देशातील सैनिकी शाळांमध्ये
मुलींना प्रवेश देणार : पंतप्रधान
देशातील सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश सुरू करण्याचा निर्णय मोदींनी यावेळी जाहीर केला. “मला लाखो मुलींचे संदेश मिळायचे की त्या देखील सैनिक शाळांमध्ये शिकू इच्छितात. त्यांच्यासाठी देखील सैनिक शाळांचे दरवाजे उघडले जावेत. दोन-अडीच वर्षांपूर्वी मिझोरामच्या सैनिकी शाळांमध्ये पहिल्यांदा आम्ही मुलींना प्रवेश देण्याचा छोटासा प्रयोग आम्ही सुरू केला होता. आता सरकारने ठरवलं आहे की देशातल्या सैनिकी शाळांना देशातील मुलींसाठी देखील उघडलं जाईल. देशातल्या सर्व सैनिक शाळांमध्ये आता मुली देखील शिकतील”, असं मोदींनी यावेळी जाहीर केलं.
अफगाणिस्तानच्या सर्व सीमा
तालिबानच्या ताब्यात
अफगाणिस्तानमध्ये तालिबान दहशतवादी एक एक करत शहरांवर ताबा मिळवत आहेत. आता तालिबान्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये प्रवेश केला आहे. तसेच देशातील सर्वच सीमा ताब्यात घेतल्या आहेत. याबाबतची माहिती अफगाण अधिकाऱ्यांनी दिली आहे. दहशतवाद्यांनी काबुलच्या कलाकान, काराबाग आणि पगमान जिल्ह्यात प्रवेश केला आहे. तसेच लोकांमध्ये दहशत पसरवण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी तालिबाननं जलालाबादवर ताबा मिळवला होता. काबुल हे शहर तालिबान दहशतवाद्यांपासून सुरक्षित मानलं जातं होतं. मात्र आता या शहरातही तालिबानी घुसले आहेत. जलालाबादवर ताबा मिळवत तालिबानने राजधानी काबुलला देशाच्या पूर्व भागापासून आधीच वेगळं केलं होतं.
ओडिशामध्ये १३८ मुलांना
करोनाची लागण
करोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा संभाव्या धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसात लहान मुलांना करोना संसर्ग होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. बंगळुरूमध्ये गेल्या १० दिवसात ५०० हून अधिक मुलांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता ओडिशामध्ये १३८ मुलांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
दिल्लीच्या सर्व सरकारी
शाळांमध्ये देशभक्तीपर अभ्यासक्रम
७५ व्या स्वातंत्र्यदिनी दिल्ली सचिवालयात आयोजित कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या दरम्यान, केजरीवाल यांनी १९४७ पासून आजपर्यंत देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखणाऱ्या आणि सीमेवर बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांनाही श्रद्धांजली वाहिली. २७ सप्टेंबरपासून शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीच्या सर्व सरकारी शाळांमध्ये देशभक्तीपर अभ्यासक्रम सुरु केला जाणार अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
परिस्थिती बिघडली, तर राज्यात
पुन्हा लॉकडाउन : मुख्यमंत्री
राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण केलं गेलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना पुढील वर्षीचा स्वातंत्र्यदिन करोनामुक्त वातावरणात साजरा करणारच अशी प्रतिज्ञा करण्याचं आवाहन केलं. तसेच, स्वातंत्र्यदिनानंतर १६ ऑगस्टपासून राज्यात निर्बंध शिथिल करण्यात येत असले, तरी करोनाविषयीचे नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जर परिस्थिती बिघडली, तर राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू करावा लागू शकतो, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
नैऋत्य हैतीत ७.२ रिश्टर
स्केलच्या भूकंपाचे धक्के
नैऋत्य हैतीत ७.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के जाणवल्याने घरं पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत ३०४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १८०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित तसेच वित्तहानी झाली आहे. आधीच करोनाशी सामना करत असलेल्या हैतीच्या नागरिकांचं जीवन भूकंपामुळे विस्कळीत झालं आहे. राष्ट्रपतींची हत्या आणि वाढत्या गरीबीमुळे हैती देशाचं संकट वाढत चाललं आहे.
आॕलिम्पिक पदक विजेती बॕडमिंटनपटू पी व्ही सिंधू
काही ब्रँडवर ठोकणार दावा
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन केलं. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. ऑलिम्पिक स्पर्धेतील तिचं हे दुसरं पदक आहे. यापूर्वी रियो ऑलिम्पिक स्पर्धेत तिने रौप्य पदक पटकावलं होतं. ऑलिम्पिक स्पर्धेतील बॅडमिंटन स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी ती एकमेव खेळाडू आहे. तिच्या कामगिरीनंतर संपूर्ण देशातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. यात काही ब्रँडचाही समावेश होता. मात्र यात काही ब्रँड असे होते, की त्यांनी तिची परवानगी न घेता तिचं नाव आणि फोटोचा वापर केला. सिंधू या विरुद्ध दावा ठोकण्याच्या तयारीत आहे. या ब्रँडने सोशल मीडियावर सिंधूचं नाव आणि फोटोचा वापर करून पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केलं.
श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या
तुकडीवर ग्रेनेड हल्ला
एकीकडे जम्मू-काश्मीर पोलिसांनी स्वातंत्र्य दिनला दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचे मनसुबे उधळून लावले असताना आता श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ला झाला आहे. सीआरपीएफच्या तुकडीवर ग्रेनेड हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हा हल्ला करण्यात आला.
पगार आणि पेन्शन
एडवान्स देण्यात येणार
ऑगस्ट महिन्यापासून सणासुदीच्या हंगामाला सुरूवात झाली आहे. ओणम, रक्षाबंधन आणि गणेश चतुर्थीसह नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये दिवाळी आणि ख्रिसमस सारखे मोठे सणोत्सव आहेत. या सणोत्सवात पैशाची काळजी न करता मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. कोरोना काळात अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. लोकांना पैशाची अडचण येऊ नये तसेच मोठ्या प्रमाणात खरेदी करता यावी, यासाठी सरकारने विशेष तयारी केली आहे. मोदी सरकार अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना, निवृत्तीवेतनधारकांना आगाऊ पगार आणि पेन्शन देणार आहे.
दडी मारलेल्या पावसाचं
पुन्हा राज्यात आगमन होणार
राज्यातील अनेक भागांमध्ये अद्यापही कोरडा ठाक भाग असल्याने बळीराजावर तिबार पेरणीचं संकट आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचं आता पुन्हा राज्यात आगमन होणार आहे. 16 ऑगस्टपासून पाऊस सक्रिय होणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने त्याचा परिणाम राज्यावरही होणार आहे. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
SD social media
9850 60 3590