्ट होईल.