ओदिशाच्या पुरी येथील बाराव्या शतकातील सुप्रसिद्ध जगन्नाथ मंदिरातील भितरा रत्नभांडार उघडण्याची विनंती भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने या मंदिराच्या प्रशासनाला केली आहे. पुरातत्त्व विभागाचे अधीक्षकीय पुरातत्त्वज्ञ यांनी श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, रत्नभांडाराची आतील खोली (गर्भगृह) आता उघडण्यात यावी. या खोलीची सध्याची स्थिती कशी आहे, वातावरणाचा तेथे काही परिणाम दिसून येत आहे काय, हे पाहण्यासाठी ही खोली उघडली पाहिजे, असे या पत्रात स्पष्ट केले आहे. पुरातत्त्व विभागाने या पत्राच्या प्रती राज्याचा कायदा विभागाला तसेच पुरातत्त्व विभागाच्या महासंचालकांना पाठविल्या आहेत.
मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजपती महाराजा दिव्यसिंग देब यांनी नुकतीच रत्नभांडार उघडून पाहण्याची सूचना केली होती. मंदिर व्यवस्थापन समितीनेही ६ जुलैच्या बैठकीत असेच मत व्यक्त केले होते. या मंदिराच्या मौल्यवान ठेवी, खजिन्याच्या दोन खोल्या आहेत. बाहर भंडार या बाहेरील खोलीचा वापर देवाचे दैनंदिन वापराचे अलंकार ठेवण्यासाठी होतो, तर आतील भितरा भांडारात जडजवाहिर आहे, असे मंदिरातील सूत्रांनी सांगितले.
भांडार याआधी कधी उघडले होते?
रत्नभांडार १९७८ आणि १९८२ मध्ये उघडले होते. २०१८ मध्ये काय झाले होते? ओदिशा उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, रत्नभांडाराची आतील खोली उघडण्याचा प्रयत्न एप्रिल २०१८ मध्ये करण्यात आला होता. पण त्या खोलीच्या चाव्या त्या वेळी मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे पुरातत्त्व विभाग आणि मंदिराचे पुजारी यांच्या पथकाने त्या वेळी खोलीच्या बाहेरूनच पाहणी केली होती.