बारावी प्रमाणेच दहावी बोर्ड परीक्षेतही लातूर पॅटर्न चर्चेत असतो. विज्ञानासारखा अवघड वाटणारा विषयही या पॅटर्नमुळे सोपा वाटतो. दहावी बोर्डाची परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी यशाचा मार्ग म्हणून लातूर पॕटर्नला ओळखले जाते. मागील वर्षीचा निकाल पाहिला तर लातूर शहरामध्ये 42 विद्यार्थी हे 100 पैकी 100 गुण घेणारे होते. 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 95 ते 100 टक्के एवढे मार्क दहावी बोर्ड परीक्षेमध्ये मिळवले होते. यामुळे दहावी आणि बारावीसाठी लातूर पॅटर्न यशाचा पॅटर्न बनल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे.
विज्ञान या विषयाची तयारी करताना विद्यार्थ्यांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा पेपर सोडवताना वेळेचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक एक साठी विद्यार्थ्यांनी वीस मिनिटे द्यावी, प्रश्न दोन साठी वीस मिनिटे, प्रश्न तीन साठी 40 मिनिटे, चार साठी 15 मिनिटे यामधून विद्यार्थ्यांचा पेपर हा वेळेत पूर्ण होण्यास मदत होते व उर्वरित वेळेत अतिरिक्त प्रश्न सोडवण्यास वेळ मिळतो.
विज्ञानाचा पेपर कसा सोडवावा?
1. विज्ञान या विषयामध्ये विद्यार्थ्यांनी प्रश्न पहिला सोडवताना पाठ्यपुस्तकातील एमसीक्यू वरती लक्ष द्यावे.
2. प्रश्न क्रमांक दोन सोडवताना शास्त्रीय कारणे द्या या प्रश्नाची उत्तरे दोन स्टेटमेंट मध्ये येणे आवश्यक आहे. यामध्ये अवांतर लिखाण करू नये ज्यामुळे विद्यार्थ्यांचे मार्क कट होतील.
3. प्रश्न क्रमांक तिसरा हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. यासाठी पाठ्यपुस्तकातील प्रश्नसंच व पाठ्यपुस्तकाचे वाचन गरजेचे आहे. या प्रश्नांमध्ये व्याख्या या तंतोतंत लिहाव्यात.
4. प्रश्न क्रमांक चार यामध्ये आकृतीचा प्रश्न येतो. आकृतीला नावे काळजीपूर्वक द्यावीत. जर आकृती काढायला सांगितली असेल तर पेन्सिलचा वापर करून ती आकृती काढावी. पेनने काढल्यास मार्क मिळत नाहीत.
5. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील सर्व फ्लोचार्ट पाहणे गरजेचे आहे.
6. प्रश्न क्रमांक एक व चार यासाठी पुस्तकाचे वाचन करून जास्त मार्क मिळवू शकतात.
7. विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेत कमीत कमी चुका कराव्यात. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे मार्क वाढतील.
8. विविध प्रश्नसंच सोडवून ते आपल्या शिक्षकांकडून तपासून घ्यावेत व विद्यार्थ्यांच्या झालेल्या चुका त्यामधून पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
वरील सर्व पद्धतीचा वापर करून विज्ञानाचा पेपर सोडविल्यास विद्यार्थ्यांना विज्ञान या विषयांमध्ये जास्त मार्क मिळवता येतील. या सर्व पद्धतीचा वापर लातूर पॅटर्न मध्ये केला जातो.