जळगाव : महाशिवरात्रीच्या निमित्ताने जळगावातील गणेश घाटावर मातृशक्ती तर्फे सामूहिक शिव तांडव गायनाचा कार्यक्रम झाला. जवळपास शंभरच्यावर महिलांनी हातात दिवे घेऊन शिव तांडव स्तोत्राचे गायन केले.
महाशिवरात्रीच्या पावन दिनी, मेहरूण तलावा जवळील श्री. गणेश घाटावर मातृशक्ती तर्फे सामूहिक शिव तांडव स्तोत्र गायनाचा नयनमनोहर सोहळा संपन्न झाला. तिन्ही सांज, सूर्यास्ताची वेळ आणि महाशिवरात्रीचा प्रदोष काळ असा दुग्धशर्करा योग असतानाच, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली.
प्रथम शंखनाद, ओंकार त्यानंतर एका सूरात सहभागी भगिनींनी शुभंकरोती म्हणून शेकडो दीप उजळले आणि दीपज्योती ला नमन केले.
सुमारे शंभर महिलांनी स्वस्तिक आणि ओम या पवित्र चिन्हांच्या आकारात स्थानापन्न होऊन, दोन्हीं हातात दिवे घेऊन शिवतांडव स्तोत्र सादर केले. कार्यक्रमाची सांगता मान्यवर मातृशक्ती च्या हस्ते शिवशंकराला पंचारती ओवाळून झाली. पंचतत्त्वांच्या सानिध्यातील हा सोहळा पाहून उपस्थित जनसमुदायाच्या डोळ्यांचे पारणे फिटले. कार्यक्रमाला सुचिता हाडा, गायत्री राणे, सीमा भोळे, लक्ष्मी तलरेजा, तृप्ती चौबे या शहरातील मान्यवर महिलांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला सखी नमकीन या व्यापारी प्रतिष्ठानचे सहाय्य लाभले. कार्यक्रम स्थळी उभारलेले आणि सुशोभित केलेले भव्य शिवलिंग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंजली हांडे, कांचन साने, सविता दातार, समृद्धी सहस्त्रबुद्धे लीना नारखेडे, साधना दामले, संगीता अटरावलकर, कविता दातार, वर्षा पाठक या मातृशक्ती च्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.