लॉकडाउनसंबंधी आज मुख्यमंत्री
साधणार संवाद
महाराष्ट्रात लॉकडाउन वाढवण्यासंबंधी आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. लॉकडाउन वाढणार असला तरी तो किती दिवसांसाठी वाढणार आहे याबाबत स्पष्टता नाही. महाराष्ट्रात लॉकडाउन टप्प्याटप्प्याने शिथील केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. तसंच नेमके कोणते निर्बंध शिथील केले जाणार आहेत याबद्दलही लोकांमध्ये उत्सुकता आहे. काळी बुरशी तसंच तिसऱ्या लाटेचा धोका या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने काय निर्णय घेतला आहे हे उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतरच स्पष्ट होईल.
कुंभमेळ्याला ‘सुपर स्प्रेडर’ म्हणणं चुकीचं
करोना संकटात कुंभमेळ्याचं आयोजन करण्यावरुन टीका होत असताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने कुंभमेळ्याला ‘सुपर स्प्रेडर’ म्हणणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. १ जानेवारीपासून ते कुंभमेळा संपेपर्यंत हरिद्धारमध्ये करण्यात आलेल्या एकूण आरटीपीसीआर चाचण्यांपैकी फक्त ०.२ टक्के पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. कुंभमेळ्यासाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांपैकी फक्त ०.५ टक्के पोलीस कर्मचाऱ्यांना करोना झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
मेहुल चोक्सीला भारतात
आणण्यासाठी प्रयत्न सुरु
भारतात १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा करुन फरार झालेल्या मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. भारताने मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी लागणारी कागदपत्रं डोमिनिकाला पाठवली आहेत. देशात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. त्याच्या वकिलांनी अँटिग्वामधून अपहरण करुन मेहुल चोक्सीला जबरदस्ती डोमिनिकामध्ये नेल्याचा दावा केला आहे. २०१८ पासून मेहुल अँटिग्वामध्ये वास्तव्यास होता.
मोदींच्या दुर्दर्शी नेतृत्वामुळे भारताच्या
विकासाचा गाडा प्रगतीकडे : अमित शाह
केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन सात वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मोदी सरकारने केलेल्या कामांना उजाळा दिला असून, सरकारच्या एकूण कामगिरीबद्दल मत व्यक्त केलं आहे. “मागील सात वर्षात देशातील जनतेनं पंतप्रधान मोदी यांच्या सेवा आणि सर्मपणावर विश्वास दाखवला आहे. यासाठी मी देशवासियांना नमन करतो. मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आम्ही प्रत्येक संकटावर विजय मिळवून भारताच्या विकासाचा गाडा अखंडितपणे पुढे घेऊन जाऊ, याचा मला पूर्ण विश्वास आहे,” असं शाह यांनी म्हटलं आहे.
मराठमोळा पॅरा जलतरणपटू
सुयश जाधवचा भीमपराक्रम
महाराष्ट्राचा पॅरा जलतरणपटू सुयश नारायण जाधव याने टोकियो पॅरालिम्पिक पात्रता फेरीत प्रवेश करत मोठा विक्रम रचला आहे. तो पॅरालिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळवणारा पहिलाच भारतीय जलतरणपटू ठरला. सुयश आता टोकियो येथील स्पर्धेत ५० मीटरच्या एस-७ वर्गात आणि २०० मीटरच्या वैयक्तिक मेडलीच्या एसएम-७ वर्गात सहभाग घेणार आहे. २०१८ साली जकार्तामध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेतील प्रदर्शनाच्या जोरावर त्याने पात्रता फेरीत धडक दिली.
करोना रुग्णाचा मृतदेह
ब्रीजवरुन नदीत फेकला
देशात एकीकडे करोना संकट नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असताना गंगेच्या किनारी मृतदेहांचा खच सापडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे या मृतदेहांवरुन निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न सुरु असताना एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पीपीई किट घातलेली एक व्यक्ती करोना रुग्णाचा मृतदेह ब्रीजवरुन नदीत फेकत असल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात ही घटना घटना घडली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हॉटेलच्या लसीकरण पॅकेजवर
केंद्र सरकारचा संताप
काही खासगी रुग्णालयं लक्झरी हॉटेल्ससोबत हातमिळवणी करत करोना लसीकरणाचं पॅकेज देत असून हे नियमांचं उल्लंघन असून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून अधिकाऱ्यांना करोना लसीकरण मोहीम राबवताना नियमांचं योग्य पालन होत असल्याची खातरजमा करण्यास सांगितलं आहे.
हरयाणा सरकारने घेतला
लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय
काही राज्यांनी करोनास्थिती आटोक्यात राहावी यासाठी लॉकडाउनचा अवधी वाढवला. तर काही राज्यांनी १ जूननंतर काही नियमांमध्ये सूट देण्याची घोषणा केली आहे. हरयाणा सरकारने करोना स्थितीचा अंदाज घेतल्यानंतर ७ जूनपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यात दुकानं सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र यासाठी दुकानदारांना सम-विषम फॉर्म्युलाचं पालन करावं लागणार आहे.
बहुतांश भागात पुढील चार ते पाच
दिवस पावसाची शक्यता
अरबी समुद्रातून येणारे बाष्प आणि राज्यावरून गेलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बहुतांश भागात पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी (२९ मे) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. कोकण आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस होता. राज्यात मोसमी पावसाचे आगमन होईपर्यंत काही भागांत पूर्वमोसमी पाऊस सुरूच राहणार असल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर
घाला हे भाजपाचेच पाप : नाना पटोले
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले, याला सर्वस्वी भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. कोर्टाने वारंवार सांगूनही केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना करून आकडेवारी दिली नाही. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केले. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळली असली तरी आता राज्य सरकारने हा विषय घटनापीठापुढे घेऊन गेले पाहिजे आणि ओबीसी समाजाला न्याय दिला पाहिजे अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील
आरक्षण रद्दचा निर्णय कायद्याला धरून नाही
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण रद्द केलं होतं. या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेली याचिकाही कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द करण्याचा केंद्राचा निर्णय कायद्याला धरून नाही, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
कोरोनामुळे कुटुंब प्रमुखाचा मृत्यू
झाल्यास ESIC देणार पेन्शन
कोरोनामुळे कुटुंबाचा आधार गमावलेल्या मदत करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहे. कोरोना काळात ज्या घरातील कर्ता माणूस किंवा आधार गमावला असेल त्यांना ESIC अंतर्गत पेन्शन दिली जाणार आहे. त्या पीडित कुटुंबियांना वाढीव विमा भरपाई देखील देण्यात येणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे मासिक उत्पन्न 21,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल, अशा कर्मचाऱ्यांना ESIC च्या या सुविधेचा लाभ मिळणार आहे. तसेच ज्या दिव्यांगांच्या उत्पन्नाची मर्यादा 25,000 रुपये आहे, त्यांनाही याचा फायदा मिळणार आहे.
दहावीच्या परीक्षा याचिकाकर्त्याला
ठार मारण्याची धमकी
राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला असतानाच आता परीक्षेसाठी आग्रही असणाऱ्या याचिकाकर्त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पुण्यातील धनंजय कुलकर्णी यांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.
SD social media
9850 60 3590