कुणाचंही लग्न ठरल्यावर सगळ्यात महत्त्वाची असते ती खरेदी. अगदी साड्यांपासून दागिन्यांपर्यंत काय घ्यायचं,याची यादीच केली जाते. कारण लग्नात प्रत्येकालाच सुंदर दिसायचं असतं. लग्नात तर बऱ्याच जणाचं लक्ष नवरीनं नेमका कोणती साडी नेसली आहे,तिच्या अंगावरील दागिने कसे आहेत,याकडे जास्त असतं.
त्यामुळे लग्नासाठी दागिने निवडताना अनेकांचा गोंधळ उडतो. दागिने नेमके कोणते निवडावेत?त्यासाठी बजेट किती असावे?असे अनेक प्रश्न पडतात. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला लग्नासाठी सोन्याचे दागिने खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी,याच्या काही टिप्स देणार आहोत.
दागिन्यांसाठी बजेट निश्चित करा
लग्नाच्या खरेदीसाठी जाण्यापूर्वी सर्वांत अगोदर दागिन्यांसाठीचं बजेट ठरवा. असं केल्यानं तुम्ही योग्य खर्च करू शकाल. शक्यतो,दागिन्यांसाठी जे बजेट ठरवलं आहे,त्यातच खर्च करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून लग्नाच्या इतर खर्चामध्ये काटकसर करावी लागणार नाही.
खरेदी करताना घाई करू नका
बऱ्याचदा आपण सराफाच्या दुकानात जाऊन दागिन्यांची खरेदी करताना सराफावर विश्वास ठेऊन तो सांगेल ते झटक्यात घेतो. पण दागिन्यांची खरेदी करताना अजिबात घाई करू नका. तुमच्या चेहऱ्यावर किंवा अंगावर कोणते दागिने व्यवस्थित दिसतील,तेच खरेदी करा.
तसंच दागिन्यांची खरेदी करताना त्यादिवशी सोन्याचा भाव नेमका किती आहे,याचीही माहिती असू द्या. आजकाल सोन्याचा भाव सहजासहजी इंटरनेटवरसुद्धा पाहता येतो. तुम्हाला जर सोन्याचा योग्य भाव माहिती असेल,तर तुमच्याकडून सराफ अधिक पैसे घेत आहे का,हे तुमच्या लक्षात येईल,आणि लग्नासाठी तुम्हाला योग्य किमतीत दागिनेही मिळतील.
हॉलमार्क असल्याची खात्री करा
सोन्याच्या दागिन्यांवर असलेला हॉलमार्क शुद्धतेची गॅरंटी असते. यात एक पाच अंक आणि दोन अक्षरं असलेला क्रमांक असतो. यातून ग्राहकाला समजते की,तो विकत घेत असलेलं सोनं किती शुद्ध आहे.
त्यामध्ये सोन्याचं प्रमाण किती आहे. त्यामुळे लग्नासाठी दागिन्यांची खरेदी करताना हॉलमार्क नक्की पहा. याशिवाय,सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करताना त्यासोबत शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका. सोनं किती कॅरेटचं आहे,हे चेक करा. दागिन्यात लागलेल्या हिऱ्यांसाठी वेगळं प्रमाणपत्र घ्या.
पक्कं बिल घ्या
कोणत्याही सोन्याच्या दुकानातून सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करताना त्यासोबत पक्के बिल तयार करून घ्या. या बिलामध्ये बाजारभाव किती,मजुरी किती लावण्यात आली,याची नोंद असायला हवी. जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही.
लग्नासाठी सोन्याचे दागिने खरेदी करताना काळजी घेतली तर योग्य दागिन्यांची खरेदी करणे अधिक सोपे होईल.