भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आज शाईफेक करण्यात आली आहे. शाईफेकीच्या या घटनेनंतर चंद्रकांत पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. त्यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केला आहे. हा हल्ला प्रिप्लॅन होता, कोणत्यातरी पत्रकाराने हे कृत्य केलं आहे, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असं पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी या हल्ल्यावरून विरोधकांवर देखील जोरदार टीका केली आहे.
नेमकं काय म्हटलं चंद्रकांत पाटील यांनी?
चंद्रकांत पाटील यांनी शाईफेकीवरून गंभीर आरोप केले आहेत. हा हल्ला प्रिप्लॅन होता, कोणत्यातरी पत्रकाराने हे कृत्य केलं आहे, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘चंद्रकांतदादांचं वक्तव्य हे योग्य नव्हतं, त्याचा निषेधच. पण म्हणून त्यांच्यावर केलेली शाईफेक योग्य नाही. थोर व्यक्तींच्या आपण आत्मसात केलेल्या विचाराच्या विरोधात एक विचार अनेक वर्षांपासून काम करत आहे, त्याचा विरोध हा आपण सर्वांनी वैचारिक आणि संवैधानिक मार्गानेच करणं गरजेचं आहे’, असं ट्विट रोहित पवार यांनी शाईफेकीच्या घटनेनंतर केलं होतं.
विरोधकांचा समाचार
चंद्रकांत पाटील यांनी यावरून रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी चळवळीतून पुढे आलो आहे. तुमच्या सारखा कुटुंबीयांच्या जीवावर मोठा झालेलो नाही, असा टोला त्यांनी रोहित पवार यांना लगावला आहे. तसेच त्यांनी यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली आहे. तसेच छगन भुजबळ यांनी जी प्रतक्रिया दिली ती स्वाभाविक होती म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या प्रतिक्रियेचा देखील समाचार घेतला आहे.