युद्धाच्या 50 व्या दिवशी मोठा ट्विस्ट, काळ्या समुद्रातल्या घटनेनं रशियाला मोठा झटका
आज रशिया-युक्रेन युद्धाला 50 दिवस पूर्ण झाले आहेत. या युद्धात रशियाचं मोठं नुकसान झालंय. हजारो रशियन सैनिक मारले गेले आहेत. गुरुवारी रशियन सैन्याला मोठा झटका बसला. एएफपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रशियाची सर्वात मोठी युद्धनौका काळ्या समुद्रात नष्ट झाली आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं काळ्या समुद्रात युद्धनौका नष्ट झाल्याची पुष्टी केली आहे. रशियन संरक्षण मंत्रालयानं सांगितलं की, युद्धनौकेवर तैनात असलेल्या सर्व क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे.
रिपोर्टनुसार, रशियाची ही मिसाईल क्रूझर काळ्या समुद्रात तैनात होती आणि सतत शत्रूंवर नजर ठेवत होती. पण ही युद्धनौका आता नष्ट झाली आहे. यावर झालेल्या स्फोटात मिसाईल क्रूझरचं मोठं नुकसान झालं आहे. रिपोर्टनुसार, युद्धनौकेवर ठेवलेला दारूगोळाही स्फोटाच्या कचाट्यात आला. याला रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं दुजोरा दिला आहे.
यंदा देशात सामान्य
मान्सूनचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या पहिल्या लाँग रेंज फोरकास्ट मध्ये या वर्षी देशात सामान्य मान्सून असेल. हे सलग चौथं वर्ष असेल जेव्हा भारतीय हवामान विभागाने सामान्य पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, IMD एप्रिल आणि जूनमध्ये दोन टप्प्यांत दीर्घ पल्ल्याचा अंदाज जाहीर करते. जून ते सप्टेंबर दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य आणि परिमाणात्मक असेल, तो दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या ९९ टक्के म्हणजे ८७ सेंटिमीटर असेल,” असं पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन म्हणाले.
फडणवीस यांनी १४ ट्विट्सच्या
माध्यमातून पवारांवर निशाणा साधला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेकडून हे मागील काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली जात आहे. असं असतानाच आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जंयतीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी १४ ट्विट्सच्या माध्यमातून पवारांवर निशाणा साधलाय. बाबासाहेबांच्या विचारांची आठवण फडणवीसांनी शरद पवारांना ट्विटसच्या माध्यमातून करुन देत पवारांनी वेळोवेळी केलेल्या वक्तव्यांचा दाखला दिलाय.
राज्यात तब्बल १७ हजार १७७ कोटींची
दारु आर्थिक वर्षात विकली गेली
करोनानंतर सगळं काही पुन्हा एकदा सुरळीत होत असताना लॉकडाउनचा फटका बसलेल्या मद्य व्यवसायालाही उभारी मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रात मद्यविक्रीत मोठी वाढ झाली असल्याने राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे. २०२०-२१ आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही वाढ १७ टक्क्यांची आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने २०२१-२२ मध्ये गेल्या तीन आर्थिक वर्षातील सर्वाधिक महसूल गोळा केला आहे. करोना काळात आणि त्यातही लॉकडाउनमुळे मद्य व्यवसायाला खूप मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत होता. पण या आर्थिक वर्षात तब्बल १७ हजार १७७ कोटींची दारु विक्री झाली आहे. २०२०-२१ च्या तुलनेत ही वाढ तब्बल २ हजार कोटींची आहे.
आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सोलापुरामध्ये
एक रुपया लीटर दराने पेट्रोल वितरीत
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरामध्ये एका रुपयात एक लीटर दराने पेट्रोल वितरीत करण्यात आले. इकीकडे दिवसेंदिवस महागाईने सामान्य जनतेला फटका सहन करावा लागतोय तर दुसरीकडे सोलापुरातील नागरिकांना पेट्रोल एक रुपये लीटरने दिलं जाणार आहे. या अनोख्या मोहीमेमुळे सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा दावा केला जातोय.
‘राज्याकडे अवघ्या पाच दिवसांचा कोळसासाठा शिल्लक’, मोठं वीजसंकट खरंच घोंघावतंय?
राज्यावरील वीजसंकट दिवसेंदिवस आणखी गडद होताना दिसत आहे. राज्याकडे कोळासाचा साठा फार कमी आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला लोडशेडिंगला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. राज्यावरील संभाव्य वीजसंकटाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. सत्ताधारी सरकार या प्रश्नाचं निरसन करतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण दुसरीकडे राज्यात वीजनिर्मिती करणारी महाजेनको कंपनीने आगामी संकट लक्षात घेता काही उपाययोजन केल्या आहेत का? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही महाजेनकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्याशी बातचित केली. त्यांच्याशी बातचित केल्यानंतर राज्यावरील वीजसंकट खरंच खूप गडद असल्याचं जाणवलं. पण कोळसा उपलब्ध झाल्यास राज्यावरील भारनियमन किंवा लोडशेडिंगचं संकट दूर होऊ शकतं, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
सरकारमध्ये नसल्याने मी आता
अधिक धोकादायक : इमरान खान
सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आपण आता अधिक धोकादायक झालो आहोत, असा इशारा दिला आहे. पहिल्यांदाच इम्रान यांनी पेशावरमध्ये काल सभा घेतली. या सभेत बोलताना इम्रान म्हणाले की, जेव्हा मी सरकारमध्ये होतो, तेव्हा मी धोकादायक नव्हतो, पण आता अधिक धोकादायक झालो आहे.
रशियामधून बाहेर पडण्याचा
इन्फोसिस चा निर्णय
रशियामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणाऱ्या इन्फोसिसने यासंदर्भात खुलासा करताना, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कंपनी इतर पर्यायांचा शोध घेत आहे, असं सांगितलं. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख यांनी, “आम्हाला आजच्या घडीला रशियन क्लायंटसोबत कोणत्याच डील्स करायच्या नाहीयत. तसेच पुढेही त्यांच्यासोबत व्यापार करण्याचा आमचा विचार नाहीय,” असं स्पष्ट केलंय. इन्फोसिसची स्थापना १९८१ रोजी सात जणांनी केली होती. त्यामध्ये नारायण मुर्तींचाही समावेश होता.
गुणरत्न सदावर्तेंना घेऊन
पोलीस साताऱ्याकडे रवाना
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्लाप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. यानंतर आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दीड वर्षापूर्वी दाखल प्रकरणात सातारा पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला आहे. ऑर्थर रोड तुरुंगातून सदावर्तेंना ताब्यात घेऊन साताराकडे रवाना झाले आहेत.
सर्वांनी सहकार्य केल्यास दहा-पंधरा
वर्षात अखंड भारत होईल : मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुढील १५ वर्षात अखंड भारत होईल आणि आपल्या सर्वांना तो पहायला मिळेल असं विधान केलं आहे. हरिद्वारमध्ये बोलताना मोहन भागवत यांनी संत आणि ज्योतिषांच्या मते २० ते २५ वर्षात भारत पुन्हा एकदा अखंड भारत होईल. पण जर आपण सर्वांनी मिळून या कार्याला गती दिली तर १० ते १५ वर्षात अखंड भारत होईल असं म्हटलं आहे.
मुंबई इंडियन्सला पराभूत करताच पंजाबच्या कोचने मास्टर ब्लास्टर सचिनचे धरले पाय
मुंबई इंडियन्सनं आयपीएल 2022 मधील आणखी एक मॅच गमावली आहे. पुण्यात बुधवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबईचा पंजाब किंग्जनं 12 रननं पराभव केला. मुंबईचा हा या सिझनमधील सलग पाचवा पराभव असून पहिला विजय मिळवण्याची त्यांची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. अशातच सध्या एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये पंजाबचे कोच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे पाय धरताना दिसत आहेत.
सामन्यानंतर क्रिकेटच्या मैदानात काहीसे वेगळं पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिका संघाचे दिग्गज खेळाडू आणि जगभरातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक जाँटी ऱ्होडस सचिन तेंडुलकरच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला. तेवढ्यात सचिनने लगेच खाली झुकत त्याचे हात पकडले. काही सेकंद ऱ्होड्स त्याच्या पाया पकडण्याचा प्रयत्न करत होता, परंतु सचिननेही त्याला पाया पडू दिल्या नाहीत. त्यांच्या याच क्षणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
SD social media
9850 60 35 90