रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात मोठा कारनामा केलाय. विराटने टी 20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. विराट असा कारनामा करणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.
विराटने 13 वी धाव घेताच हा अनोखा विक्रम आपल्या नावे केला. यासह विराट टी 20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा एकूण 5 वा फलंदाज तर पहिला भारतीय ठरला आहे.
या सामन्याआधी विराटच्या नावे 313 सामन्यात 9 हजार 987 धावा नोंद होती. मात्र विराटने मुंबई विरुद्ध 13 वी धाव पूर्ण करताच हा बहुमान मिळवला आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) बंगळुरुच्या डावातील चौथी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर विराटने खणखणीत सिक्स ठोकत हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.
तसेच विराटने 32 वी धाव पूर्ण करताच ऑस्ट्रेलिया आणि सनरायजर्स हैदराबादचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरलाही (David Warner) सर्वाधिक धावांच्याबाबतीत मागे टाकलं. वॉर्नरने आतापर्यंत टी 20 मध्ये 10 हजार 19 रन्स केल्या आहेत. विराटने सर्वाधिक धावाबाबत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेत वॉर्नरला चौथ्या क्रमांकावर मागे टाकलं.
आता विराटची नजर शोएब मलिकच्या रेकॉर्डवर असणार आहे. शोएबने टी 20 मध्ये 10 हजार 808 धावा केल्या आहेत.
विराट व्यतिरिक्त आतापर्यंत एकूण 4 जणांनी टी 20 क्रिकेटमध्ये 10 हजारपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये अनुक्रमे ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, शोएब मलिक आणि डेव्हिड वॉर्नरचा समावशे आहे.
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 फलंदाज
ख्रिस गेल – 14 हजार 275 धावा
कायरन पोलार्ड – 11 हजार 195 धावा
शोएब मलिक – 10 हजार 808 धावा
विराट कोहली – 10030* धावा
डेव्हिड वॉर्नर – 10 हजार 19 धावा